आज आपण ‘मुलाखत’ या महत्त्वाच्या टप्प्याविषयी जाणून घेऊयात. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची गुणसंख्या साधारणपणे सारखीच असते. त्यामुळे मुलाखतीतले गुण अंतिम यादीत स्थान प्राप्त करण्यासाठी  महत्त्वाचे ठरतात.
मुलाखतीच्या संदर्भात अनेक गैरसमज आहेत. उदा. मुलाखत देणारी व्यक्ती सुंदर दिसायला हवी, मुलाखतीला जाताना अमूक एका रंगाचा वेश परिधान करावा, उमेदवारांनी अगदी स्टायलिश पद्धतीने खाडखाड उत्तरे द्यावीत, पॅनलने प्रश्न विचारला की लगेच उत्तर द्यावीत, शक्यतो उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होतील अशी द्यावीत इत्यादी. मित्रांनो, या अत्यंत भ्रामक कल्पना आहेत. मात्र, याचा अर्थ असा अजिबात नाही की मुलाखतीची गांभीर्यपूर्वक तयारीच करू नये. चुरगळलेले कपडे, मरगळलेल्या चेहऱ्याने मुलाखत पॅनलसमोर जाणे हेदेखील तितकेच चुकीचे आहे. मग मुलाखत म्हणजे नक्की काय तर खोटेपणा न करता, आपण आहोत त्यापेक्षा वेगळे आहोत असा दाखविण्याचा अट्टहास न करता, प्रामाणिकपणे आपण जसे आहोत तसे पॅनलच्या समोर जाणे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आजवर संपादन केलेल्या ज्ञानाच्या आधारावर, खोटेपणाचा आव न आणता, प्रामाणिकपणे उत्तर देणे म्हणजे मुलाखत.
मुलाखत म्हणजे तुमच्या ज्ञानाची परीक्षा नव्हे, कारण ज्ञानाची परीक्षा मुख्य परीक्षेतच झालेली असते. मुलाखतीत उमेदवाराला एखादी गोष्ट माहीत आहे हे जाणून घेतले जात नाही तर आपले ज्ञान इतरांसमोर कसे मांडता याला जास्त महत्त्व असते. मागच्या काही वर्षांचा आणि विद्यार्थ्यांच्या संख्येचा अंदाज पाहता साधारणत: ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेतली जाते.   मुलाखतीची तयारी कशी करावी, मुलाखतीची तयारी कुणाकडून करून घ्यावी असे काही नियम नाहीत. कारण प्रत्येकाची मुलाखत वेळेनुसार, प्रसंगानुसार वेगवेगळी असते. मात्र तयारी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास फायदा नक्कीच होईल-
= वैयक्तिक माहिती : आपले नाव, नावाचा अर्थ, ते नाव इतिहासाशी संबंधित असेल तर त्यासंदर्भाबद्दल थोडी माहिती,   वडिलांचे नाव, आडनाव, आडनावाचा इतिहास, आईचे नाव, जन्मतारीख, जन्मतारखेचा ऐतिहासिक संदर्भ, आपले गाव, गावाची माहिती, शाळा, महाविद्यालयीन माहिती, वडिलांचा व्यवसाय, त्यांच्या व्यवसायाची माहिती संपूर्णपणे असावी.
= शैक्षणिक पाश्र्वभूमी : आपण पदवी ज्या विद्याशाखेत घेतली असेल, त्यासंबंधी प्रश्न नक्की विचारले जातात. त्यासंबंधीची तयारी करावी. पदवी परीक्षेत किंवा त्याआधी आपल्याला किती गुण मिळाले आहेत याचा कोणताही परिणाम मुलाखतीवर होत नाही. समजा, एखाद्या वर्षी  नापास झालेला असाल तरी त्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम मुलाखतीवर होत नाही. मात्र, आपण त्या प्रश्नांची उत्तरे कशी देतो यावर बरेचसे अवलंबून असते. तुम्ही जिथे नोकरीला असाल किंवा प्रशासनात काम करत असाल तर त्या विभागाची सविस्तर माहिती असावी.
= जे विद्यार्थी व्यावसायिक महाविद्यालयांमधून येतात, त्यांनी आपण आपले एवढे चांगले क्षेत्र सोडून प्रशासनात का येऊ इच्छिता याचे व्यवस्थित उत्तर तयार करून ठेवावे. उत्तर सकारात्मक असावे. अभियांत्रिकीला सध्या वाव नाही, नोकरी मिळत नाही, आयुष्याला स्थिरता मिळावी, यासाठी प्रशासनात येऊ इच्छितो.. अशी उत्तरे देऊ नयेत. वैद्यकीय शाखेतील तसेच शेतकी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांवर खर्च केलेला सरकारचा पसा वाया जातो, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अशा वेळेस ‘आपण घेतलेल्या ज्ञानाचा फायदा नक्कीच प्रशासनात होऊ शकेल’ अशा आशयाचे उत्तर तयार करावे.
= आपण प्रशासनात का येऊ इच्छिता?  या प्रश्नाचे उत्तर सर्वानीच तयार करून ठेवावे. उत्तर प्रामाणिक असावे. देश बदलायचा आहे, प्रशासनात खूप सुधारणा घडवून आणायच्या आहेत, प्रशासनात नवीन आव्हाने पेलण्याची संधी मिळते, मानसन्मान मिळतो, स्थिरता मिळते या आशयाचे तुमचे स्वत:चे उत्तर तयार करून ठेवा.
= आपले गाव, तालुका, प्रशासकीय विभाग यासंदर्भात प्रश्न : आपण जेथून आला आहात. उदा. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण इ. या भागांच्या समस्या उदा. पाण्याची समस्या, अवकाळी पावसाची समस्या इ. या प्रदेशातील लोकप्रतिनिधी, मंत्री याची माहिती या प्रदेशातील व्यवसाय, वेशभूषा या प्रदेशाचे किंवा गावाचे, ऐतिहासिक महत्त्व इ. विषयांची तयारी करून ठेवावी.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com