या परीक्षेची तयारी कशी करावी?
या परीक्षेसाठी वेगवेगळ्या विद्याशाखांमधील विद्यार्थी स्पध्रेत उतरतात. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा देण्याचे आणि त्यात यशस्वी होण्याचे प्रमाण उंचावले आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना मानव्यशाखांचे विषय सोपे वाटतात, तर विज्ञान, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित विषयांत गती असते. या परीक्षेची तयारी करताना सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी अवश्य पाळाव्यात-
=    सर्वप्रथम इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या राज्य पाठय़पुस्तक मंडळाच्या सर्व पुस्तकांचे वाचन किमान दोन ते तीन वेळा व्हायला हवे. मागच्या काही वर्षांत आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, सुमारे २५ ते ३० टक्के प्रश्न हे थेट या अभ्यासक्रमाशी संबंधित  असतात.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध परीक्षांसाठी अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे, तो या अभ्यासक्रमावर आधारित आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
=    परीक्षेसाठी आयोगाने निश्चित केलेला अभ्यासक्रम, त्यासंबंधित विविध मुद्दे, उपघटक हे सर्वप्रथम समजून घ्यावेत. उदाहरणार्थ- जर अभ्यासक्रमात फक्त भारताचा अंतराळ कार्यक्रम असे नमूद केलेले असेल तर या उपघटकाच्या अंतर्गत निरनिराळे मुद्दे येतात. उदा. भारताचा अंतराळ कार्यक्रम कधी सुरू झाला, देशातील अंतराळ संशोधन संस्था, देशाच्या अंतराळ संशोधनाचे टप्पे, अग्निबाण विकास कार्यक्रम, ((SLV, ASLV, PSLV, GSLV),, अग्निबाणाची प्राथमिक माहिती उदा. PSLV या अग्निबाणाचा वापर कोणकोणते उपग्रह आकाशात पाठविण्यासाठी केला गेला,GSLV चा वापर करण्याची आवश्यकता का भासली, क्रायोजेनिक्स इंजिन म्हणजे काय, चांद्रयान मोहीम १ आणि २,  उपग्रह म्हणजे काय? त्यांचा वापर कशासाठी करण्यात येतो, उपग्रहाच्या कक्षा म्हणजे काय, भूस्थिर कक्षा व सूर्यस्थिर कक्षा म्हणजे काय? इस्त्रोमार्फत कोणकोणते उपग्रह गेल्या वर्षभरात अंतराळात पाठविण्यात आले, या सर्व उपघटकांचा अभ्यास केल्यास भारताचा अंतराळ कार्यक्रम या घटकाची तयारी होते.
अशा प्रकारे अभ्यासक्रमात नमूद केलेले प्रत्येक घटक, त्यांच्याशी संलग्न उपघटक यांचा सविस्तर अभ्यास करावा.
एमपीएससीची तयारी – इंग्रजीचे ज्ञान
एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांमध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत इंग्रजीचा पेपर असतो. मात्र, त्याच्या गुणांचा विचार अंतिम यादीसाठी केला जात नाही. केवळ या प्रश्नपत्रिकेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या पेपरात उमेदवार अनुत्तीर्ण झाल्यास त्याचे इतर पेपर तपासले जात नाहीत. मात्र, एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी १०० गुणांचा इंग्रजीचा पेपर अनिवार्य असतो आणि या प्रश्नपत्रिकेचे गुण अंतिम यादीसाठी ग्राह्य़ धरले जातात, म्हणून एमपीएससीच्या दृष्टीने या पेपरचे महत्त्व खूप जास्त आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या मदतीने मुख्य परीक्षेच्या दृष्टीने या पेपरची तयारी करावी. एखादे इंग्रजी नियतकालिक नियमितपणे वाचल्यास इंग्रजी शब्दसाठा वाढतो तसेच दररोज इंग्रजीत लिहिण्याचा सराव करावा.
अनिवार्य मराठीची तयारी कशी कराल?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) मुख्य परीक्षेत मराठी व इंग्रजीचे दोन पेपर वर्णनात्मक स्वरूपात १०० गुणांसाठी असतात. यातील गुण अंतिम यादीत धरले जातात म्हणून चांगले गुण प्राप्त करून अंतिम यादीत निवड होण्यासाठी या पेपरच्या गुणांचे महत्त्व अत्यंत जास्त आहे.  मातृभाषा मराठी असल्याने बहुसंख्य विद्यार्थी या पेपरला गृहित धरतात. मात्र, सर्वप्रथम आयोगाने नमूद केलेला अभ्यासक्रम बारकाईने वाचावा. आपले हस्ताक्षर सुवाच्च असावे. मराठीच्या पेपरमध्ये निबंधाचा महत्त्वाचा उपघटक आहे. त्यामुळे वेळोवेळी काही निबंध लिहून ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. परीक्षेत विचारले जाणारे निबंध वैचारिक, कल्पनात्मक, आत्मकथनपर किंवा ज्वलंत प्रश्नांवर आधारित असतात. निबंधाव्यतिरिक्त पत्रव्यवहार, वृत्तलेखन या उपघटकांच्या तयारीसाठी लेखन सराव महत्त्वाचा ठरतो. भाषांतरावर एक प्रश्न असतो. इंग्रजी उताऱ्याचे
मराठीत भाषांतर करायचे असते. यासाठी आशय समजून घेत नेमक्या शब्दांमध्ये तो व्यक्त करणे आवश्यक असते.    (समाप्त)
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta mpsc guidence
First published on: 16-04-2015 at 01:01 IST