= द्वीपगिरी : वाळवंटी प्रदेशात एखादा चबुतरा असल्यास चबुतऱ्याच्या आजूबाजूचा भाग वाऱ्याच्या खननकार्यामुळे झिजून आतील कठीण खडकाचा उंच भाग तसाच शिल्लक राहतो. हा भाग घुमटाकार होत जाऊन वाळूच्या टेकडीसारखा दिसू लागतो. त्यांची फारशी झीज होत नाही. हे उंच व घुमटाकार आकार वाळूच्या टेकडय़ांसारखे असतात. यांनाच ‘द्वीपगिरी’ असे म्हणतात.
वाळवंटी प्रदेशात वारा आणि काही प्रमाणात पाऊस यांच्या संयुक्त कार्यामुळे द्वीपगिरीची निर्मिती होते. कलहारी वाळवंटात, नायजेरियाच्या वाळंवटात आणि ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात द्वीपगिरीची उदाहरणे आढळतात. द्वीपगिरी म्हणजे तीव्र उताराच्या टेकडय़ा होय.
= मेसा व बुटे : वाळवंटी प्रदेशात कठीण व मृदू खडकांचे थर एकमेकांवर आणि आडव्या दिशेने समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या घर्षणामुळे मृदू खडकांची झीज जास्त प्रमाणात होऊन तिथे चौकोनी टेबलासारखा भाग दिसतो. त्यास मेसा असे म्हणतात. मेसाच्या बाजू तीव्र उताराच्या असतात. मेसा या टेबलासारख्या भागावर सतत झीज होत राहिल्यास त्याचा आकार लहान ठोकळ्यासारखा दिसतो. त्यास बुटे असे म्हणतात.
=वाऱ्याचे संचयनकार्य व भूरूपे : वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे खननकार्य नियमित चालू असते. खनन झालेले पदार्थ वारा आपल्याबरोबर वाहून नेत असतो व संचयनकार्यास सुरुवात होते. त्यांचे थरावर थर साचून वेगवेगळे भूआकार निर्माण होतात.
वाऱ्याच्या संचयनकार्यामुळे पुढील भू-आकार निर्माण होतात :
= वालुकागिरी : वाळवंटी प्रदेशात खनन झालेले पदार्थ वारा आपल्याबरोबर वाहत नेतो व वाऱ्याच्या वेग जेथे कमी होतो तेथे या सर्व पदार्थाचे संचयन होते. वाऱ्याच्या अशा संचयनामुळे वाळूच्या टेकडय़ांची निर्मिती होते. अशा टेकडय़ांना वालुकागिरी असे म्हणतात. अशा टेकडय़ांची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची असते तर विरूद्ध बाजू तीव्र उताराची असते. या वालुकागिरीचे स्थलांतर होत असते. त्या वाऱ्याबरोबर पुढे पुढे सरकत असतात.
= बारखाण : वारा वाहत असताना वाऱ्याच्या मार्गात लहान झाड किंवा मोठा दगड आल्यास वाऱ्याबरोबर आलेल्या काही पदार्थाचे वाऱ्याच्या दिशेला संचयन होते. त्यामुळे चंद्रकोर आकाराच्या वाळूच्या टेकडय़ा निर्माण होतात. अशा चंद्रकोर टेकडय़ांना ‘बारखाण’ असे म्हणतात.
या टेकडय़ांची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची असते तर विरुद्ध बाजू तीव्र व अंतर्वक्र उताराची असते. बारखाण वेगवेगळे किंवा समूहाने दिसतात. अशी बारखाण अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशात, इराण, सहारा, वाळवंटी प्रदेशात आढळतात.
= ऊर्मी चिन्हे : वाळवंटी प्रदेशात मंद वाऱ्याबरोबर माती व बारीक वाळूचे संचयन होऊन ऊर्मी चिन्हांची निर्मिती होते. यांचा आकार व क्रम जलतरंगसारखा किंवा लाटांसारखा असतो. यांची उंची दोन ते तीन सें.मी.पेक्षा कमी असून विस्तार वाऱ्याच्या दिशेला लंबाकार असतो. वेगवान वाऱ्यामुळे ऊर्मी चिन्हे नाहीशी होतात. वाऱ्याची दिशा बदलल्यावर ऊर्मी चिन्हे एकमेकांत मिसळतात किंवा ऊर्मी चिन्हाचा विस्तार व दिशा बदलते.
= लोएस मदाने : वाळवंटी प्रदेशात अनेक सूक्ष्म कण वाऱ्याबरोबर दूपर्यंत वाहून नेले जातात. वाळवंटी प्रदेशाच्या पलीकडे त्यांचे संचयन होऊन बारीक किंवा सूक्ष्म कणांचा थर तयार होऊन मदान तयार होते, त्याला ‘लोएस मदान’ असे म्हणतात. अतिसूक्ष्म कणांच्या संचयनापासून लोएस मैदान तयार होते. या कणांचा रंग फिकट पिवळा असतो. हे मदान सुपीक असते. गोबीच्या वाळवंटी प्रदेशातून वाऱ्याबरोबर वाहून आलेल्या सूक्ष्म कणांपासून चीनच्या उत्तर भागात अशी लोएस मदाने तयार झाली आहेत.
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc loksatta spardha guru 17 march
First published on: 17-03-2015 at 09:07 IST