एमपीएससी व यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या प्राचीन भारतातील इतिहासात गुप्त साम्राज्य हा महत्त्वाचा उपघटक आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
गुप्त साम्राज्य : मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर सुमारे ४०० वर्षांचा कालखंड शक, कुशाणादी आक्रमकांच्या स्वाऱ्यांचा व त्यांच्या राज्य स्थापन करण्याचा कालखंड होय. मौर्यानंतर उत्तरेत कुशाणांनी तर दक्षिणेत सातवाहनांनी आपली राज्ये स्थापन केली, पण त्यांचाही अस्त इ.स. तिसऱ्या शतकाच्या मध्यावर घडून आला. उत्तरेत कुशाणांची सत्ता नष्ट होऊन अनेक नागराज्ये उदयास आली, तर दक्षिणेत सातवाहन सत्तेचा अस्त होऊन तिथे वाकाटकांची सत्ता प्रस्थापित झाली. याच काळात भारतात अनेक छोटीमोठी राज्ये अस्तित्वात आली. अशाच एका छोटय़ा राज्यांपकी उत्तरेत गंगेच्या खोऱ्यातील मगधाच्या प्रदेशात गुप्तांचे राज्य इ.स.च्या तिसऱ्या शतकाच्या अखेरीस उदयाला आले. पुढे या राज्याला एकापेक्षा एक पराक्रमी राजे मिळाले. या कालखंडास इतिहासकारांनी ‘भारताच्या इतिहासातील सुवर्णयुग’ असे संबोधले.
इ.स. २७५ च्या सुमारास गुप्त घराणे उत्तर भारतात सत्तेवर आले होते. श्रीगुप्तला गुप्त घराण्याचा संस्थापक मानतात. चिनी प्रवासी इित्सग याने श्रीगुप्तचे वर्णन केले आहे.
सम्राट पहिला चंद्रगुप्त (इ.स. ३१९ ते इ.स. ३३४) :
    गुप्त घराणे हे वैश्य असावे, असे इतिहासकारांचे मत आहे. तथापि, चंद्रगुप्तने क्षत्रिय असलेल्या लिच्छवी राजघराण्यातील कुमारदेवी या राजकन्येशी विवाह केला होता. या विवाहसंबंधामुळे चंद्रगुप्तला वैशालीचे राज्य आणि लिच्छवी जमातीचे साहाय्य मिळाले आणि त्या जोरावर त्याने आपल्या राज्याच्या चतु:सीमा वाढवून साम्राज्य प्रस्थापित केले. इ.स. ३२० मध्ये २६ फेबुवारी रोजी चंद्रगुप्तचा राज्यारोहण समारंभ झाला. त्या निमित्ताने त्याने आपल्या घराण्याचा शक- गुप्तसंवत या नावाने सुरू केला. त्याने महाराजाधिराज बिरुदही धारण केले. चंद्रगुप्तच्या कारकिर्दीत गुप्त राज्य बिहार आणि साकेतपर्यंतच्या उत्तर प्रदेशावर पसरलेले होते.
समुद्रगुप्त (इ.स. ३३५-३८०) :
   चंद्रगुप्तनंतर समुद्रगुप्त हा त्याचा पुत्र त्याच्या गादीवर बसला. त्याच्या दरबारातील कवी हरिषेण याने त्याच्या पराक्रमाची गाथा गायली आहे. ही प्रशंसा अलाहाबादेच्या अशोक स्तंभाखाली कोरलेली आहे. त्यात म्हटले आहे की, समुद्रगुप्तने प्रथम आपल्या राज्याच्या शेजारची अनेक राज्ये जिंकून मोठा साम्राज्यविस्तार घडवून आणला. त्याने राज्याचा विस्तार उत्तरेत हिमालयापासून ते दक्षिणेत नर्मदा नदीपर्यंत तर पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा नदीपासून पश्चिमेला यमुना नदीपर्यंत केला होता. या कुशल योद्धय़ाला ‘भारताचा नेपोलियन’ म्हटले जाते. त्याने दक्षिणेकडील राजांना पराभूत केले. मात्र, वाकाटक यांच्याशी संघर्ष केला नाही. समुद्रगुप्त कला आणि साहित्याचा थोर आश्रयदाता होता. तो विद्वान व कवी म्हणूनही प्रसिद्ध आहे.  
दुसरा चंद्रगुप्त ऊर्फ विक्रमादित्य (इ.स. ३८०-४१४): समुद्रगुप्तनंतर त्याचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त हा गुप्त सम्राट बनला. त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना म्हणजे त्याची शकांवरील स्वारी. उत्तर भारताच्या इतिहासात चंद्रगुप्तचे या शकांवरील विजयाचे महत्त्व मोठे आहे. शक हे परकीय राज्यकत्रे होते. त्यांचा अखेरचा अवशेष रूद्रसिंहच्या राज्याच्या रूपाने शिल्लक होता. चंद्रगुप्तने हे राज्य खालसा करून भारतीय भूमीवरील ३०० वष्रे अस्तित्वात असलेला शकांचा अंमल समाप्त केला. त्यामुळे त्याला इतिहासात ‘शकारी’ असे गौरवले आहे. शकांवरील या विजयानंतर त्याने ‘विक्रमादित्य’ हे बिरूद धारण केले असावे, असे इतिहासकारांचे मत आहे. दुसरा चंद्रगुप्त हा धोरणी राजा होता. शक व कुशाण या परकीय सत्तांचा पराजय करण्यापूर्वी आपल्या दक्षिणेकडील नाग व वाकाटक या दोन राजसत्तांशी वैवाहिक संबंध जोडून त्याने आपले राज्य सुरक्षित केले. मध्य प्रदेशातील कुबेरनागा या राज्यकन्येशी त्याने विवाह केला; तसेच आपली कन्या प्रभावती ही रुद्रसेन (दुसरा) या वाकाटक राजाला देऊन त्याच्याशी मत्रीचे संबंध जोडले.
याच राजाच्या कारकीर्दीत फाहियान या चिनी
   (इ.स. ३९९-४१४) प्रवाशाने भारताला भेट दिली होती. त्याने
गुप्त साम्राज्यातील शांतता व सुबत्ता यांची प्रशंसा
    केलेली आढळते.
चंद्रगुप्तच्या काळात भारतामधील व्यापार आणि उद्योगधंदे  
    भरभराटीला येऊन भारतवर्ष एक सुवर्णभूमी म्हणून
प्रसिद्ध्रीस आले. चंद्रगुप्तच्या आश्रयामुळे
    अनेक विद्यांचा आणि कलांचा विकास झाला.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com
             (भाग १)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc loksatta spardha guru march
First published on: 21-03-2015 at 09:48 IST