विठ्ठलाची निखळ भक्ती घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे शनिवारी शहरात आगमन झाले. पुणेकरांनी मोठय़ा उत्साहात पालख्यांचे स्वागत केले. पालख्यांच्या आगमनाने शहरात भक्तिचैतन्य साकारले. संत सहवास लाभल्याने आजचा दिवस जणू भाविकांसाठी भाग्याचा ठरला. दोन्ही पालख्या रविवापर्यंत शहरात मुक्कामी राहणार असून, सोमवारी त्या पुढील मुक्कामी मार्गस्थ होतील.
माउलींची पालखी सकाळी आळंदी येथील आजोळघरातून मार्गस्थ झाली. त्या वेळी आळंदीकरांनी मोठय़ा भक्तिभावाने पालखीला निरोप दिला. आकुर्डी येथील मुक्कामी असलेली तुकोबांची पालखीही सकाळी िपपरी-चिंचवडकरांचा निरोप घेऊन पुणे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली होती. शनिवारी पुण्यात पालख्या दाखल होणार असल्याने स्वागताची विविध संस्था व संघटनांच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. विविध माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याबरोबर त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेचीही लगबग सकाळपासूनच सुरू झाली होती. पालखी मार्गावर शहराच्या विविध भागामध्ये पालख्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते.
दुपारी पालख्यांचे रथ मार्गावरच असले, तरी वारकऱ्यांची रीघ त्यापूर्वीच शहरात सुरू झाली होती. खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ-मृदंगाचा गजर व ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा घोष करणारे वारकरी शहराच्या रस्त्यांवरून मार्गस्थ होताना दिसत होते. त्यामुळे नेहमी वाहनांच्या वर्दळीने गजबजलेल्या रस्त्यांचा नूरच पालटला होता. तुकोबांची पालखी बोपोडी येथून शहरात दाखल झाली. त्याचप्रमाणे माउलींची पालखी कळसगाव म्हस्के वस्ती येथून शहरात प्रवेशली. दोन्ही पालख्यांचे पालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
पालख्यांचे उत्साही स्वागत
दोन्ही पालख्यांच्या दिंडय़ा एकत्रित येत असलेल्या पुणे-मुंबई महामार्गावरील पाटील इस्टेट भागामध्ये पालिकेच्या वतीने दोन्ही पालख्यांचे एकत्रित स्वागतासाठी कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महिला, मुले, वृद्ध आदी सर्व वयोगटातील मंडळी पालखीच्या दर्शनासाठी जमली होती. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आकर्षक फुलांनी सजविलेला संत तुकोबांचा पालखीरथ पालिकेच्या स्वागत कक्षाजवळ आल्यानंतर भाविकांनी टाळ्या वाजवून पालखीचे स्वागत केले. पादुकांना स्पर्श करण्यासाठी या ठिकाणी एकच झुंबड उडाली होती. दर्शनासाठी काही काळ या ठिकाणी रथ थांबविण्यात आला.
तुकोबांचा पालखीरथ पुढे गेल्यानंतर माउलींच्या पालखीची प्रतीक्षा सुरू झाली. मागील वर्षीप्रमाणे यंदाही माउलींची पालखी संगमवाडीतून आणण्यात आली. संगमवाडी पूल पार करताच माउलींचा दिमाखदार रथ दिसू लागताच प्रत्येकाचे कर दर्शनासाठी जोडले गेले. पालखीवर फुलांचा वर्षांव करून स्वागत करण्यात आले. ‘माउली-माउली’ असा घोष सुरू झाला. पादुकांना स्पर्श करून दर्शनाचे भाग्य मिळविण्यासाठी प्रत्येक जण रथाकडे धाव घेत होता. मोठय़ा गर्दीतूनही पादुकांना स्पर्श झाल्याने एक अनोखे सुख मिळविल्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पालिकेच्या वतीने दोन्ही पालख्यांना पुष्पहार घालून महापौर चंचला कोद्रे यांनी स्वागत केले. वीणेकरी व दिंडय़ांच्या प्रमुखांना श्रीफळ देण्यात आले. खासदार अनिल शिरोळे, पालिका आयुक्त विकास देशमुख, पोलीस आयुक्त सतीश माथुर,  उपायुक्त माधव जगताप तसेच आशा साने, रेश्मा भोसले आदी या वेळी उपस्थित होते.
 पालखी मार्गाच्या दुतर्फाही उत्साह
शहरातून पालख्या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ होत असताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा उत्साह तर होताच, पण भाविकांच्या चेहऱ्यावरही पालख्यांच्या दर्शनाचा उत्साह जाणवत होता. मार्गाने जाणाऱ्या पालखी रथाकडे धाव घेऊन पादुकांना स्पर्श करण्यासाठी मार्गावर झुंबड उडाली होती. दुसरीकडे मार्गाने जाणाऱ्या वारकऱ्यांना पाणी व खाद्यपदार्थ देण्यासाठी अनेक हात पुढे येत होते. पुणे-मुंबई महामार्ग, संचेती चौक, विद्यापीठ रस्ता, फग्र्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. फग्र्युसन रस्त्यावर तुकाराम पादुका चौकामध्ये तुकोबांच्या पादुकांची पूजा व आरती झाली. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. रात्री माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामासाठी दाखल झाली. दोन्ही पालख्यांचा रविवारीही याच ठिकाणी मुक्काम असणार आहे.
ज्ञानेश्वर पादुका चौकात आरती नाहीच
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गावरून जात असताना फग्र्युसन रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकामधील मंदिरात पूर्वी पादुका नेऊन आरती घेतली जात होती. रस्तारुंदीकरणानंतर मंदिर मागच्या बाजूला गेल्याने ही परंपरा बंद करण्यात आली. मात्र, येथील नागरिकांचा व मंदिराच्या विश्वस्तांचा आरतीबाबत आग्रह कायम असल्याने मागील वर्षी रथावरच आरती घेण्यात आली. मात्र, यंदा या ठिकाणी रथ थांबलाच नाही. त्यामुळे आरती तर नाहीच, पण मोठय़ा संख्येने जमलेल्या भाविकांना पादुकांचे दर्शनही होऊ शकले नाही.
नव्या खासदारांनी लक्ष वेधले
पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षामध्ये महापौरांकडून स्वागत करण्यात येते. त्या ठिकाणी इतर पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व आमदारही उपस्थित राहत असतात. पुण्याचे खासदार या नात्याने पालख्यांचे स्वागत करण्यास फारसा कुणी रस दाखविलेला नव्हता. मात्र, नव्याने निवडून आलेले खासदार अनिल शिरोळे यांनी मात्र पालिकेच्या स्वागत कक्षात पालख्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली. त्या वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, मोठय़ा उत्साहाने वारकऱ्यांचे स्वागत करीत खासदारांनी लक्ष वेधून घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wari palanquin dnyaneshwar tukaram
First published on: 22-06-2014 at 02:35 IST