गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाजवादी पक्षाच्या वादात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सरशी झाली आहे. समाजवादी पक्षाचे चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, असा मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांचा दावा होता. यावर निर्णय देताना निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता समाजवादी पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह अखिलेश यादव यांना मिळाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मुलायम सिंह यादव यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार आणि नेत्यांचा असलेला पाठिंबा यामुळे अखिलेश यादव यांनी पक्षातील ‘दंगल’ जिंकली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातालीच समाजवादी पक्षातील यादवी उफाळून आली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव, पक्षाचे राज्यसभेतील खासदार राम गोपाल यादव विरुद्ध पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, त्यांचे बंधू शिवपाल सिंह यादव आणि अमर सिंह यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. दोन्ही बाजूंनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केल्याने अखेर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. अखेर निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल दिल्याने अखिलेश यांची ‘सायकल’ सवारी नक्की झाली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला समाजवादी पक्षातील वादाने टोक गाठले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या गटातील राम गोपाल यादव यांनी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावून त्यामध्ये अखिलेश यादव यांना पक्षाचे अध्यक्ष करण्याचा ठराव मांडला. राम गोपाल यादव यांनी मांडलेला हा ठराव मंजूर झाला. त्यामुळे ‘आता अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत’, असा दावा राम गोपाल यादव यांनी केला. मात्र ‘राम गोपाल यादव यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याने त्यांनी बोलावलेले अधिवेशन बेकायदेशीर आहे. मीच समाजवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हावर माझाच अधिकार आहे,’ असा प्रतिदावा मुलायम सिंह यादवांनी केला आहे. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला.

पक्ष आणि पक्षाचे चिन्ह यांचा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यावर अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षातील २०० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. आपल्याला पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचे अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाला सांगितले. त्यामुळे आकड्यांच्या गणितात अखिलेश यादव खूपच वरचढ ठरले आणि त्यांचा सायकवर स्वार होण्याचा मार्ग मोकळा झाला.