वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे भाजप खासदार साक्षी महाराज यांनीही आता कब्रस्तान (दफनभूमी) आणि स्मशानभूमी वादात उडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कब्रस्तान आणि स्मशानभूमीबाबत केलेल्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे. पंतप्रधानांच्या विधानाशी मी सहमत नाही. कब्रस्तान आणि स्मशानभूमीला समान दर्जा मिळणे हे मी कधीच स्वीकारणार नाही. कब्रस्तान बनलेच नाही पाहिजे, जर कब्रस्तानमध्ये भारताची सर्व जमीन गेली तर शेती कुठं करणार, असा सवाल साक्षी महाराज यांनी उपस्थित केला.

कब्रस्तान असो की स्मशानभूमी प्रत्येकाचे दहन होणे आवश्यक आहे. कोणालाही दफन करण्याची गरज नाही. देशात २ ते २.५ कोटी साधू आहेत. या सर्वांनी समाधी घेतली तर त्यांना  किती जमीन लागेल. तसेच २० कोटी मुसलमान आहेत. या सर्वांना कब्रस्तान हवे. भारतात इतकी जमीन कोठून आणणार, असा सवाल साक्षी महाराज यांनी केला. विशेष म्हणजे साक्षी महाराज यांनी एका जागेवर कब्रस्तान आणि स्मशानभूमी बनवण्याचा प्रस्ताव दिला असून यासाठी एक कायदाही बनवण्याची सूचना केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील एका प्रचारसभेत धर्माच्या आधारावर भेदभाव न करण्याचे आवाहन केले होते. जर गावात कब्रस्तानला जमीन मिळते तर स्मशानभूमीलाही जमीन मिळाली पाहिजे. तसेच रमजानमध्ये विना व्यत्यय वीज मिळते. त्याचप्रमाणे दिवाळीतही मिळाली पाहिजे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतला होता. याचदरम्यान आता साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे.