News Flash

उत्तर प्रदेशात गुंडाराज!

नरेंद्र मोदी यांचे फतेहपूर येथील प्रचारसभेत समाजवादी पक्षावर टीकास्त्र

| February 20, 2017 01:38 am

उत्तर प्रदेशात रविवारी फतेहपूर येथे झालेल्या निवडणूक रॅलीला अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नरेंद्र मोदी यांचे फतेहपूर येथील प्रचारसभेत समाजवादी पक्षावर टीकास्त्र

उत्तर प्रदेशात ‘गुंडाराज’ सुरू असून, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात सत्ताधारी समाजवादी पक्ष सपशेल अपयशी ठरला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रचारसभेत केली.

बलात्काराच्या प्रकरणात मंत्र्याविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला, याचा दाखला देत मोदी यांनी समाजवादी पक्ष आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना लक्ष्य केले. ‘‘उत्तर प्रदेशात पोलीस यंत्रणा अकार्यक्षम का आहे? तक्रारी नोंदविल्या का जात नाहीत? सर्वोच्च न्यायालयाने तडाखा दिल्यानंतर पोलिसांनी मंत्री गायत्रीप्रसाद प्रजापती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तरप्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, पोलिस ठाणी ही समाजवादी पक्षाची कार्यालये बनली आहेत’’ असा घणाघात मोदी यांनी केला.

‘‘आपला खेळ संपणार हे अखिलेश यादव यांना कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज उडाले असून, त्यांचा आवाजही क्षीण झाला आहे’’ असा टोलाही मोदी यांनी अखिलेश यांना लगावला. मुलायमसिंह आणि अखिलेश या पितापुत्रातील वादावरूनही मोदी यांनी अखिलेश यांना लक्ष्य केले.  उत्तर प्रदेश हे माझ्या मायबापासारखे आहे. मी आपल्या मायबापाला दूर लोटणारा मुलगा नाही. मी नेहमीच उत्तर प्रदेशची काळजी घेईन, असे मोदी म्हणाले.

समाजवादी पक्षाने कॉंग्रेसशी आघाडी करून राम मनोहर लोहिया यांचा अवमान केला आहे, अशी टीकाही मोदी यांनी केली. ‘‘ तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना राजकीय स्थितीची जाणीव होऊ लागल्याने त्यांनी समाजवादी पक्षासोबत युती केली’’ अशा शब्दांत मोदी यांनी राहुल यांना लक्ष्य केले.

छत्रपती शिवाजी आदर्श राजा

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. त्यांच्या आदर्शानुसार आपले सरकार अथकपणे काम करत आहे, असे सांगत मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त रविवारी शिवरायांना अभिवादन केले. ‘‘शिवजयंतीनिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतो. असा शूर राजा आपल्या मातीत जन्मल्याचा भारताला अभिमान आहे’’ असे मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 1:37 am

Web Title: up elections 2017 narendra modi samajwadi party
Next Stories
1 UP Assembly Election Phase 3 Polling : तिसऱ्या टप्प्यात ६१.६ टक्के मतदान
2 प्रियांका गांधी या बलात्कारी आणि गुंडांसाठी मत मागतात: भाजप
3 उत्तर प्रदेशला दत्तकपुत्राची गरज नाही
Just Now!
X