उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून, मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या बुरखाधारी महिलांची ओळख पटवण्यासाठी तपासणी करा, अशी मागणी उत्तर प्रदेश भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. बुरखाधारी महिलांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक बूथवर महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावेत, असेही भाजपने म्हटले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अनुक्रमे ४ मार्च आणि ८ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच भाजपने निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानावेळी बुरखाधारी महिलांची ओळख पटवण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी महिला पोलिसांकडून बुरखाधारी महिलांची तपासणी होणे आवश्यक आहे, असे भाजपने म्हणणे आहे. भाजपच्या या मागणीने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि निवडणूक व्यवस्थापन प्रमुख जे. पी. एस. राठोड आणि पक्षाचे प्रशासकीय प्रमुख कुलदीप पती त्रिपाठी यांनी या मागणीचे पत्र दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालय आणि उत्तर प्रदेशातील निवडणूक आयोगाला पाठवले आहे. विधानसभा निवडणुकीत महिला मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर येतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवता यावी, यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ असायला हवे. बोगस मतदान रोखण्यासाठी हे आवश्यक आहे, असेही भाजपने म्हटले आहे. संवेदनशील आणि अति संवेदनशील मतदान केंद्रांवर अर्ध सैनिक दलाचे जवान तैनात करण्यात यावेत अशीही मागणी भाजपने केली आहे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर केवळ पुरुष पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या बुरखाधारी महिलांची तपासणी करू शकत नाहीत. जर महिला पोलीस तैनात केल्या तर, त्यांच्यामार्फत बुरखाधारी महिलांची तपासणी करून ओळख पटवता येऊ शकते, असे जे. पी. एस. राठोड यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. बूथवर महिला पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. मात्र, मतदारांची ओळख पटवण्यासाठी त्यांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना नाही, असे निवडणूक अधिकारी प्रमोदकुमार पांडे यांनी सांगितले.