अखिलेश यादव यांच्यासारखा तरुण नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने अपेक्षा वाढल्या होत्या. पण अखिलेश यादवने निराश केले असून समाजवादी पक्षाने गुंडांना आधार दिला. पण भाजपचे सरकार आल्यास उत्तरप्रदेशला ‘उत्तम प्रदेश’ करुन राज्याचा १४ वर्षांचा वनवास संपवणार असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

उत्तरप्रदेशमधील (UP Assembly Election 2017)  पहिल्या टप्प्यातील मतदानाला दोन दिवस उरले असतानाच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गाझियाबादमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत मोदींनी उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन सत्ताधारी समाजवादी पक्षावर टीका केली. अखिलेशने आपल्या कुटुंबाचे काय केले, हे जनतेला माहित आहे. जी लोक राज्याला कधी उत्तर देत नाही ती लोक राज्याचा विकास काय करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.  उत्तरप्रदेशमध्ये संध्याकाळी महिला घरातून बाहेर पडू शकत नाही आणि हे या राज्याचे दुर्दैव आहे. पण जर धाडसी असाल आणि तुमचा हेतू चांगला असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा निर्माण होऊ शकेल असा दावाही मोदींनी केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची सत्ताधा-यांना कसलीही चिंता नाही आणि ते याची जबाबदारीही घेत नाही. राज्यातील हे दु्र्दैवी चित्र बदलण्याची गरज असल्याचे मोदी म्हणालेत. उत्तरप्रदेशमध्ये भाजपची सत्ता होती त्यावेळी गुंडगिरी करणा-यांना तुरुंगात धाडले होते आणि त्यामुळे सगळे सुधारलेही होते अशी आठवण त्यांनी करुन दिली.  उत्तरप्रदेशमध्ये रोजगार ही एक प्रमुख समस्या आहे. पण राज्यातील तरुणांना कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी आणि वेळही दिला जात नाही. पण राज्यात योग्य व्यक्ती सत्तेवर आली की उत्तर प्रदेशही चांगले राज्य बनू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस असो किंवा सपा, बसपा या सर्वांनी देशाला बुडवले आणि स्वतःदेखील बुडाले. आता अखिलेश यादव ऐवढे घाबरलेत की जो भेटेल त्याला मिठी मारतात असे सांगत त्यांनी काँग्रेस – सपा आघाडीवर टीका केली. राज्यातील शेतक-यांविषयी मोदी म्हणाले, राज्यातील शेतक-यांची जमीन घेणा-यांना तुरुंगात पाठवले जाईल, शेतक-यांची जमीन परत केली जाईल. यासाठी आम्ही कायदा तयार केला असून यापुढे कोणत्याही बिल्डरने मनमानी करत जमीन लाटल्यास त्याला तुरुंगात जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली असून भाजप स्वबळावर लढणार आहे. अशा स्थितीत आघाडीला रोखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. उत्तरप्रदेशमधील निवडणुकीकडे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून बघितले जाते. त्यामुळे या निवडणुकीतील विजय मोदी आणि अमित शहा या जोडीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Live Updates
14:29 (IST) 8 Feb 2017
अखिलेश इतके घाबरलेत की जो भेटला त्याला सोबत घेऊन निवडणूक लढत आहेत- मोदी
14:23 (IST) 8 Feb 2017
आजकाल त्यांच्या भाषणाची १० मिनिटे दिल्ली सरकारला बोल लावण्यात जातात. जरा ५ मिनिटांमध्ये तुमच्याही कामांचा हिशोब द्या- मोदी
14:22 (IST) 8 Feb 2017
योग्य सरकार सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेश उत्तम प्रदेश बनू शकतो- मोदी
14:21 (IST) 8 Feb 2017
मुली शाळेत जायला घाबरतात. समाजवादी पक्षाने गुंड पोसल्याने उत्तर प्रदेशची अवस्था दयनीय आहे- मोदी
14:20 (IST) 8 Feb 2017
२०१९ च्या निवडणुकीत सर्व गोष्टींचा हिशोब देईन- मोदी
14:19 (IST) 8 Feb 2017
अखिलेशने जनतेला निराश केले, उत्तर प्रदेशचा विनाश केला- मोदी
14:19 (IST) 8 Feb 2017
अखिलेश युवा, सुशिक्षित असल्याने त्यांच्याकडून जनतेला आशा होती- मोदी
14:18 (IST) 8 Feb 2017
अखिलेशने वडिल, काका यांचे काय केले, हे जनतेला माहित आहे- मोदी
14:17 (IST) 8 Feb 2017
मुलांना सरकारी नोकरी मिळावी म्हणून गरिबांना जमीन, दागिने गहाण ठेवावे लागायचे- मोदी
14:15 (IST) 8 Feb 2017
१४ वर्षांत विकास झालाच नाही. ही निवडणूक विकासाचा वनवास संपवणारी- मोदी