26 May 2020

News Flash

इकडून तिकडे आणि तिकडून इकडे…

फिरायला बाहेर पडतानासुद्धा माणसे हातात फोन घेऊनच जातात.

साध्या (म्हणजे ‘स्मार्ट’ नसलेल्या) फोनची मॉडेल्स अलीकडे बाजारात फारशी मिळत नाहीत. त्यामुळे जवळजवळ ९० ते ९५ टक्के जनता आता ‘स्मार्ट’ झालीय. रस्त्यातून चालताना, बसमधून प्रवास करताना, नाटक-सिनेमाच्या मध्यंतरात (क्वचित तिकडे नाटक सिनेमा सुरू असतानासुद्धा) माणसे फोनमध्ये डोकं घालून बसलेली दिसतात. अगदी सकाळी फिरायला बाहेर पडतानासुद्धा माणसे हातात फोन घेऊनच जातात. एक प्रकारची नशाच ती. कारण उघड आहे. स्मार्ट फोनचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे सोशल नेटवर्किंग. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर हे लोकप्रिय प्रकार.

इतर पुष्कळशा साइट्सवर काय चालतं माहीत नाही, पण फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपचा जो अनुभव मी घेतला तिथे माझी मात्र निराशाच झाली. वाढदिवसाची भेट म्हणून स्मार्ट फोन मिळाला. कॉम्प्युटरच्या वापरामुळे त्या फोनचा वापर सोपा झाला. मग मैत्रिणीच्या मुलीने व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करायला लावलं. ‘‘वारंवार भेटायला मिळत नाही, असं तरी भेटा’’ म्हणाली. व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड झालं. नंबर आहे, तरी फोनवर फारसं बोलणं होत नाही अशा कितीतरी लोकांशी रोज संपर्क व्हायला लागला. गंमत वाटायला लागली. फोनवर बोलायचं तर दोघांना वेळ सोयीची हवी ही मुख्य अट आता राहिली नाही. आपल्या मनात येईल तेव्हा कुणालाही काहीही निरोप ‘टाकून’ ठेवण्याची ही सोय खूपच लोकप्रिय आहे हे लक्षात आलं. बघावा तो माणूस इथे हजर. कारण निरोप काय एसेमेसवरूनसुद्धा देता येतो, पण त्याला पैसे पडतात. इथे सगळा ‘चकटफू’ मामला. मग निरोप ‘टाकणं’ अंगवळणी पडलं. वेगवेगळे ग्रुप्स झाले. एका मैत्रिणीने म्हटलं, ‘‘माझ्या नातीचे फोटो फेसबुकवर टाकलेत, बघ.’’ मग फेसबुक सुरू झालं. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या-स्वीकारल्या. धमाल सुरू झाली. फेसबुकवर जुन्या मैत्रिणी शोधता आल्या. गंमत आणखी वाढली. दुपार-संध्याकाळचा फावला वेळ चुटकीसरसा उडू लागला.

हळूहळू लक्षात आलं की व्हॉट्स अ‍ॅपवर कामाचे, गरजेचे, तातडीचे निरोप अगदी थोडे असतात, इकडून-तिकडे सरकवलेले (ऋ१६ं१ीि)ि सुविचार, उतारे, व्हिडीओ क्लिप्स यांचं प्रमाण जास्त आहे. दिवसेंदिवस वाढतंय. मी बाई-आई-बायको-सासू-सून आहे तर कशी ‘बिचारी’ आहे हे सांगून गहिवर आणणाऱ्या(!) कविता, बालसंगोपनावरचे-बालमानसशास्त्रावारचे उतारे, जुन्या गोड-गोड काळातल्या आठवणींचे कढ, मुलांपेक्षा मुली(च) कशा गोड-गुणी त्याची वर्णनं, जोक्स, नागपंचमी-गणपती-नवरात्र-दसरा-दिवाळी (वसुबारस-धनत्रयोदशीपण) अशा प्रसंगी शुभेच्छांचा पाऊस. साधा नाही, अगदी मुसळधार. खुट्ट काही झालं-केलं की लगेच फोटो आलाच. मग त्यावर लगेच स्मायलीजचं उत्तर. चकल्या-वडय़ा-लाडू-कंदील-पणत्या कशाचा फोटो नाही ते विचारा. आपण काय वाचतो-सरकवतो हे लक्षात ठेवायचे कष्टसुद्धा कुणी घेत नाही. एखादी पोस्ट-कविता एकाच ग्रुपवर दोन-दोन तीन-तीन वेळा फिरते. मग मी सरकवलेले सुविचार-उतारे-कविता वाचून त्यावर आपलं मत नोंदवू लागले. तर त्यावर सगळ्यांचं मौनव्रत. फार फार तर एखादा स्मायली. थम्सअपसारखा अंगठा उंचावून किंवा पहिलं बोट आणि अंगठा जुळवून आपण छान अशी खूण करतो तशी. या दोन स्मायली सर्वात जास्त लोकप्रिय. मग हात जोडलेली, टाळ्या वाजवणारी यांचा नंबर. नुसतं स्मित करणारी, हसून डोळ्यात पाणी आलेली, डोळे मिचकावणारी, डोळे मिचकावत जीभ बाहेर काढून दाखवणारी अशा कितीतरी स्मायली. स्वत:चं असं कुणाला काही म्हणायचंच नव्हतं. क्वचित कधी कुणी टवाळकी करणारे मेसेज सरकवतात, घरबसल्या थोडी गंमत. एकदा एका टवाळकीवर मीपण खोडसाळ कॉमेंट दिली, तर माझी समजूत घातली गेली, ‘‘इकडच्या पुष्कळशा पोस्ट या सरकवलेल्या असतात. त्या गंभीरपणे घ्यायच्या नसतात.’’ मी थक्क. असेल पोस्ट सरकवलेली, पण समोरच्याने काढलेल्या मजेशीर खोडीला आपण नुसत्या स्मायली का टाकायच्या? तसंच खोडकर उत्तर द्यायला काय हरकत आहे? गंमत दोन्ही बाजूंनी केली-समजली तर जास्त मजा नाही का?

फेसबुकवर टाकलेल्या युरोप सहलीच्या फोटोत लंडनच्या आय फ्लायरवरून दिसणारं लंडन किंवा आयफेल टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावरून दिसणारं पॅरिस यापेक्षा आय फ्लायरमध्ये ‘मी’ किंवा आयफेल टॉवरवर ‘मी’ असेच फोटो जास्त. इटलीतल्या अतिशय आकर्षक निळ्या आकाशाच्या फोटोपेक्षा पडणारा पिसाचा मनोरा सावरताना ‘मी’ या फोटोचा तर धसकाच घेतला. पट्टाया बीचवर पॅरा सर्फिग करताना, अंदमानच्या सेल्युलर जेलसमोर, केरळच्या पेरियार जंगलात, ताजमहाल तळहातावर घेऊन, काश्मिरी वेशात, राजस्थानी वेशात, नवी साडी नेसून, लेटेस्ट स्टाइलचा ड्रेस घालून, बाइकवर बसून, ड्रायव्हिंग शिकताना, आइस्क्रीम खाताना, इकडे-तिकडे, वर-खाली फक्त ‘मी’चे फोटो. त्यावर शेकडो लाइक्स-ग्रेट, ऑसम अशा ठरावीक कॉमेंट्स. दर दोन दिवसांनी वेगळं प्रोफाइल पिक्चर. त्यावर परत लाइक्स. मग मी हळूहळू फोटो पाहून ‘अमुक’ ठिकाणी ‘तमुक’ आहे असं ऐकलंय ते पाहिलंत का असं विचारायला लागले. तिकडे काय पद्धत असते, अमुक कसं असतं, आणखी काय जाणवलं-लक्षात आलं अशा प्रश्नांना पद्धतशीर बगल मिळतेय असं माझ्या लक्षात आलं. केवळ दोन तास इतकं वय असलेल्या बाळाचे फोटोसुद्धा आले. ज्याचे नाक-डोळे नीट दिसतसुद्धा नाहीयेत ते बाळ कसं ‘क्यूट’ दिसतंय, कोणासारखं दिसतंय त्याची चर्चा. काहीतरी छान वाचलं तर त्याची लिंक क्वचित कुणी द्यायचं, क्वचित कुणी काही वेगळं लिहिलं तर तेवढय़ापुरत्या त्या ‘फ्रेंड’शी वेगळ्या विषयावर गप्पा-म्हणजे ऑनलाइनच. आपण काय वाचलं ते सांगितलं. एरवी सगळा ‘आनंदी आनंद गडे’ असा प्रकार. एक-दोन वेळा काही कलाकारांना सिनेमा-नाटक आवडल्याबद्दल कौतुकाचे दोन शब्द किंवा काही न आवडल्याबद्दल नाराजी फेसबुक अकाउंटवरून. मग एक दिवस एका अनोळखी माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. दुर्लक्ष केलं तरी परत परत आली. अशा रिक्वेस्ट कायमच्या नाकारण्याची पद्धत (१ीस्र्१३ २स्र्ंे) माहीत नव्हती. कुणाला विचारून काही करावं इतका उत्साह उरला नव्हता. मग सरळ फेसबुक अकाउंट बंद करून टाकलं. दोन दिवस जरा चुकल्या-चुकल्यासारखं झालं, पण नंतर लक्षात आलं की फारसा काही फरक पडत नाहीये आपल्याला हे नसलं म्हणून. ठीक आहे. नकोच पुन्हा चालू करायला. व्हॉट्स अ‍ॅप सुरू आहे ते पुरेसं आहे. अगदीच जगाशी संपर्क नको तुटायला.

मग अमीर खानचं ‘ते’ वादग्रस्त विधान प्रसिद्ध झालं. ‘पिंगा’ घुमला, ‘वाट लागली’, सलमान खान निर्दोष सुटला आणि त्या संबंधातले उतारे, फोटो, जोक्स, गाजलेल्या गाण्यांचं सभ्यतेची पातळी सोडून केलेलं विडंबन. व्हॉट्स अ‍ॅपवर काय काय आलं त्या चार दिवसांत. पॅरिसकांड घडलं. कर्नल महाडिक गेले. चेन्नई पाण्याखाली गेलं. त्याच्या क्लिप्स, तिकडचे वृत्तांत. वस्तुस्थिती दाखवणारे, काळजाचा थरकाप उडवणारे, क्वचित अतिरंजित. जोडीला निर्वासितांच्या लोंढय़ांमुळे अस्वस्थ झालेल्या युरोपियन जनतेच्या प्रतिक्रिया आणि व्हिडीओ क्लिप्स. पण कुठेही, कशावरही स्वत:चं काही मत नाही. फक्त स्मायली. इतकं काही घडतंय देशात-परदेशात, आपल्या आजुबाजुला; कुणाला काही म्हणायचं नाहीये त्याच्यावर ?

वैयक्तिक टीका नाही कुणी करणार या माध्यमात, पण सुशिक्षित माणसांनी काही निवडक सार्वजनिक विषयांवर-घटनांवर आपली मतं आवर्जून व्यक्त करायलाच हवीत. खरं म्हणजे रोज उठून कुणाच्या भेटी होत नाहीत, वेळेची बंधनं असतात तर या माध्यमातून किती विषयांवर किती प्रकाराने चर्चा होऊ  शकेल. या माध्यमाची ताकद पुरती कळलीच नाहीये आपल्याला; का आपण आपल्या संवेदना गोठवून ठेवल्यात! प्रत्येक सुविधेचा-तंत्रज्ञानाचा दुरुपयोग आणि अतिरेक हेच आपलं सामाजिक वास्तव आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवन सोपं करायचं, का नसत्या नशेत अडकून स्वत:ला फसवत राहायचं? होय-  सुरुवातीला म्हटलं तशी ही माध्यमे नशाच झालीयेत आता कित्येकांसाठी. बेचैन होतात माणसे फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपशी संपर्क तुटला तर! या आभासी सामाजिक संबंधांच्या अतिरेकाने खरे नातेसंबंध दुरावत असल्याचं निरीक्षण मानसशास्त्रज्ञांनी आणि समाजशास्त्रज्ञांनी नोंदवलंय. आणि या अशा संबंधांतूनसुद्धा विशेष काही हाती लागतच नाही. दुसऱ्याच कुणीतरी काहीतरी लिहिलेलं तिसऱ्याला सरकवत राहायचं – स्मायली टाकायच्या. हेच आणि इतकंच!!!
राधा मराठे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 1:10 am

Web Title: blog social media addiction
टॅग Social Media
Next Stories
1 सायकल ते सायकल
2 दगडूबाई
3 वडय़ाचं तेल वांग्यावर!
Just Now!
X