News Flash

कुठून येतो हा स्वाभिमान?

ठाणे स्टेशन हे तसे नेहमी गर्दीचे ठिकाण मग ती कुठलीही वेळ असो.

ठाणे स्टेशन हे तसे नेहमी गर्दीचे ठिकाण मग ती कुठलीही वेळ असो. ट्रान्स हार्बर लाइन येथे मिळत असल्यामुळे प्लॅटफॉर्म नं. दहा आणि तिथून पलीकडे जाणारा ब्रिज हा नेहमी गर्दीचाच. त्या दिवशी ही नेहमीचीच सकाळ, सगळ्यांची कामावर जायची घाई. तसेही मुंबईमध्ये वेळेवर पोचायचे असो व नसो सगळे जण घाईतच असतात. मीही वाशी लोकलने उतरल्यावर प्लॅटफॉर्म दहा पार करून जाण्यासाठी सगळ्यांना धक्केबुक्के देत, काहींचे घेत जिना घाईघाईने चढू लागलो अर्थात मीही त्या गर्दीचाच एक भाग होतो आणि ध्येय काय तर लवकरात लवकर जिना पार करून पलीकडची उरळ लोकल पकडायची.

जवळपास अर्धा जिना चढलो असेन मी आणि अचानक एका आवाजाने माझे लक्ष वेधून घेतलं. जरा सुरुवातीला दुर्लक्ष केलं मी, कारण आजकाल कोणाला कोणाकडे पाहायला एवढा वेळ असतो असेच म्हणतो आपण नाही का? पण सहजच मान वळवून मागे पाहिले आणि लक्षात आलं की खालून एक दिव्यांग भिकारी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मदतीसाठी याचना करत होता. पण कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. त्याच्या त्या केविलवाण्या नजरेकडे पाहून काय वाटले कोणास ठाऊक त्याला मदत करायचे मनात ठरवले आणि तेवढय़ा गर्दीतून सगळ्यांच्या शिव्या खात उलट माघारी फिरून खालच्या पायरीवर जिथे तो बसला होता तिथे आलो.

त्याची ती नजर मोठय़ा आशेने माझ्याकडे पाहत होती. क्षणभर विचार केला कशासाठी हा सगळ्यांना हाक मारतोय, पैशासाठी?? नाही तसं तर काही वाटत नव्हते.  मला समजून चुकले ही दिव्यांग आहे आणि याला वर जाता येत नाही आणि त्यासाठीच हा सगळ्यांकडे मदत मागतोय. त्याला मी काही विचारायच्या आतच तो बोलला ‘‘गाडी.. गाडी.. वर नेऊन द्या की ..’’ मी बाजूला एक कटाक्ष टाकला तर तिथे एका फळीला चार चाके लावलेली एक छोटी गाडी होती. बहुधा हा त्याच्यावरून हाताच्या साहाय्याने ये-जा करत असावा.

‘‘चला  .. मी नेतो तुम्हाला..’’

‘‘नगं  .. फक्त गाडी वर नेऊन द्या.  मी येन स्वत:’’ तो बोलला.

मी थोडा आश्चर्यचकित झालो. अरे नुसती गाडी वर नेण्यासाठी हा मदत मागतोय आणि हा वर येणार कसा? हा तर दिव्यांग! पण विचार केला की एवढा बोलतोय तर आधी गाडी तर वर नेऊन ठेवूया. मग बघूया पाहिजे तर याला आणायला परत येऊ या खाली.

त्याही परिस्थितीत  जेवढी आवश्यक आहे तेवढय़ाच मदतीची अपेक्षा ठेवून त्याने आपला स्वाभिमान जपून ठेवला होता याचे मला कौतुक वाटले.

मग थोडी गर्दी ओसरल्यावर त्याची ती गाडी उचलून मी पटापट जिने वर चढून जाऊ  लागलो. हे सर्व चालू असताना काही कुत्सित नजरा माझ्याकडे पाहत असल्याचं मला जाणवलं.   कदाचित विचार करत असतील काय करतोय हा त्या घाणेरडय़ा भिकाऱ्याकडे काय माहीत. चाललाय मोठा समाजसेवा करायला!! पण मी सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती गाडी वर नेऊन ठेवली. विचार केला की आता याला वर आणण्यासाठी मदत करूया आणि वळून जिना उतरणार इतक्यात पाहतो तर काय तो दिव्यांग भिकारी निव्वळ आपल्या हाताच्या जोरावर जिने चढत होता. ज्या गतीने तो ते जिने चढत होता (चढत कसला फरफरटतच येत होता.) त्याची ती गती पाहून मी थक्क झालो. त्याचे हे नेहमीचेच असणार हे मला जाणवलं.

वर आल्यावर एक हात वर करून थोडा हसरा चेहरा करून त्याने माझे आभार मानले. त्याची ही आभारप्रदर्शनाची खुबी मला मात्र भावली. मीही थोडा घाईत असल्यामुळे पटकन तिथून निघून माझ्या कामाला निघालो.

पण चालत चालत सहज एक विचार मनात आला, काय मागितलं होतं त्याने? पैसा? नाही. मग! फक्त एक क्षुल्लक मदत. पण तीही करायला कोणाकडे वेळ नव्हता. तोही एक माणूसच आहे फक्त परिस्थितीने गांजलेला हे आपण विसरून जातो आणि आपल्या तर तो खिजगणतीतही नसतो.

खरेच आपण आपल्या विश्वात एवढे गुरफटून जातो की कोणी आपल्याकडे साहाय्य मागितलं तरी ते आपल्याला जमत नाही मग ती क्षुल्लक का असेना. खास करून खालच्या स्तरातील व्यक्तीने. खरंच का जमत नाही आपल्याला?

पण कधीतरी दुसऱ्याला नि:स्वार्थी भावनेने मदत करून पाहायला काय हरकत आहे. बघा किती समाधान लाभेल ते.
मयूर सानप – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2016 1:15 am

Web Title: pride
Next Stories
1 अतिपाणी आणि पाणीच नाही
2 फुलांचा आनंद
3 लतीची शिकवणी
Just Now!
X