18 September 2019

News Flash

अमृततुल्य चहा

इंद्राला ताकसुद्धा दुर्लभ झालं होतं. तसाच देवांना चहादेखील माहीत नव्हता.

तक्रं शक्रश्च दुर्लभा:

इंद्राला ताकसुद्धा दुर्लभ झालं होतं. तसाच देवांना चहादेखील माहीत नव्हता. भक्त चहा पितात आणि तो अमृततुल्य आहे एवढंच त्यांना माहीत होतं!

भक्ता हाती चहा पाहुनि

देवा वाटे हेवा,

म्हणू लागले एक मुखानी

आम्हालाही तो हवा.

अमृतही आता कडू जाहले,

गोड न लागे जीवा

घरी जाऊनि हट्ट करिती,

आम्हाला चहा हवा.

आता काय करायचं? तो कसा बनवायचा? हे कुणालाच माहीत नव्हतं. नारदावर सोपवावी कां ही कामगिरी; असं वाटू लागलं. पण लक्ष्मी, पार्वती स्वत:च शिकण्याचा विचार करू लागल्या.

लक्ष्मी, पार्वती,

शारदा आल्या पृथ्वीवरी

चहा शिकण्याची एकच

इच्छा होती त्यांच्या उरी.

कोण शिकवते?

कुठे शिकवते प्रश्न त्यांना भारी.

सारी उत्तरे मिळाली त्यांना सुगरणीच्या दारी.

चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्यानी सांगितले हेते की, पिण्याचे पाणी नेहमी उकळून प्यावे. ते शुद्ध आणि स्वच्छ असते.

राजाचा राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे.

भारतात आणि जगातही पाण्यानंतर चहा हे पेय जास्तीतजास्त प्यायले जाते. चहाला जगभर पार्टीचं स्वरूप आलेले आहे. चीनमध्ये ‘गॉमफाय’ टी सेरीमनी असते. मुद्दाम मातीच्या भांडय़ात चहा देतात. त्याला थिक्सिंग टी पॉट म्हणतात. आजही आपल्या वधू- वर संशोधनाच्या वेळेस  वाफाळलेला चहा आणि पोहे पार्टी असते. जपानमध्ये चहा सादर करणे ही कला आहे.

चहा करण्याचे प्रकार –

  • मोगली चहा : चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा पावडर, एक कप दूध, जायफळ, जायपत्री, वेलदोडा लवंग केशर ह्यंची पूड प्रत्येकी पाच चमचा.

कृती : पाणी आणि साखर उकळवून घ्यावे. त्यात सर्व पुडी टाकण्यात पुन्हा एक मिनिट उकळावे. त्यानंतर चहापूड टाकून तीन मिनिटे झाकून ठेवावे. गाळून घ्यावा. गरम प्यावा.

  • काश्मिरी काहवा : चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा, दहा-बारा बदामांचे काप, पाव चमचा केशर.

कृती : पाणी साखर उकळावे. त्यात चहा टाकावा. तीन मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंर गाळून त्यात बदामाचे काप आणि केशर टाकावे.

  • मसाला चहा : मसाल्याची कृती – ५० ग्रॅम, सुंठपूड, लवंग, वेलदोडे, जायफळ, दालचिनी, काळीमिरी, बडिशेप ह्यांची पूड प्रत्येकी एक चहाचा चमचा. सर्व पुडी एकत्र करून झाकणाच्या बरणीत ठेवावा.

कृती : चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहापूड, एक चमचा चहाचा मसाला, एक कप दूध.

पाणी आणि साखर उकळून घ्यावे. एक चमचा टाकून पुन्हा उकळावे. त्यानंतर चहा पूड टाकून तीन मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंतर गाळून गरम दूध टाकून गरमच प्यावा. थंडीत, पावसाळ्यात हा चहा रोज प्यावा. अतिशय गुणकारी आहे.

चहा हे थंड पेयदेखील आहे. थंड चहाचे अनेक प्रकार आहेत. लेमन, ऑरेंज, पायनापल, स्ट्रॉबेरी, विडय़ाच्या पानांचा रस घालून थंड चहा करता येतो.

थंड चहाची बेसिक कृती आधी पाहू या.

चहाची बेसिक कृती – चार ग्लास पाणी, तीन चमचे चहाची पूड, चार चमचे साखर, पाणी, साखर उकळून घ्यावे. त्यात चहा पूड टाकावी. (हा चहा जास्त स्ट्राँग करू नये.) तीन मिनिटांनी गाळून घ्यावा. गार झाल्यावर आवडीप्रमाणे संत्रे, अननस, मोसंबी किंवा स्ट्रॉबेरी ह्यंचा रस एक कप घालावा. फ्रिजमध्ये थंड करावा. दोन तासांनी प्यावा.

विडय़ाच्या पानांच्या रसाचा चहा करावयाचा असल्यास प्रथम बेसिक चहा करताना पाणी साखर उकळवावे. त्यानंतर त्यात लवंग, जायफळ, वेलदोडे पूड प्रत्येकी अर्धा चमचा टाकावी. त्यानंतर गुलकंद, गुंजेचा पाला टाकून एक मिनिट उकळावे. त्यानंतर चहा पूड टाकून झाकून ठेवावे. चहा गाळून गार होऊ द्यावा. विडय़ाच्या दहा पानांत दीड कप पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून पाणी गाळून घ्यावे. हे पाणी चहात टाकावे. फ्रिजमध्ये दोन तास गार करण्यास ठेवावे.

‘लेमन’ टी करताना वर सांगितलेल्या चार ग्लास बेसिक चहात गार झाल्यावर एका लिंबाचा रस टाकावा.

  • पीच टी : चार जरदाळू, चार ग्लास पाणी, चार चमचे चहा, चार चमचे साखर

कृती : प्रथम जरदाळू दोन तास, एक कप पाण्यात भिजत घालावेत. बिया काढून मिक्सरमध्ये वाटून रस काढावा. चार ग्लास पाणी, साखर उकळावे. त्यात चहा पूड टाकून गाळून घ्यावे. गार झाल्यावर जरदाळूचा रस टाकावा. दोन तास फ्रिजमध्ये ठेवून गार करून प्यावा.
शुभदा सुरंगे – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 2, 2016 1:07 am

Web Title: tea 4