साहित्य : १ जुडी कोथिंबीर, एक कांदा, एक उकडलेला बटाटा, चणा डाळ पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ, मीठ, साखर, धने-जिरे पावडर, तीळ, तेल तळण्यासाठी घ्यावे.

कृती : प्रथम कोथिंबीर बारीक चिरावी, त्यात एक कांदा किसून घालावा. उकडलेला बटाटा स्मॅश करून घालावा. त्यात तिखट, मीठ, हळद, हिंग, डाळीचे पीठ (चिरलेल्या कोथिंबिरीत राहील तेवढे) २ पळ्या तेल घालून एकत्र करून त्यात अर्धा चमचा फ्रुट सॉल्ट घालावे. ते सर्व एका थाळीत घालून गॅसवर ठेवावे. कुकरची शिट्टी लावू नये. गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. ते गार झाल्यावर वडय़ा थापाव्या. आवडत असल्यास त्या वडय़ा श्ॉलो किंवा डीप फ्राय कराव्यात.

मुठिये

साहित्य : १ दुधी, डाळीचे पी़ठ, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, आले, लसूण, मिरचीची पेस्ट, थोडे तिखट, मीठ, हळद, धन-जिरे पावडर, दही, तेल, फ्रुटसॉल्ट.

कृती : दुधी किसून घ्यावा. त्यात डाळीचे, तांदळाचे पीठ व गव्हाचे पीठ घालावे. रवा, बाजरीचे पीठ असल्यास घालावे. आले, लसूण, मिरचीची पेस्ट घालावी. थोडे तिखट, मीठ, हळद, धने-जिरे पावडर घालावी. थोडे दही घालावे. तेलाचे थोडे मोहन घालावे. अर्धा चमचा इनो फ्रुटसॉल्ट घालावे व हे सर्व एकत्र मळावे व त्याचे छोटे छोटे मुटकुळे करावेत व फ्राय पॅनवर थोडे तेल घालून श्ॉलो फ्राय करावेत.

(दुधीचे, मेथीचे किंवा मिक्स भाज्यांचे मुठिये करू शकतो.)

खस्ता पुरी

साहित्य : २ वाटय़ा मैदा, अर्धी वाटी बारीक रवा. अडीच चमचे साजूक तूप. २ चमचे साय, दीड चमचा जिरे, दीड चमचा कसुरी मेथी. मीठ, साखर, हिंग, तळण्यासाठी तेल.

कृती : मैदा व रवा एकत्र करावा. त्यात तूप व साय घालावी व कसुरी मेथी व जिरे मिक्सरमध्ये वाटून त्यात घालावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी व लागेल तेवढे पाणी घेऊन कणीक घट्ट भिजवावी. एक तासानंतर लाटय़ा कराव्यात व त्याच्या छोटय़ा छोटय़ा पुऱ्या पातळ लाटाव्यात. पुरी लाटल्यावर त्यावर कातणाने (काटय़ाचे कातण) एक-दोन उभ्या छोटय़ा छोटय़ा चिरा माराव्यात व तेल गरम झाल्यावर पुऱ्या तळाव्यात. कडक तळाव्यात.

या पुऱ्या ८-१० दिवस चांगल्या राहतात. लहान मुलांच्या खाऊच्या डब्यात देता येतात.

नलिनी फाटक – response.lokprabha@expressindia.com