‘राजकारणातील शास्त्रज्ञ’ हा अंजेला मर्केल यांच्यावरील १६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. विविध देशांच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या स्त्रियांची पाश्र्वभूमी पाहिली तर त्याचे जनतेच्या मानसिकतेशी असलेले नाते प्रकर्षांने जाणवते. आपल्या देशात व शेजारीपाजारी स्त्रिया अत्युच्च स्थानावर जरूर पोहोचल्या (इंदिरा गांधी, बेनझीर भुत्तो, शेख हसीना, चंद्रिका कुमारतुंगा); परंतु त्या सर्व आपापल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत होत्या (अनुक्रमे पंडित नेहरू, झुल्फिकार अली भुत्तो, मुजीबुर रेहमान, सिरिमावो बंदरनायके). खुल्या विचारसरणीकरता स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या अमेरिकेत आजवर एकही स्त्री राष्ट्राध्यक्ष होऊ  शकली नाही. एका स्त्रीला मत देण्यापेक्षा तेथील जनतेने ट्रम्प यांना पसंत केले. लोकशाहीच्या माहेरघरी (इंग्लंडमध्ये) मार्गारेट थॅचर कोणताही राजकीय वारसा नसताना पंतप्रधान बनू शकल्या आणि कठोर आर्थिक निर्णय घेऊन ते राबवू शकल्या. जर्मन लोक त्यांच्या काटेकोरपणाकरता आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील हुशारीकरता ओळखले जातात. अल्बर्ट आईनस्टाईन, मॅक्स प्लँक, वर्नर हीझेनबर्ग, अशा नामांकित जर्मन शास्त्रज्ञांनी केलेले कार्य केवळ अतुलनीय आहे. अशा देशाच्या जनतेने भौतिकशास्त्रात डॉक्टरेट असलेल्या स्त्रीला इतकी वर्षे अत्युच्च पदावर निवडून दिले याचे म्हणूनच आश्चर्य वाटत नाही. अशी देदीप्यमान शैक्षणिक कारकीर्द असलेली, परंतु कुठलाही राजकीय वारसा नसलेली भारतीय स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेऊन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न कधीतरी पाहू शकेल का, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही.

प्रसाद दीक्षित, ठाणे

 

संघटनात्मक कामाची गरज

‘शौचालय? ऑक्युपाय..’ हा आश्लेषा महाजन यांचा ९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. एका ज्वलंत आणि प्रसंगपरत्वे ऐरणीवर येणाऱ्या विषयावरील एक चांगला लेख. हा प्रश्न खरोखर कृती कार्यक्रमांपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सध्या काय परिस्थिती आहे आणि ती सुधारण्याचे काय प्रस्ताव आहेत हे जाहीर करण्यास भाग पाडले पाहिजे. यात वर्तमानपत्रे खूप मदत करू शकतील. त्यांच्या लेखात उल्लेख केलेल्या ऑक्युपाय चळवळीच्या मार्गाने जाण्याची वेळ लवकरच येणार असे वाटते आहे. यासाठी संघटनात्मक कामाची गरज आहे.

अशोक तातुगडे

 

हॉटेलची मदत घ्यावी

‘शौचालय? ऑक्युपाय..’ हा आश्लेषा महाजन यांचा लेख वाचला. मला एक मुद्दा आवर्जून सांगायचा आहे की, युरोपात सार्वजनिक स्वच्छतागृहाचा प्रश्न सोडवण्यासाठी तेथील हॉटेल्स् व पब्स्ची मदत लोकल गव्हर्निग बॉडीज् हक्काने घेतात. आपल्याकडेसुद्धा आपण तसा आग्रह का करत नाही. महाजनांसारख्या लेखकांनी आपल्या लेखातून असा विचार लोकांना सुचवावा यासाठी हा पत्रप्रपंच.

रघुनाथ गोडबोले, वारजे, पुणे

 

स्त्रीचे प्रबोधन महत्त्वाचे

‘‘ती’नेच लढायला हवा लढा, स्वत:साठी!’ हा २ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेला अलका जोशी यांचा लेख वाचला. ‘स्त्री आणि अंधश्रद्धा’ या अनुषंगाने वास्तवदर्शी भाष्य करणारा व त्या दृष्टीने विचार करण्यास उद्युक्त करणारा असा हा लेख आहे. स्त्रियांच्या अंधश्रद्धेमागे समाजाची आणि स्वत: स्त्रियांची मानसिकताच कारणीभूत आहे. स्त्रियांनी करावयाची व्रतवैकल्ये याबाबत समाजात आग्रह धरला जातो. चातुर्मासात व्रतवैकल्ये करणे, पितृपंधरवडय़ात विशिष्ट नियम पाळणे, सौभाग्यवती मरण यावं (नवऱ्याआधी) म्हणून मंगळागौर पूजणे आणि दुसरीकडे तोच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा बांधणे या सगळ्यांना समाजात मानाचे स्थान आहे. पण त्यामुळे एकाअर्थी स्त्रीने स्वत:च स्वत:चे दुय्यम स्थान मान्य केले आहे.

स्त्रिया त्यांच्यावर लादलेल्या परिस्थितीमुळे अंधश्रद्धेला बळी पडतात. बालवयापासूनच तिच्यावर झालेले अंधश्रद्धेचे संस्कार स्त्रिया पुढच्या पिढय़ांपर्यंत इमानेइतबारे पोहोचवतात. त्यामुळेच स्त्रीचे प्रबोधन हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील मुख्य भाग असायला हवा. कर्मकांड हे अंधश्रद्धेचे भ्रष्ट रूप आहे. देव, धर्म, परंपरा इत्यादींशी निगडित जे काही आहे तेच ‘अंतिम सत्य’ आहे या मानसिकतेमुळे त्यांची चिकित्सा कोणी करत नाही. विचार करण्याची अवघड जबाबदारी टाळण्यातूनच अंधश्रद्धा वाढीस लागतात आणि त्यातूनच पुढे ‘शोषण’ करणाऱ्या बाबाबुवांना मोकळे रान मिळते. त्यामुळे स्त्रियांनी चिकित्सक (आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जे पटेल तेच करणे) वृत्ती प्रयत्नपूर्वक अंगीकारणे गरजेचे आहे.

सर्वच धर्मात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. म्हणून कार्ल मार्क्‍सने म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही चिकित्सेची सुरुवात ही धर्म चिकित्सेतूनच होते, म्हणूनच सर्वच धर्माची चिकित्सा होणे गरजेचे आहे. धर्मचिकित्सा केल्याशिवाय कर्मकांड, अंधश्रद्धा इत्यादींतून सुटका होणे अशक्य आहे. धर्माच्या जोखडांतून मुक्त झाले की आपोआपच कर्मकांडांतून उगम पावणाऱ्या अंधश्रद्धेचं ‘लोढणं’ गळून पडेल.

धर्म, कर्मकांड, रूढी- परंपरा इत्यादींच्या आडून होणारं स्त्रियांचं शोषण यांचा विचार करता डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा हा अंधश्रद्धेविरुद्धचा लढा किती जीवन-मरणाचा आहे याची प्रचीती येते. नवे विचार आत्मसात करण्यापेक्षा जुन्या विचारांना मूठमाती देणे जास्त अवघड असते. पण तरीही बदलाची सुरुवात नेहमी स्वत:पासून केली तर ती अधिक फलदायी ठरते. स्वत:साठी आणि भावी पिढय़ांसाठीदेखील.. तेव्हा तिनेच ही बदलाची, अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची सुरुवात नक्कीच करावी.

बाळकृष्ण शिंदे, पुणे