29 November 2020

News Flash

‘बात कहने का अपना अपना तरीका!’

मग लक्षात आलं या युगानंच एक वळण घेतलंय. लोकांनी आपला नकाराधिकार गुंडाळून ठेवलाय.

अभिराम भडकमकर

एकदा बी.व्ही. कारंतजींनी एक कन्नड नाटक पाहायला नेलं. टुरिंग टॉकीजमधलं ते नाटक. पुठ्ठय़ाचा हत्ती, पावसाच्या सीन्समध्ये वरून पाइपने पाणी.. आम्ही खूप हसलो, टवाळी केली. रात्री जेवताना बाबा इतकंच म्हणाले, ‘‘हसने का नहीं. अपना अपना तरीका होता है, बात कहने का!’’ त्या रात्री मी टक्कजागा होतो. केवळ अपराधी भावनेनं नाही, पण मला अख्ख्या कलाजगताचं प्रयोजनच शिकवून गेला हा बाबा आणि आपली त्यात असण्याची भूमिकासुद्धा.

‘ज्यांनी पायपीट पाहिली त्या रस्त्यांना..’
‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ कादंबरीची अर्पणपत्रिका लिहायला बसलो आणि आपसूकच हे लिहून गेलो. काही काळ मनासमोर सगळ्याच रस्त्यांनी गर्दी केली. मला कुठून कुठं घेऊन गेलेले रस्ते त्यातल्या खाचखळग्यांसकट, मऊ मुलायम डांबरासकट, लाल काळ्या मातीसकट, धुळीसकट.. समोर येत गेले. मग वाटलं कशासाठी आहे ही सगळी पायपीट? कुठं पोहोचायचं आहे नेमकं? निघण्यापूर्वी तरी पक्कंकेलं होतं का कुठं पोहोचायचंय ते? कोल्हापूरहून पुण्याला तिथून दिल्ली मग मुंबई.. पुढचं माहीत नाही..

तसं ठरवून आखून-रेखून काही करण्याचा माझा स्वभावच नाही. जत्रेत भिरभिरत्या नजरेनं मिळेल ते पाहात सुटणाऱ्या लहानग्या मुलासारखं माझं जगणं असतं, असं मला वाटतं. आत्ता इथे रमलोय उद्या भलतंच काही भुरळ घालेल. ज्या खेळण्याची आत्ता आसक्ती वाटतेय, ते मिळवण्याचा आटापिटा होतो पण ते हाती पडतं आणि नजर दुसऱ्याच खेळण्यावर पडते. हातात आहे त्यात मन रमत नाही, असं काहीसं होतं का? कुणी याला धरसोड म्हणतं कुणी हे नसर्गिक आहे म्हणतं तर कुणी याला बहुआयामी वगरे म्हणत उदात्त करून टाकतं. मला मात्र कोल्हापूरच्या टेंबलाईचा रस्ताच दिसतो. कसा लाल गुलालानं माखून गेलेला असायचा जत्रेत.. आणि मन रमवण्याचे विविध खेळ. आकाशपाळणा, ती दोन्ही हात नसलेली, पायानं चपात्या लाटून तव्यावर भाजणारी मुलगी, जादूगार, पिपाणीवाला.. सगळीकडे भटकायचो.. आनंद घेत..
जीए आयुष्यात आले. ‘‘केव्हाही निघ. पोहोचायचं तेव्हाच पोहोचशील’ असं सांगणारे.’’ पण नेमकं कुठे पोहोचल्यावर मन कायमचं रमणार आहे? या पायपीटीचा अंत काय? कुठे? मुळात ही पायपीट म्हणायची की या भल्या मोठय़ा जत्रेत मन रमवण्याचे बहाणे शोधत केलेली वणवण..

कोल्हापुरात छान चाललं होतं. शाळेत अभ्यासक्रमापलीकडचं बरंच काही होतं. मुळात खांडेकरबाई होत्या. मंदाकिनी खांडेकर. त्या स्पध्रेतल्या भाषणांची तयारी करून घ्यायच्या. कथाकथन, वक्तृत्वाची ओढ लागली. त्याला पूरक म्हणून वाचनाची. घरी आई खूप वाचायची. हिंदीसुद्धा. प्रेमचंद, मथिलीशरण, अज्ञेय, निराला आयुष्यात तेव्हाच आले. कळायला नंतर लागले हा भाग वेगळा. पण आयुष्य अस्लम (बागवान), अंदू (आनंद मुद्राळे), लाक्या (लियाकत बारगीर)बरोबर खणीवर मासे पकडण्यात, अस्लमच्या दारातल्या झाडांवर बसण्यात, गोटय़ा, पाकिटं (सिग्रेटची पाकिटं) खेळण्यात छान वेळ जात होता. हो, सिग्रेटची पाकिटं हा एक खेळ होता प्रसिद्ध आमच्या चांडाळ चौकडीचा. रस्ता कसा छान मुलायम सरळ आणि उबदार होता..

गणपतीत मेळे व्हायचे. म्हणजे रस्त्यावर स्टेज बांधून केलेली नाटकं. त्यात गाणी- नाच- एक नाटक- नकला सगळं असायचं. त्यात रमायचो. गणपतीत आमची गँग निघायची मेळे बघायला. वैभव कलापथक वगरे धमाल असायची. एका मेळ्यात गाणारी एक अंध मुलगी होती. ‘शिशा हो या दिल हो’ तर फेमसच. प्रकाश हिलगे लावणी नाचायचे ती तर कल्ला असायची. मी, रवी आगरकर, जयशा (जयसिंग पाटील) आम्ही शाळेत नाटकात काम करणारे होतो. त्यामुळे मेळ्यांमध्ये एखादी नक्कल वगरे करायला मिळाली की स्वर्ग दोन बोटे उरायचा. रंगमंचावरच्या प्रकाशात निथळण्याची मौज काय असते ते तिथे अनुभवलं. कलात्मक आनंद, अभिव्यक्ती, सर्जनशीलता असले शब्द आयुष्यात येण्याआधीच ही रंगमंचावर बागडण्याची झिंग अनुभवाला आली होती. ती झिंग कोल्हापूरच्या स्टुडिओकडे घेऊन गेली. शूटिंग पाहायचं वेडच लागलं. अर्थात त्यात आपण काम वगरे करायचं हे मनात नव्हतंच, पण त्या वातावरणातलं काही तरी आवडू लागलं होतं. दादा कोंडके, भगवानदादा,

उषा चव्हाण, अशोक सराफ किती तरी पडद्यावरची मंडळी साक्षात पाहायला मिळायची. मग एकदा मनात आलं आपल्याला काम मिळालं तर? या वेडेपणात प्रशांत कुलकर्णीही सामील झाला. मक्काय स्टुडिओच्या चकरा सुरू झाल्या. खरं तर फार काही नको असायचं. हवा असायचा तो आनंदच. फक्त. (स्ट्रगल, यश अपयश, प्रयोग, पुरस्कार, कालातीत, वेगळं, दिशा देणारं, खोल, अभिजात या जळवा नंतर चिकटल्या). एकदा चक्क एका सिनेमात छोट्टंसं काम मिळालं, तसं मॉबमध्येच. पण दिग्दर्शक अनंत माने आणि सीनमध्ये उषा नाईक आणि अरुण सरनाईक होते. नंतर काही वर्षांनी अरुणजींचे सिनेमे पाहिले तेव्हा जाणवलं केवढय़ा मोठय़ा नटासोबत डेब्यू केलाय आपण! हाहाहा.. डेब्यू! पण हो. ते कामही फार मोठं होतं तेव्हा कारण त्या मागचं सगळं फार निर्मळ निखळ होतं. खरं तर त्या वेळच्या त्या हव्याहव्याशा वाटण्यात काहीच नको होतं. हे काहीच नको असणं हे किती मोलाचं असतं! मग एक भिंग घेऊन पार्वती टॉकीजच्या मागच्या उकिरडय़ातून फिल्मस्चे तुकडे शोधून भिंतीवर सिनेमा पाडायचो.

शाळा संपली, कॉलेजात गेलो ते खरं तर जावं लागतं म्हणून. घरचा धंदा नाही, शेती नाही, नोकरीशिवाय काय करणार होतो मी तरी? सायन्सला गेलो नाही कारण तिथे हुशार मुलं जायची. आर्ट्सला गेलो नाही कारण तिथे नॉर्मली मुलींनी जायचं असतं असं मानायचे. कॉमर्स केलं तर बँकेिबकेत स्कोप. पण तिथे कंटाळाच भरून यायचा मनात. मन रमवायला वक्तृत्व, कथाकथन स्पर्धा होत्या. मग सुरू झाला प्रवास. स्पध्रेच्या निमित्तानं. माणसं भेटायची, बाहेरचं जग दिसायचं, विचारांना धार लागायची. ते मांडायचं कसब निर्माण व्हायचं. कथाकथनात अभिनयाची हौस भागायची. वर बक्षिसंही मिळायची. तेव्हा एकशेएक म्हणजे प्रचंऽऽड रक्कम वाटायची. इथे खूप छान मित्र भेटले. एक एक जण आपल्या अनुभवाचं आणि आयुष्याच्या आकलनाचं गाठोडं घेऊन आलेला. खूप छान वाटायचं. तेव्हा माझ्या मधल्या भावाला चारुदत्तला ‘टेल्को’त नोकरी मिळाली आणि तो पुण्याला गेला. आणि सुट्टीत मी पुण्याला जाऊ लागलो. पहिल्यांदाच मनात एक स्वप्नं उमटलं. आपण आता नाटकातच काम करायचं. त्यासाठी पुण्याला जायचं. मीही ‘टेल्को’ची परीक्षा दिली. कारण टेल्कोची ‘कलासागर’ ही नाटय़संस्था. स्वरूपा खोपकर, रमेश भाटकर अशा नामवंतांनी गाजवलेली. आपणही त्यात काम करायचंच. आता ‘कलासागर’चा ध्यासच
घेतला मी. पण ‘टेल्को’च्या परीक्षेत नापास झालो.

खूप निराश झालो. मग पुढचं म्हणजे बारावीनंतरचं शिक्षण पुण्यात घे, असं चारुदत्त म्हणाला आणि चक्कपुण्यात बीएमसीसीत दाखल झालो. तिथे माझ्यासाठी खुली झाली ती राजाभाऊ नातूंच्या कडक शिस्तीत चालवली जाणारी पुरुषोत्तम करंडक नावाची प्रयोगशाळा. इथे बागडायला मिळालं. तेही

सुहास कुलकर्णी नामक रिंगमास्टरच्या हाताखाली. नाटकात काम करायचं या एकाच ध्यासानं पछाडलेला मी तालमीला गेलो.
राज काझी एकांकिका लिहून घेऊन आला होता. ती ऐकताना मला जाणवू लागलं हे काही तरी वेगळं आहे. मेळे आणि शाळेतली नाटकं, कॉलेजातली स्नेहसंमेलने यापेक्षा नाटक नावाचं काही तरी वेगळं असतं हे मला जाणवलं. सुहासनं संहितेची चिरफाड करत ‘अ‍ॅन अ‍ॅबसर्ड शो’चं नाटक उभं केलं आणि ती आख्खी प्रोसेस पाहताना, अनुभवताना मी गंभीर होत गेलो. आजवर माहीत असलेल्या नाटक नावाच्या खेळाकडे मी एका वेगळ्याच नजरेनं पाहावं असं वातावरण होतं ते. सगळ्या धारणाच मुळासकटच बदलणारं. रंगमंचाच्या चौकटीतल्या विविध शक्यतांची आणि त्याच्या असीमतेची.. अमर्यादतेची जाणीव झाली आणि ‘पुरुषोत्तम’नी मला अंतर्मुख केलं. नाटक हा मजेमजेचा खेळ नाही तर एक गंभीर कलाप्रकार असल्याचं जाणवलं. मग ग्रंथालय आणि तालीम हॉल या परिघात आयुष्य सीमित झालं. किंवा त्यामुळं विस्तारत गेलं म्हणूयात. करंडक हे ध्येय असलं तरी त्यासाठीची मेहनत जास्त छान वाटायची. त्या वातावरणाची नशा होती. ती हवीहवीशी होती. काही नवं करून पाहण्यातली मौज, ते फिसकटलं तरी कमी होत नाही हा मंत्र मिळाला.

याच काळात महत्त्वाची गोष्ट घडली. ‘ड्रॉपर्स’मध्ये सत्यदेव दुबे शिबीर घ्यायला यायला राजी झाले. आणि सुधीर मुंगी, सुहास यांनी मुलं जमवायला सुरुवात केली. दुबेजी हे प्रस्थ होतं. पण त्यांनी एक उपकारच केले माझ्यावर. मला मॉबमध्ये रोल दिलाच पण बॅक स्टेजचं कामही दिलं. मी तालमीचे तीन-चार महिने आणि ते पंचवीस प्रयोग विंगेतून ‘तुघलक’ ऐकलं. एक एक शब्द एक एक विराम.. मी कानात प्राण आणून ऐकत होतो आणि त्या सोबतच मला नाटकाची बांधणी, सीन्सची रचना, मांडणी, शब्दांच्या पलीकडला अर्थ, एकेका शब्दाचे अनेक अर्थ, त्यातलं नाटय़, पृष्ठस्तर, अंतस्तर, वेगवेगळ्या लेअर्स, नाटय़ात्म विधान.. असं बरंच काही जाणवू लागलं. यातून मला नाटय़लेखनाचे धडेच मिळत गेले. माझ्यासाठी ते खऱ्या अर्थाने नाटय़लेखनाचं वर्कशॉपच होतं. या नाटकानं मला, माझ्यातल्या लेखकाला अंतर्मुख केलं. नंतर अनेक वर्षे अगदी एन.एस.डी.च्या शेवटच्या वर्षांपर्यंत मी काहीच लिहिलं नाही. ‘पुरुषोत्तम’मधलं लेखनाचं बक्षीस, एकांकिकेचा दूरदर्शनवर शो या सगळ्या गदारोळात हरवून जाण्याच्या नेमक्या वेळेत येऊन गिरीश कर्नाडांच्या ‘तुघलक’नं माझं बोट धरून मला नाटय़लेखनाची दीक्षाच दिली, नव्हे आयुष्यालाच दिशा दिली. कारण मी ठरवलं केवळ झिंग नशा म्हणून नाटक करायचं नाही आपल्याला. आता जे करायचं ते प्रशिक्षण घेऊन आणि मी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त डेरेदाखल झालो.

मला माहीत नव्हतं की ‘एनएसडी’त दोन फरिश्ते माझ्या मानगुटीवर बसणार आहेत. एक म्हणजे बी. व्ही. कारंथ आणि दुसरे फ्रिट्झ बेनेवीट्झ. दोघांनी जगण्याकडे बघायची नजरच बदलून टाकली. मी तिथे रमूनच गेलो. ‘रोज एक तरी नाटक वाच’ असं दुबेजींनी दरडावून सांगितलं होतं. किमान शंभर पानं रोज! ते वाचन, वेगवेगळ्या लोकांबरोबर काम आणि संध्याकाळी वेगवेगळ्या रंगमंचीय शक्यता दाखवणारे प्रयोग. अगदी बिरजू महाराजजींच्या कथ्थकपासून अस्ताद देबू खालिद तय्यबजींच्या शारीर थिएटपर्यंत सगळं यायचं दिल्लीत. मन रमवायची काय काय साधने आहेत जगात. इथे मला कळलं आकाश इतकं असं अमर्याद का विस्तारलंय.. त्याच्या खाली जगाला झाकायचं तर इतका विस्तार हवाच. मी त्या आभाळाखाली दाही दिशा हुंदडू लागलो. मग काही अनुवाद, कधी दिग्दर्शन, कधी मुखवटे तयार करणंसुद्धा.

एकदा बी.व्ही. कारंतजींनी एक कन्नड नाटक पाहायला नेलं. टुरिंग टॉकीजमधलं ते नाटक. पुठ्ठय़ाचा हत्ती, पावसाच्या सीन्समध्ये वरून पाइपने पाणी.. आम्ही खूप हसलो, टवाळी केली. अशा संस्थांच्या प्रशिक्षणार्थीना असतात तशी शिंगं होतीच आम्हाला. रात्री जेवताना बाबा इतकंच म्हणाले, ‘‘हसने का नहीं. अपना अपना तरीका होता है, बात कहने का!’’ बाप रे! त्या रात्री मी टक्क जागा होतो. केवळ अपराधी भावनेनं नाही पण मला अख्ख्या कलाजगताचं प्रयोजनच शिकवून गेला हा बाबा आणि आपली त्यात असण्याची भूमिकासुद्धा.
एक वर्षांने प्रश्न आला स्पेशलायजेशनला काय घ्यायचं? तू फोकस कर. सगळे म्हणू लागले. तर कारंतजी सांगू लागले, थिएटरमध्ये स्पेशलायजेशन कसलं? सगळ्यांना सगळं यायला हवं. मला वाटायचं मला सगळ्यात मजा येतेय. या कन्फ्युजनमध्ये काही काळ गेला आणि फ्रिट्झ आले. काहीही हक्कानं विचारू शकावं असा, समोरच्याला कसलीही दहशत न दाखवता शिकवणारा आमचा फ्रिट्झ. ‘टू सर विथ लव्ह’मधल्या किंवा ‘डेड पोएट सोसायटी’तल्या शिक्षकासारखा. मी विचारलं, ‘कोर्स संपतोय. कशावर फोकस करावं कळत नाहीये.’ ते हसले. म्हणाले, ‘‘नसर्गिक वाढीवर. म्हणजे बघ निसर्गात काही झाडं सरळसोट वाढतात. एकच एक दिशेने. काही त्यांच्या शाखा प्रशाखा पारंब्यातून विस्तारत जातात. तूच तुझ्या व्यक्तिमत्त्वात भिंती का घालून घेतोयस अशा? पाड त्या.’’ आणि मला आठवलं एक दिवस तो झाडाखाली बसला होता. त्याच्या समोर काही जर्मन वृत्तपत्रं होती. त्यातल्या बातम्यांवर त्याची ओलेती नजर फिरत होती. पूर्व आणि पश्चिम जर्मनीतली भिंत पडली होती. जर्मनी एक झाला होता. ते आठवलं आणि मला त्या दिवशी फ्रिट्झ कळला आणि सांगता न येण्यासारखं खूप काही..

हे सगळं गाठोडं पाठीशी बांधून मुंबईत आलो तेव्हा मनात कसल्याच भिंती नव्हत्या. नाटक हे नाटक. ‘बात कहने का अपना अपना तरीका.’ मग कुणालाही न हसता, अंडरएस्टिमेट न करता, अहंगंड न ठेवता ती केलेली बात आणि तो करणारा या दोघांना कसल्याही चश्म्याआडून न बघायचे जवळजवळ अशक्यप्राय पण प्रामाणिक प्रयत्न सुरू झाले. फ्रिट्झनी मनातला गोंधळच संपवला होता. ‘‘ज्यात आनंद मिळतो ते सगळं कर’’ असं सांगून. त्यामुळे सगळ्याच प्रांतांत बागडायला लागलो.
नाटकाचं लेखन, सिनेमांचं लेखन, सिनेमा-सीरियल्समध्ये रोल, अशी मुशाफिरी सुरू झाली. ती अगदी सिनेमा काढणं, तो दिग्दर्शित करणं आणि चक्क कादंबरीकडे वळण्यापर्यंत..

पण मधल्या काळात नकळत एक वेगळच वळण जाणवू लागलं होतं. मनातल्या मनात आकारात येत चाललेलं हे वळण नेहमीचं नव्हतं. किंचित हादरवून टाकणारंही होतं. त्याची माहिती नव्हती असं नाही. कल्पना असणं आणि सामोरं जाणं यातला फरक होता तो. ते म्हणजे नाटकांच्या तालमींना सिनेमाच्या ट्रायल्सना काळोख्या थिएटरमध्ये बसलं असताना मनात एक धाकधूक होई. हे चालेल ना? आवडेल ना? वर्क होईल ना? करून पाहाणं, नशेत करत राहाणं याला आता ही काळजीची किनार.. व्यावसायिक तडजोडी न करता केलेली नाटकं लोक स्वीकारत होते. पण तरीही मनातली ही पाल चुकचुकत राहू लागली आणि करण्याच्या, करण्यातल्या आनंदावर एक वेगळीच अनोळखी काजळी धरू लागली होती. ‘‘माझं नाटकावर पोट असेल पण मी पोटासाठी नाटक लिहिणार नाही’’ असं म्हणणारा मी.. एसी थिएटरच्या थंडीतही अंगाला घाम फुटतोय असं जाणवायचं. आजवरच्या वळणांना सामोरं जाणं सोपं होतं. इथे या घाटातून गाडी कशी काढायची? इथे तर वास्तव नावाचा धगधगता अंगार होता. बरं ‘शेवटी तेही पाहायला लागतंच हो’ म्हणणारी मंडळी सुरुवातीपासूनच तेच पाहातात हेही जाणवायचं. ‘चांगलं आहे हो पण जरा जास्तच इंटूक आहे.’ याचा अर्थ तिकीटबारी हाच होता. व्यवसाय म्हणून हे स्वीकारलेली आमची मोठ्ठी फळी मुंबईत आली होती. आमच्या आधीच्या पिढीनं इथे जम बसल्यावर जुनी उपजीविकेची साधनं सोडली होती. आम्ही अंधारात उडी घेतलेली माणसं होतो. पाठीवर कारंतजी, फ्रिट्जने दिलेले भूकलाडू तहानलाडू होते. आता या दोहोतला समतोल साधायची कसरत होती. पण आमच्यात पूर्वी उत्तम काम केलेले आणि उपजीविकेची उत्तम साधनं असलेले, लोकही दाखल झाले. ‘अरे वाइड ऑडियन्सपर्यंत जायला हवं’ वगरे म्हणत..

मग लक्षात आलं या युगानंच एक वळण घेतलंय. लोकांनी आपला नकाराधिकार गुंडाळून ठेवलाय. वाटू लागलं सर्व रस्ते आता मार्केटकडेच जाताहेत का? त्या टीव्ही मालिकांनी सगळंच व्यापून टाकलं आणि सगळ्या जाणिवा बदलताना दिसू लागल्या. या वरातीत सामील होणं सोपं होतं. त्यात रमणं कठीण होतं. दोहोतल्या झगडय़ानं परिणाम झाला. स्वभावात कडवटपणा येत गेला. मनातल्या मनात कढणं सुरू झालं. तळमळणं त्याचा राग इतर गोष्टींवर काढणं. या वळणानं दमछाक सुरू केली ती अजूनही संपत नाही हेच खरं.
पण ही सगळी वळणं स्वीकारत, आत खोल मुरवत जात असताना लक्षात आलं ही वळणं मागे पडतात नष्ट होत नाहीत. दिसेनाशी होतात ती नजरेला पण ती तुमच्या जगण्यावर खोल चिन्ह उमटवून जातात. काम करताना ती कामात उतरताना दिसतात. हे सगळं येतं कुठून येतं याचं हेच उत्तर असावं असं वाटू लागतं. ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’मध्ये हे सगळं उतरत गेलं आणि मी तटस्थपणे ते उतरू देत गेलो. त्याच्या आड न येता.

नाटक सिनेमाकडून कादंबरीकडे येण्याच्या वळणानं मला परत एकदा चालेल का? आवडेल का या भीतीपासून लांब नेलं. लेखकाचं नाटक-सिनेमातलं परावलंबित्व इथे आड येत नव्हतं. निर्माता नीट चालवेल ना? नट तारखा देतील ना? कसली कसली भीती नाही. इतकीच पात्रं हवी, इतकाच सेट हवा कसलंही बंधन नाही. मी मला हवा तसा व्यक्त झालो. कादंबरीचं अवकाश म्हणजे काय हे समजून घेण्याचा खेळ सुरू झाला. एक वेगळं माध्यम हाताळणं, जुन्या माध्यमांचे संस्कार, प्रभाव आड येऊ न देता परत एकदा नव्यानं त्याला भिडण्याचा खेळ रंगतदार वाटू लागला होता. फ्रिट्झ म्हणाला होता तशा आपल्याच व्यक्तिमत्त्वातल्या आपणच घालून घेतलेल्या भिंती पाडणं.. स्वत:ला एक्सफ्लोअर करत राहाणं.. स्वत:च स्वत:ला तोडून-मोडून नव्यानं मांडून पाहाणं.. आता मला नवा खेळ दिसू लागला होता. ‘बात कहने का नया तरीका!’

आता सध्या या वळणांची नशा आहे. रस्ता कुठे जाणार माहीत नाही. कुठे पोहोचायचंय ते ठरलेलंच नाहीये. पोहोचण्याच्या आनंदापेक्षा प्रवासाचा आनंद मोठ्ठा वाटतोय.. हेही बरंच आहे.. पायाखाली गुलालानं माखलेला रस्ता आहे.. जत्रेत फिरताना भिरभिरणाऱ्या नजरेत कुतूहल आहे.. आणि वळणं आहेत.. नवे नवे खेळ दाखवणारी.. मन रमवणारे खेळ.. आणि विस्तीर्ण आभाळाखालची जत्रा तर काय अनंतकाळ चालणारी आहे..
अभिराम भडकमकर – abhiram.db@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 1:13 am

Web Title: abhiram bhadakamkar a multifaceted personality
Next Stories
1 लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड!
2 सत्यम् शिवम् सुंदरम्
3 प्रतीक्षा आयुष्य बदलवणाऱ्या भूमिकेची!
Just Now!
X