आमच्या वयोवृद्धांच्या ‘विरंगुळा’ मंडळातील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला. नव्या पदाधिकाऱ्यांकरिता निवडणूक होणार हे जाहीर झाले. ‘विरंगुळा’ मंडळावर कब्जा करावा, कॅरम-रमी-ब्रीज अशा खेळांचे अड्डे वाढवावेत व म्हातारपणाला मारक असे भाषणांचे रटाळ बैठे, सांस्कृतिक कार्यक्रम कायमचे रद्द करावेत, असे मला नेहमी वाटे. मी दोन-चार वेळा तसे बोलूनही दाखवले. प्रत्येक वेळी मला ऐकावे लागले, ‘‘मोकाशी, परबांचे मित्र म्हणवता व असले भलते विचार बोलता? सांभाळा, स्वत:ला सांभाळा.’’

माझे विठ्ठलभक्त परब यांचा, त्यांच्या संत प्रवृत्तीमुळे ‘विरंगुळा’त दबदबा आहे. मी विचार केला की, आपण परबांना अध्यक्षपदी बसवावे. परब सहज निवडून येतील. परबांना ऐहिक व्यवहारात काहीही कळत नाही. परबांच्या नावावर आपणच कारभार करायचा. आपण हायकमांड व्हायचे. मी कधीही निवडणूक लढवत नाही. पदाचा लोभी मी नाही असे सांगून, जागरूक व दक्ष सभासद राहणे मला आवडते. संधी मिळताच न झालेल्या कामांबद्दल व केलेल्या कामांतील चुकांबद्दल अध्यक्ष, कार्यवाह व खजिनदार यांना मी भर सभेत फैलावर घेतो. एका पत्रकात ‘शनिवार’ हा शब्द ‘शनीवार’ असा छापला होता. ही चूक आमचे संस्कृतप्रेमी मित्र ओकांनी मला दाखवली. ऱ्हस्व ‘नि’ व दीर्घ ‘नी’ यातील फरक मी नीट समजून घेतला. ओक नेहमी म्हणत, ‘‘ज्ञानेश्वर ते कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेबाबत आपण दक्ष राहिलं पाहिजे.’’ त्यामुळे ज्ञानेश्वर व कुसुमाग्रज ही नावे मला पाठ झाली होती. मी कार्यवाहांची भर सभेत झडती घेतली, ‘‘ज्ञानेश्वरांनी शनिवारचं शनीवार केले नाही, कुसुमाग्रजांनीही ऱ्हस्व नि चा दीर्घ नी केला नाही. तुम्ही स्वत:ला कोण समजता?’’ कार्यवाहाकडून ज्ञानेश्वर आणि कुसुमाग्रज यांचा अवमान केल्याबद्दल मी माफी वदवून घेतली. माझ्या या पहारेकऱ्याच्या कामाबद्दल सर्व सभासदांनी टाळ्या वाजवल्या व मला ‘शनी मोकाशी’ ही पदवी बहाल केली. असो. मी गनिमी काव्याचा वापर करायचे ठरवले.

मी परबांना सांगितले, ‘‘सर्व सभासदांची इच्छा आहे की तुम्ही अध्यक्ष व्हावे. तुम्ही अध्यक्ष झाल्यावर मी सर्व कामे सांभाळीन. कामाची काळजी करू नका. तुम्ही फक्त अध्यक्षपदासाठी अर्ज भरा.’’ यावर ‘होय’ असे साधे, सरळ उत्तर परबांनी दिले असते तर त्यांना संत कोण म्हणेल?

परब माझ्याकडे पाहत उत्तरले, ‘‘होईन भिकारी। पंढरीचा वारकरी॥ हाचि माझा नेमधर्म। मुखी विठोबाचे नाम॥ तुका म्हणे देवा। हेचि माझी भोळी सेवा॥’’ मी ओकांना म्हणालो, ‘‘आपले परब भिकारी होऊन विठ्ठलाची सेवा करायला तयार आहेत. सर्वच जग त्यांना विठ्ठलमय वाटते. या जगातच आपले विरंगुळा केंद्र आहे. मग ते अध्यक्ष होऊन विरंगुळा केंद्राचे काम नक्की करतील.’’ओक माझ्याकडे पाहून हसले. त्यांना माझ्या चाणाक्षपणाचे कौतुक वाटले असणार. तुकोबांच्या वाणीतून परबांनी दिलेला होकार मी नेमका हेरला होता.

‘परबांना अध्यक्ष होण्यासाठी मी राजी केले आहे’ हे मी सर्वत्र जोरदारपणे पसरवले. सर्व सभासदांनी माझे अभिनंदन केले. खुद्द ओकही माझ्या पाठीवर थाप मारत, ‘गुणी गुणम् वेत्ति’ असे म्हणाले. ओकांची मदत न मागता, या संस्कृतचा ‘गुणी माणूसच गुणी माणसाला पारखतो’ हा अर्थ मी सहजी लावला व तो ओकांना सांगितला. ओक हसले.

निवडणुकीच्या दिवशी अर्जपेटी उघडली. अध्यक्षपदाकरिता एकाचाही अर्ज आला नव्हता. परब उभे राहणार आहेत या माझ्या जोरदार प्रचारामुळे, इतर कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नव्हता. परब सर्वमान्य होते. त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याचा मूर्खपणा कोण करील? पण खुद्द परबांनीही अर्ज भरला नव्हता. त्याचे मला आश्चर्य वाटले. कार्यवाह व खजिनदार या पदांकरिता तीन व चार अर्ज आले होते. पण या सातही जणांनी, ‘परब अध्यक्ष नसतील तर आम्हाला कार्यकारी मंडळात यायचेच नाही’ असा पवित्रा घेतला.

परबांचा मित्र असूनही मी परबांना भर सभेत विचारले, ‘‘परब, तुम्हाला अध्यक्ष व्हायचे नव्हते तर तसे स्पष्ट सांगायचे. ‘होईन भिकारी। पंढरीचा वारकरी॥’ असे उत्तर तुम्ही दिले होते. जे परब भिकारीही व्हायला तयार आहेत ते अध्यक्ष सहजी होतील असे मला वाटले. परब, तुम्ही मला फसवलेत, नव्हे सर्व सभासदांना तोंडघशी पाडलेत.’’

परब हात जोडून म्हणाले, ‘‘मोकाशी, मी तुमची क्षमा मागतो. अहो, मी कसला अध्यक्ष होणार? साधा विठ्ठलसेवेचा अधिकार मला मिळत नाही. ‘आता मी अनन्य येथे अधिकारी। होईल कोणे परी नेणो देवा॥ तुका म्हणे जरी मोकलिशी आता। तरी मी अनंता वाया गेलो॥’ देवा, तुमची सेवा करण्याचा अधिकार मला मिळत नाही, तुम्ही माझा त्याग करू नका, नाही तर माझा जन्म व्यर्थ जाईल. मोकाशी, विठ्ठलाच्या सेवेपासून मला तोडू नका.’’

परबांच्या या उत्तरावर सर्व सभासद, ‘परब महाराज की जय’ म्हणून ओरडले. सर्व पदांकरिता निवडणुका नव्याने घ्यायचे निश्चित झाले. मी ओकांना म्हणालो, ‘‘पुन्हा परबांच्या मार्फत, ‘विरंगुळा’मध्ये सुधारणा करण्याचा विचार मी करणार नाही. एक वेळ मी ज्ञानेश्वर, कुसुमाग्रज यांना अध्यक्ष व्हा म्हणून गळ घालेन, पण न कळणारी तुकोबांची भाषा बोलणारे परब नकोत.’’

ओक म्हणाले, ‘‘मोकाशी, काही तरी निर्थक काय बोलता? ज्ञानेश्वर, कुसुमाग्रज ही मंडळी हयात नाहीत. त्यांना तुम्ही अध्यक्ष कसे कराल? आणि तेही किरकोळ ‘विरंगुळा’चे?’’ मी ओकांना ताणले, ‘‘शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर थोडेच हयात आहेत? पण सर्व राजकारणी मंडळी त्यांना हाका मारतात, त्यांच्या नावांचा वापर करून सत्ता मिळवतात! मी ज्ञानेश्वर-कुसुमाग्रज यांची नावे वापरली तर तुमचे काय बिघडते?’’

ओक हसले नाहीत, त्यांचा चेहरा पडला. ज्ञानेश्वर-कुसुमाग्रज ही मंडळी हयात नाहीत हे मला खात्रीपूर्वक माहीत आहे. याचा संस्कृतपंडित ओकांना अंदाज आला नव्हता. असो. निवडणुकीत मला म्हणजे सत्याला जय मिळणार नाही, रमी-ब्रीज-कॅरम या खेळांना उत्तेजन मिळणार नाही व कंटाळवाण्या, माहिती-ज्ञान देणाऱ्या व साहित्य-संगीत यांना वाहिलेल्या कार्यक्रमांचे फावणार हे मला स्पष्ट दिसते आहे.  ‘कालाय तस्मै नम:।’ या ओकांच्या संस्कृत भाषेत हळहळायचे व गप्प राहायचे.

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com