12 August 2020

News Flash

मोठ्ठी आई

मी कणखरपणे म्हणालो, ‘‘परब, आपण आजोबा, पणजोबा या श्रेष्ठ, श्रीमंत व उच्च किताबांचे मानकरी आहोत.

परब आकाशाकडं पाहत, मोठय़ा आईकडं जायचं म्हणजे मरायचं असं म्हणतात की काय? मरण्याचा अविचार आपण मुळीच करता कामा नये. आपल्या दोन्ही मित्रांनाही आपण सावरलं पाहिजे. मी बोलत होतो. ओकांना माझं म्हणणं पटलं असावं..

‘‘पणतवंडांची ही पिढी कॉम्प्युटर-मोबाइल वापरण्यात खूप वेळ घालवते; नूडल्स-पिझ्झा खाते व कोल्ड्रिंक पिते. यासाठी आपण त्यांच्यावर संतापू नये. ती बुद्धीनं आपल्या वरचढ आहे.’’ ओकांचा स्वर कौतुकाचा होता.

मला कौतुकाचा स्वर आवडला नाही. मी तिरकसपणे म्हणालो, ‘‘खरं आहे. पणतवंडांना पहाटे उठणं म्हणजे काय हे माहीत नाही; सूर्यनमस्कार घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तूप वरणभात खाणं त्यांच्या जिवावर येतं. मुख्य म्हणजे रात्री रामरक्षा न म्हणता ती टीव्हीपुढं बसतात. पणतवंडांची दृष्ट काढावी!’’

माझ्या तिरकस स्वरात प्रचंड खरखर होती. मी पूर्णपणे पणतवंडांच्या विरुद्ध आहे हे ओक आणि परब यांना आरपार जाणवलं. मला शांत करत परब म्हणाले, ‘‘मोकाशी, पिढीनुसार आवडीनिवडी बदलतात, आपण समजून घ्यायचं. मोकाशी, तुम्ही तूप वरणभात खाण्याबाबत शेरा मारलात; तरुणपणी आपण सारे हॉटेलात जाऊन इडली-वडा-डोसा हे पदार्थ खाल्ले! आपले पणजोबा हयात असते तर त्यांना आपले हे उडपी पदार्थ खाणं आवडलं असतं?’’

ओक बोलले, ‘‘खाणं दूर ठेवा, त्यांना हॉटेलात पाय ठेवणंही आवडलं नसतं. मोकाशी, तुम्ही दिवसातून चार वेळा चहा घेता, पाचव्या वेळी कोणी दिला तर तोही तुम्ही घ्याल! तुमच्या पणजोबांनी यासाठी तुमची गय केली असती?’’

मी सुज्ञपणे माघार घेतली. ओक व परब यांच्या म्हणण्यात तथ्य होतं. पण मी थेट पराभव मान्य न करता, प्रश्न टाकला, ‘‘ओक, पतवंडं फार स्मार्ट आहेत. हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता?’’

ओक सांगू लागले, ‘‘माझा पणतू चिनू फक्त सहाच वर्षांचा आहे. तो श्रीकृष्ण या देवाची कथा पणजीकडून ऐकतो. कृष्णजन्माची कथा ऐकताना तो म्हणाला, ‘माई, तुझ्या गोष्टीतला कंस नुसता बलून आहे.’’

‘‘बलून आहे म्हणजे?’’ मी विचारलं.

‘‘बलून आहे म्हणजे मूर्ख! डोक्यात काही नाही, फक्त हवा. टाचणी लावली की फुगा फुटतो.’’ ओकांनी मला नवी भाषा समजावून दिली.

‘‘कंस क्रूर होता, मूर्ख थोडाच होता?’’ मी ओकांना म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्या चिनूलाच सवाल केला.

‘‘मोकाशी, माझ्या पत्नीनं चिनूला, ‘देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल’ हा कंसाला दिलेला इशारा पूर्वभागात सांगितला होता. म्हणून तर कंसानं आपली बहीण देवकी व तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात डांबलं होतं. बाळ जन्माला आलं रे आलं की कंस बाळाचा वध करायचा.’’ ओक सांगू लागले.

मी अधीरपणे म्हणालो, ‘‘ओक, मला हा सर्व भाग माहीत आहे. मी कृष्णावरचे दहा सिनेमे पाहिले आहेत. एका सिनेमात शांता आपटे राधा होती. वयामुळे कृष्णाची भूमिका कोणी केली होती हे मला आठवत नाही. तुमचा चिनू कंसाला बलून असं का म्हणाला?’’

‘‘चिनूनं गोष्ट सांगणाऱ्या माझ्या पत्नीला विचारलं, ‘माई, कंसानं देवकी व वासुदेव यांना वेगवेगळ्या कोठडय़ात ठेवलं असतं तर काय झालं असतं?’’

मी गपगार झालो. कंस तर बलून होताच, ओकांच्या चिनूनं मलाही बलून केलं होतं! अशा प्रकारचा तोडगा कंसाला सुचवावा हे मला माझ्या लहानपणी, तरुणपणी व सध्याच्या अतिपक्व ब्याऐंशीव्या वर्षीही मुळीच सुचलं नाही. मी गपकन् मान्य केलं, ‘‘पणतवंडं हुशार आहेत.’’

परब म्हणाले, ‘‘मोकाशी, संजू या माझ्या पणतूचं बोलणं ऐका. त्याच्या त्या बोलण्यानं मला अंतर्मुख केलं, मला ईश्वराकडे नेलं.’’

मी थक्क झालो. ‘‘संजू बोलला तरी काय?’’ मी अधीरपणे म्हणालो, ‘‘संजूचे बोल ऐकवा.’’

परब सांगू लागले, ‘‘संजू, तू मम्मीच्या पोटात नऊ महिने मजेत होतास. सकाळी लवकर उठावं लागतं नव्हतं. तोंड धू, आंघोळ कर, दूध पी, देवाला नमस्कार कर अशी आई तुझ्यामागं कटकट लावते. पोटात असताना, ही कटकट नव्हती. भूक लागली की तू आतल्या आत मम्मीशी बोलायचास. मम्मीला ते ऐकू यायचं. तुला पाहिजे ते तुला मम्मी पोटातल्या पोटात द्यायची. खाणं झाल्यावर चुळा भरण्याचा, हात धुण्याचा त्रास तुझ्यामागं नव्हता. थंडी, उकाडा, पाऊस हा सर्व ताप तुझ्या मम्मीला, तू मम्मीच्या पोटात आरामात लोळत होतास. तुला काही तसदी नव्हती, मग तू मम्मीच्या पोटातून बाहेर का आलास?’’

‘‘संजू काय म्हणाला?’’ ओकांनी व मी एकत्रच विचारलं. आम्हाला उत्सुकता होती.

‘‘संजू म्हणाला, ‘पणजोबा, मी पोटात असताना, माझी खूप काळजी घेणारी, माझ्या वाटचा सर्व त्रास सहन करणारी, मला जिवापलीकडं जपणारी माझी मम्मी पाहण्याची, तिचा आवाज ऐकण्याची मला उत्सुकता होती. मम्मीनं, मी पोटात असताना मला डोळे दिले, कान दिले. त्या डोळ्यांनी मला मम्मीला पाहायचं होतं, तिचे शब्द ऐकायचे होते.’ संजूच्या बोलण्यानं मला स्वत:शी बोलतं केलं, मला सावध केलं, मला जागं केलं. मी स्वत:ला म्हणालो, ‘आकाशातील मोठ्ठय़ा आईनं तुला हे जग दाखवलं. आई, वडील, भाऊ, आत्या, मावशी यांनी तुला सांभाळलं. पत्नी मिळाली. मुलगा-सून, नातू-नातसून हे सारे मिळाले. पणतवंडही पाहायला मिळालं. मित्र मिळाले. आणखी काय हवं? ज्या देवानं, नव्हे मोठ्ठय़ा आईनं हे सर्व दिलं तिच्याकडं जावं, कृतज्ञतेनं तिच्या चरणकमळावर माथा टेकवावा असं तुला वाटायला नको का? इहलोकीचा मुक्काम तू तृप्त वृत्तीनं संपव. मोठय़ा आईकडं जा. ती सांगेल त्याप्रमाणे पुढचा प्रवास तू स्वीकार.’’

परबांनी आकाशाकडं पाहात, ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणणं चालू केलं. परबांचे डोळेही मिटलेले होते. ओकांचा चेहराही भारलेला दिसला. मी चमकलो. परब आकाशाकडं पाहत, मोठय़ा आईकडं जायचं म्हणजे मरायचं असं म्हणतात की काय? मरण्याचा अविचार आपण मुळीच करता कामा नये. आपल्या दोन्ही मित्रांनाही आपण सावरलं पाहिजे.

मी कणखरपणे म्हणालो, ‘‘परब, आपण आजोबा, पणजोबा या श्रेष्ठ, श्रीमंत  व उच्च किताबांचे मानकरी आहोत. आपण मुलं-सुना, नातवंड-नातसून यांच्यासह भ्रष्टाचाराच्या राक्षसाशी जमवून घेत जगलो आहोत. पाच-सात वर्षांच्या वीतभर पणतूचे चार शब्द ऐकून तुम्ही अंतर्मुख काय होता? अजून अनेक गोष्टी करायच्या आहेत! ’’

मी बोलत होतो. ओकांना माझं म्हणणं पटलं असावं. ओकांनी माझा हात पकडला, म्हणजे ओकांनाही इहलोकात राहायचं आहे तर! पण परबांचे डोळे मिटलेलेच होते, वरती ते ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणतच होते.

मी उठलो, जमेल तेवढय़ा वेगानं मी बागेबाहेरच्या चहाच्या टपरीकडं गेलो व तीन कटिंगचे चहा घेऊन परतलो. एक कडक व कढत चहा परबांच्या हातात देत मी ओरडलो, ‘‘परब, चहा घ्या. पैसे देण्याची पाळी आज तुमची आहे.’’

परब एकदम भानावर आले, इहलोकीची देणी अजून बाकी आहे हे त्यांना समजलं. त्यांचं विठ्ठल, विठ्ठल थांबलं. ते म्हणाले, ‘‘मोकाशी, होय, माझ्या ध्यानी आहे.’’

अत्यंत आनंदाने मी म्हणालो, ‘‘मी पैसे देऊनच चहा आणला आहे. परब, तुम्ही मिळालात, सर्व मिळालं. तुमची चहाची पाळी मी आनंदानं

माझ्यावर घेतो.’’

भा.ल. महाबळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2017 12:48 am

Web Title: great grandmother
Next Stories
1 बाळ मातेपुढे नाचे!
2 आजोबांची खेळणी
Just Now!
X