शिबिरे भरवली जात नसल्याने तुटवडा; केवळ १ ते २ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक

विरार :  शहरात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. केवळ १ ते २ दिवसाचा रक्तसाठा शिल्लक असल्याने रक्तपेढय़ा आणि रुग्णालयांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसाळ्यात रक्तदान शिबिरे भरवली जात नसल्याने शहरात प्रचंड रक्तटंचाई निर्माण झाली आहे. रुग्णांना नियमित मिळणाऱ्या रक्तगटाचे रक्त मिळवितानासुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे.

वसई विरार शहरात करोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना नवे संकट निर्माण झाले आहे. शहरात पुन्हा  रक्ताचा साठा कमी होत आहे. याला प्रमुख कारण म्हणजे पावसामुळे शहरात रक्तदान शिबिरे भरवली जात नसल्याने रुग्णालयांना आणि रुग्णांना रक्त टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात असलेल्या रक्त पेढय़ांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने रक्तपेढय़ा कोरडय़ा पडत चालल्या आहेत.

मागील दोन महिन्यापासून शहरातील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असली तरी पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. त्याच बरोबर टाळेबंदीनंतर अपघात आणि इतर आजारसुद्धा बळावत आहेत. यामुळे शहरात रक्ताची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. परंतु पालिका अथवा सामाजिक संस्था किंवा राजकीय पुढाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात भरवली जाणारी रक्तदान शिबिरे निवडणूक संदर्भात अनिश्चितता निर्माण झाल्याने बंद झाली. आधी कोविडच्या भीतीने रक्तदाते पुढाकार घेत नव्हते यामुळे आवश्यक रक्त संकलन करणे शक्य होत नव्हे. पण करोना लाटेचा प्रादुर्भाव ओसल्यावर पुन्हा रक्तदान शिबिरे भरवली जातील अशी आशा बाळगली गेली. पण पावसाचे दिवस सुरू झाल्याने त्यात खंड पडल्याने पुन्हा रक्त टंचाई निर्माण झाली आहे. जर येणाऱ्या काळात रक्तदात्यांत वाढ नाही झाली तर गरजूंना वेळेवर रक्तपुरवठा करणे अशक्य असल्याची चिंता आता रक्तपेढय़ा व्यक्त करत आहेत.

करोना काळात रक्तदान शिबिरे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी झाली आहेत. केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठय़ा प्रमाणात शिबिरे घेतली होती. पण आवश्यकतेपेक्षा अधिक साठा निर्माण झाल्याने कालमर्यादेमुळे शेकडो पिशव्या रक्त वाया गेले. त्यातही पालिकेकडून कोणतीही शिबिरे राबविण्यात आली नाहीत. यामुळे दिवसागणिक शहरातील रक्ताचा साठा कमी होत आहे. सामान्य रक्तगट असलेले ‘ओ’ आणि ‘बी’ पॉसिटीव्ह रक्तसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे अनेकांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.

वसई-विरारमध्ये एकूण केवळ चारच रक्तपेढया आहेत. मागील वर्षी करोना काळात रुग्णालये पूर्णत: सुरू झाली नसल्याने रक्ताच्या मागणीत घट झाली होती. पण टाळेबंदीनंतर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सर्वच रुग्णालयाने नियमित सुरू झाल्याने सध्या शहरात महिन्याला ५०० ते ६०० रक्त पिशव्यांची गरज भासत आहे. पण सध्या केवळ महिन्याला १०० रक्त पिशव्या मिळवताना सुद्धा रक्तपेढय़ांची दमछाक होत आहे. त्यातही होल ब्लड सेल्स, प्लेटलेट्स आणि सिंगल डोनर प्लेटलेट्स असे विभाग केले जात असल्याने त्याची संख्या अधिक कमी होत जाते.

नालासोपारा येथील साथिया रक्त पेढीच्या संचालक विजय महाजन यांनी माहिती दिली की,  थेलेसिमिया, डायलेसीस या रुग्णांना सर्वाधिक रक्ताची गरज असते. त्याच बरोबर गरोदर महिला, रक्ताचा कर्करोग या रुग्णांना आगावू रक्तासाठी नोंदणी करावी लागते. सध्या अनेक रुग्णालयात रक्त मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दुप्पट पैसे देवून रक्त आणावे लागत आहे.

विजय महाजन यांनी सांगितले की, सामाजिक संस्था, पालिका, राजकीय पुढारी, रुग्णालये यांनी पुढाकार घेवून रक्तदान शिबिरे भरविणे आवश्यक आहे. त्याच बरोबर स्थानिक रक्तपेढय़ांना नागरिकांनी प्राध्यान्य देऊन शिबिरे भरविले पाहिजे तरच स्थानिक पातळीवर रक्ताचा साठा निर्माण होईल.

महापालिकेची रक्त संचयनासाठी उदासीनता 

वसई विरार महानगर पालिकेने स्वत:ची रक्तपेढी काढण्याचे योजले होते. पण सदरची संकल्पना कागदावरच संपली. पण मागील दोन वर्षांत पालिकेकडून कोणतेही रक्तदान शिबीर अथवा त्याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले नाही. तसेच पालिकेने शहरात रक्तपुरवठा अबाधित राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. यामुळे पालिकेच्या उदासीनतेमुळे नागरिकांना केवळ खासगी रक्तपेढय़ावर अवलंबून राहावे लागत आहे.    राज्य रक्त संक्रमण परिषद च्या संकेतस्थळावर १९ जुलै २०२१ रोजी वसई-विरारमधील रक्तपेढीत उपलब्ध असलेला रक्तसाठा. सध्या शहरात एकही रक्तपेढीकडे संपूर्ण रक्त (होल ब्लड सेल) एकही पिशवी शिल्लक नाही.