रुग्ण बरे होण्याच्या प्रमाण ९५ टक्के,तर बाधितांच्या प्रमाणातही घट

वसई : मागील काही दिवसांपासून वसई-विरार शहरातील करोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे, तर दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. आतापर्यंत वसई-विरारमध्ये करोनामुक्तीचे प्रमाण हे ९५.२५ टक्क्यांवर आले आहे.  तर बाधिच्या प्रमाणातही घट झाली असून   एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात रुग्णसंख्या सुमारे ५० टक्कय़ांनी घटली आहे.

शहरात एप्रिल महिन्यात सुरू  झालेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात अक्षरश: थैमान घातले होते. दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही झपाटय़ाने वाढ होत होती. दिवसाला सरासरी ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत होते. यामुळे शहराची चिंता अधिकच वाढली होती.

रुग्णसंख्येचे प्रमाण कमी व्हावे यासाठी  महापालिकेने आरोग्य व्यवस्था मजबूत करून खाटांची संख्या, नवीन करोना उपचार केंद्र, लसीकरण आदी इत्यादी व्यवस्था तातडीने तयार केल्या होत्या,  तर दुसरीकडे करोना चाचण्या करण्यावर अधिक भर दिला. यामुळेच मे महिन्यांच्या मध्यावर करोनारुग्ण वाढीला लगाम बसून करोनामुक्तांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मे महिन्याच्या अखेरीस करोना रुग्णांचे प्रमाण हे ९० टक्क्यांवर आले होते. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत दोन हजारांहून अधिक करोना रुग्णांनी करोनावर मात केल्याने हे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढून ९५.२५ टक्क्यांवर आले आहे. दिवसागणिक करोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ६५ हजार १९९ रुग्णांपैकी ६२ हजार १०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  आतापर्यंत तीन लाख ३६ हजार ५७७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील ९१ हजार ३७० या सर्वाधिक करोना चाचण्या मे महिन्यात करण्यात आल्या असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी होऊ लागला असून एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात रुग्णसंख्या सुमारे ५० टक्कय़ांनी घटली आहे.

एप्रिल महिन्यात २० हजार ६७२ करोना रुग्णांची नोंद झाली होती. तर मे महिन्यात घट होऊन केवळ ११  हजार ३४ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे सक्रिय रुग्णांची संख्या देखील तीन हजारांच्या खाली आहे.