वसई-विरार महापालिकेकडून वेळीच माहिती मिळत नसल्याने नागरिकांचा हेलपाटा आणि मनस्ताप

वसई : वसई-विरार महापालिकेकडून नागरिकांना लसीकरणाची माहिती योग्य प्रकारे दिली जात नसल्याने लस मिळविण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे बुधवारी केंद्र बंद असूनही लस मिळेल या आशेपोटी नागरिक तासन्तास केंद्रावर बसून असल्याचे दिसून आले. पालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत नसते. त्यामुळे पालिकेने समाजमाध्यमावर सक्रिय होण्याची मागणी केली जात आहे.

वसई विरार महापालिकेतर्फे ५१ केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले होते. कुठल्या केंद्रावर लस मिळेल त्याची माहिती आदल्या दिवशी महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दिली जाते. मात्र ही माहिती एक प्रसिद्धीपत्रक काढून पत्रकांरांना पाठविण्यात येत असते. ती माहिती नंतर पत्रकारांकडून समाजमाध्यमावर टाकण्यात आल्यानंतरच ती मिळत असते. मात्र पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरदेखील ही माहिती नसते.

त्यामुळे लस कुठे मिळणार याची माहिती घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकाना समाजमाध्यमांचा आधार घ्यावा लागत असतो. बुधवारी लस नसल्याने पालिकेची सर्वच्या सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. परंतु लस मिळेल या आशेने अनेक केंद्रावर नागरिक सकाळपासून रांगा लावून होते.

केंद्राबाहेर लस मिळणार नाही असे फलक नसल्याने लस मिळेल अशी नागरिकाना आशा होती. आमच्या केंद्रात पूर्वी लस मिळायची. म्हणून मी सकाळपासून येऊन थांबलो आहे, असे नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव केंद्रावरील अजय जाधव या नागरिकाने सांगितले.

केंद्रावर असलेले कर्मचारी देखील दुसऱ्या दिवशी लस मिळणार की नाही किंवा कधी लस येईल याची माहिती देत नसल्याची तक्रार त्यांनी केली. पालिकेने ४६ केंद्रे बंद करून केवळ ५ केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. केवळ पाच केंद्रेच सुरू ठेवली तर आम्ही लांब जाणार कसे आणि गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होईल, अशी भीतीदेखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधीही अनभिज्ञ

वसई-विरार महापालिकेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपून एक वर्ष होऊन गेले आहे. करोनामुळे निवडणूक झालेली नाही. मात्र नगरसेवकांनादेखील पालिकेकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात येत नाही.  करोनाचा संसर्ग फैलावल्यापासून  पालिका करोना रुग्णांची माहिती प्रसारमाध्यमांना देत असते. मात्र आजतागायत  अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असे  माजी नगरसेवक प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. लसीकरण कुठे होणार, कुठल्या केंद्रावर किती लस मिळणार याबद्दल सर्वसामान्य नागरिक आम्हाला विचारतात. मात्र आम्हालाच काही अधिकृत माहिती नसते. आम्हीदेखील समाजमाध्यमावर अवलंबून असतो, असे शेट्टी यांनी सांगितले.

पालिकेने समाजमाध्यमावर सक्रिय होण्याची मागणी

वसई-विरार महापालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत नसते. महापालिकेचे अधिकृत ट्टिवटर हॅण्डलही नाही. त्यामुळे केवळ समाजमाध्यमाचा आधार नागरिकांना असतो. पालिकेकडून माहिती मिळत नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावर चकरा माराव्या लागत आहे. पालिकेने संकेतस्थळ अद्ययावत करावे आणि समाजमाध्यमावर सक्रिय व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. करोनाच्या काळात अचूक माहिती मिळणे गरजेचे आहे. अन्यथा अफवा पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे पालिकेने समाजमाध्यमावर सक्रिय व्हावे, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.