ऑनलाइन शिक्षणासाठी साधनांचा अभाव

विरार :   करोना काळात बदलत्या शिक्षणप्रणालीचा फटका आता ग्रामीण भागातील गरीब मुलांना बसत आहेत. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक साधने नसल्याने तालुक्यात शाळाबाह्य मुलांची वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २.५ टक्के शाळाबाह्य मुलांचा दर वाढला आहे. सध्या तालुक्यातील २९२ मुले ही शालेय प्रवाहापासून दुरावली आहेत आणि सातत्याने यात वाढ पाहायला मिळत आहे.

करोनामुळे गेल्या दोन वर्षात शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाल्याने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे शिक्षण विभागासमोर उभे आहे. १ मार्च ते १० मार्च २०२१ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणामध्ये वसईत २९२ शाळाबाह्य मुले आढळली आहे.  यामध्ये १४ वर्ष्यापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. या मुलांमध्ये ग्रामीण भागातील मुलांचे प्रमाण अधिक असून त्यातही मुलींची संख्या अधिक आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु केवळ आठवडाच झाला आहे.  यामुळे अनेक विद्यार्थी पटलावर जरी असले तरी मात्र केवळ साधनांची उपलब्धता नसल्याने शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. यामुळे ही संख्या येत्या काळात वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रवाहाबाहेर गेलेल्या मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाला तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.

बहुतांश मुले ही कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षणापासून दुरावली गेल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झालेले स्थलांतरही याला कारणीभूत मानले जाते. करोना काळात अनेक पालकांचे रोजगार   गेल्याने  ग्रामीण भागातून शहरी भागाकडे रोजगारासाठी  मोठे स्थलांतरण होत आहे. परिणामी ही मुले शाळेपासून दुरावली जात आहेत. अशा स्थलांतर झालेल्यांचा आकडा मोठा आहे त्याची नोंद अजूनही झाली नाही.  ग्रामीण भागांत करोनामुळे आर्थिक  स्थिती खालावल्याने मुलेही पालकांसह मजूरीवर जाऊन घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावत असल्याने हे मोठे विद्यार्थीही शिक्षणापासून दुरावत आहेत.

वसई  शिक्षण विस्तार अधिकारी माधव  मते यांनी माहिती दिली की,  शालाबाह्य मुलांसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहोत.  अनेकवेळा पालकाच मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी तयार होत नाहीत यावेळी आमची अडचण होते. तसेच करोना काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झाले आहे. आता सध्या करोना काळ प्रभाव कमी झाल्याने उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार, तसेच राज्यातील इतर भागातून मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग स्थलांतरित होत आहे. यामुळे या मुलांची संख्या वाढत आहे.