विरार : महापालिकेने नागरिकांवर लादलेला उपभोक्ता कर मागे न घेता पालिकेने केवळ  मालमत्ता करात एक टक्का सवलत देऊन नागरिकांची बोळवण केली आहे. आधीच करोनामुळे आर्थिक संकटात सापडला. सामान्य नागरिक पालिकेकडून कर दिलासा न मिळाल्याने हतबल झाला आहे.

मालमत्ता कर कमी होऊ लागल्याने वसई-विरार महानगरपालिकेने करवसुलीसाठी नवनव्या युक्त्या लावून जास्तीतजास्त करवसुली करण्याचा प्रयत्न करत आहे. पण करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्याने नागरिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पालिकेने चालू वर्षात महापालिकेने नागरिकांना करदिलासा देण्याऐवजी नागरिकांवर ६०० रुपयांचा उपभोक्ता कर लागू केला. यामुळे शहरात पालिकेविरोधात संतापाचे वातावरण पसरले होते. हा कर  रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच करोना दुसऱ्या लाटेने सुद्धा नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीत अधिक घट केली यामुळे या चालू वर्षी पालिकेने मालमत्ता करात सूट द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पण या मागणीनुसार पालिकेने केवळ एक टक्का सूट देत नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद दिला. पण पालिकेने दिलेली सूट म्हणजे केवळ देखावा असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. एक टक्का सूट म्हणजे केवळ करदात्यांची केवळ बोळवण असल्याची संतप्त प्रतिकिया मनसे उपशहरप्रमुख प्रफुल पाटील यांनी दिली आहे.

महापालिका मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर, शिक्षण कर, वृक्ष कर, रोजगार हमी कर, अग्निशमन, पाणीपट्टी असे विविध कर आकारत असते.  पण मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड वैश्विाक महामारीने याला खो बसला आहे, करोनाकाळात नागरिकांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला असल्याने अनेकांची कर थकबाकी आहे. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात कोट्यवधींची घट झाली आहे. तर दुसरीकडे नागरिक कर भरणा संथ गतीने असल्याने अनेक विकासकामांना ब्रेक लागला आहे.

महापालिकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी मालमत्ता कराची देयके नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे.  मात्र कोविडमुळे कर भरणा केंद्र बंद असल्याने ऑनलाइन कर भरण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. पण केवळ या वर्षी पाच कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. इतकी कमी रक्कम वसूल झाल्याने पालिकेवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे जास्तीतजास्त कर वसुली कशी होईल याकडे पालिका लक्ष देत आहे. यासाठी वेगवेगळ्या स्वरूपांत करत सवलत देऊन पालिका नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन करत आहे.

या संदर्भात माहिती देताना पालिका उपयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, पालिकेने दिलेली सूट ही शासनाच्या नियमानुसार आहे. तसेच पालिकेने इतर स्वरूपातसुद्धा करदात्यांना सवलत दिली आहे. यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरणा करून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

पालिकेला उत्पन्न मिळणे आवश्यक आहे पण त्यासाठी पालिकेने  सामान्य नागरिकांचा विचार करणेसुद्धा गरजेचे आहे, सध्या कोविदमुळे नागरिक आर्थिक संकटात असताना पालिकेने अधिक कर सवलत देणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षे बाकी असलेल्या थकबाकीकडे लक्ष दिले पाहिजे. – मनोज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष, वसई