पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाह

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांत गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल दहा पटीने घट झाली असल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे शहरात पहिल्यांदाच खाजगी व शासकीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार केवळ डेंग्यूचे चार रुग्ण समोर आल्यामुळे प्रशासनाकडून दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात डेंग्यू व मलेरियासारख्या साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून विविध स्वरूपाच्या उपाय योजना आखण्यात येतात. यात प्रामुख्याने औषध फवारणी, पाणी शुद्धीकरण आणि स्वच्छतेचा समावेश आहे. मात्र तरी देखील डेंग्यू व मलेरिया या साथ रोग आजाराची लागण होऊन बाधित होणाऱ्यांचे प्रमाण पालिका दप्तरी वाढतच असल्याचे दिसून येत होते.

यात गेल्या वर्षभरापासून करोना आजाराने थैमान घातले असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याकरिता प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा डेंग्यू आणि मलेरिया आजाराचा प्रसार रोखण्याकरिता देखील उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ४ आणि मलेरियाचे ७ रुग्ण समोर आले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत डेंग्यूचे २९ आणि मलेरियाचे ४० रुग्ण समोर आले होते. त्यामुळे यावर्षी डेंग्यू व मलेरिया या साथ रोग आजाराचा प्रसार कमी झाल्यामुळे प्रशासनाकडून दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. जनजागृती मोहीम राबवून हे प्रमाण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिका प्रशासनाकडून जनजागृती

डेंग्यू व मलेरिया आजाराचा मुख्य प्रसार हा पावसाळ्यात अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नागरिकांनी करोनासह डेंग्यू व मलेरिया आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. याकरिता पावसाचे पाणी आपल्या अवतीभोवती कुठेही साचू देऊ नये, कोणत्याही स्वरूपाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे आणि पोषक आहारचे सेवन करणे अशा स्वरूपाची जनजागृती पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याच प्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही आजारांचा प्रसार अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांनी गाफील न राहता गांभीर्याने काळजी घेण्याचे आवाहन उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी केले आहे.