फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची आयुक्तांची घोषणा

भाईंदर: ठाण्यात फेरीवाल्यांकडून अधिकाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्लय़ाची पुनरावृत्ती मीरा-भाईंदर शहरात होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. यात प्रशासनाकडून तात्काळ ‘फेरीवाला’ आणि ‘ना फेरीवाला’ क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी फेरीवाले बसतील त्या ठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे उभारून मनुष्य बळाच्या साहाय्याने बारीक नजर ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त दिलीप ढोले यांनी महासभेत स्पष्ट केले.

मीरा-भाईंदर शहरात वाढती फेरीवाल्यांची समस्या अधिक जटिल होत चालली आहे. त्यात शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्याकरिता पालिका प्रशासनाकडून दोन वर्षांपूर्वी फेरीवाला सर्वेक्षण करून धोरण निश्चित करण्यात आले होते. मात्र या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात न आल्याने परिस्थिती जैसे थे असल्याचे आरोप सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत होते. त्यातच ठाण्यातील हल्ला प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पार पडलेल्या महासभेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधिकडून यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.

यावर उत्तर देत असताना मीरा-भाईंदर शहरात लवकरच फेरीवाला धोरण राबवण्यात येणार असल्याचे वचन आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले. त्याच प्रमाणे मीरा-भाईंदर शहरात लवकरच ‘फेरीवाला’आणि ‘ना फेरीवाला’ क्षेत्रे उभारण्यात येणार असून या व्यतिरिक्त कुठेही फेरीवाल्यांना बसू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याकरिता वेळोवेळी मनुष्यबळाची अडचण निर्माण होत असल्याने त्यात मोठी वाढ करण्यात येईल तसेच, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे उभारून त्यावर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

निम्म्यापेक्षा अधिक फेरीवाले शहराबाहेरील

मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून दोन वर्षांपूर्वी फेरीवाला सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र या सर्वेक्षणात समाविष्ट असलेले निम्म्यापेक्षा अधिक फेरीवाले हे शहराबाहेरील असल्याचे आरोप नगरसेवक ध्रुव किशोर पाटील यांनी महासभेत केले. शहरात व्यवसायासाठी बसत असलेले अधिकृत फेरीवाले हे शहरातील स्थायिक असावे असे मत महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी व्यक्त केले. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधीकडून नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावर योग्य तो निर्णय लवकरच घेणार असल्याचे आयुक्त दिलीप ढोले यांनी स्पष्ट केले आहे.