वसई : पालघर जिल्ह्यात महावितरणाच्या सुमारे दोन लाख वीज ग्राहकांनी तब्बल ७९ कोटी ४२ लाख रुपयांची वीजदेयकांची रक्कम थकवली आहे. राज्यात थकबाकी ७१ हजार कोटींहून अधिक आहे. महावितरणच्या खर्चातील ८० टक्के रक्कम ही वीज खरेदीवर खर्च होत असल्याने प्रचंड थकबाकीमुळे महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
वीज ग्राहकांकडून वीजदेयकांचा वेळेवर भरणा केला जात नसल्याने महावितरणच्या देयकांची थकीत रक्कम वाढत चालली आहे. सध्या राज्यात ग्राहकांची थकबाकी ७३ हजार ३६१ कोटी एवढी आहे. वसई, विरारसह पालघर जिल्ह्यातील वीज थकबाकी देखील मोठी आहे. वसईत ९ लाख ३८ हजार इतके ग्राहक आहेत. वसई आणि पालघरमधील ग्राहकांनी ७९ कोटी ४२ लाख ४५ हजार इतकी देयकांची रक्कम थकवली आहे. सर्वाधिक सरासरी ४० कोटी थकबाकी औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांची आहे. घरगुती वीज ग्राहकांनी २१ कोटी आणि व्यावसायिक ग्राहकांनी १३ कोटींहून अधिक वीजदेयकांची रक्कम थकवली आली.
कृषी ग्राहकांकडून १५ वर्षांपासून वीजदेयक भरणा नाही
महावितरणकडून शेतकऱ्यांना खूप मोठय़ा सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. तरीही राज्यातील १५ लाख १९ हजार कृषीग्राहकांनी गेली पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे २१ हजार ६७ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ३ लाख २३ हजार कृषीपंपधारक ग्राहकांनी गेली पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ एकही वीजबिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे ५ हजार २१६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
८० टक्के खर्च वीज खरेदीवर
महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीजबिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. बिलाच्या उत्पन्नातून कंपनी वीजखरेदीचे पैसे देते व त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वीज प्रकल्पांचा खर्च भागवला जातो. महावितरणच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ८० टक्के रक्कम ही वीजखरेदीवर खर्च होते. २०२१ -२२ या गेल्या आर्थिक वर्षांत महावितरणने वीजखरेदीपोटी ६९ हजार ४७८ कोटी रुपये खर्च केले होते.
महावितऱण हासुद्धा एक ग्राहक असून इतरांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवते. महावितरण स्वत: वीजनिर्मिती करत नाही किंवा कंपनीला कोणाकडून मोफत वीज मिळत नाही. वीजबिलांतून उत्पन्न मिळणे म्हणजे महावितरणचा श्वास चालू राहील. अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी महावितरणकडे ग्राहकांनी वीजबिले भरणे हा एकमेव पर्याय आहे.
-विजय सिंघल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक