सुहास बिऱ्हाडे

वसई विरार शहरात अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. या घटना वाढणे हा निश्चितच सामाजिक चिंतेचा विषय आहे. लोकांची मने कमकुवत का झाली आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. दुसरीकडे लोकांची प्रश्न विचारण्याची, विचार करण्याची वृत्ती बंद झाली आहे. कुठल्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता सजग राहून प्रश्न विचारले, डोळसपणे विचार केला तर अंधश्रद्धेला बळी पडण्याची वेळ येणार नाही.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Who will give the manifesto of health guarantee for the elderly
वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा

वसई विरार शहराची ओळख एक सुसंस्कृत आणि सांस्कृतिक शहर म्हणूनच आहे. मात्र अशा या सुसंस्कृत शहरात अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. नुकत्याच एका भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून हा बाबा महिलांचे लैंगिक शोषण करत होता. आजच्या काळातही लोके ‘पैशांच्या पावसा’सारख्या आमिषाला बळी पडतात, हीच मोठी शोकांतिका आहे. गेल्या काही महिन्यांत विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेले फसवणुकीचे गुन्हे पाहिले असता लोक किती सहजतेने अंधश्रद्धेला बळी पडतात हे दिसून येते.

या प्रत्येक प्रकरणात पुराव्याअभावी अंधश्रद्धाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला नसतो तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो. पण जे गुन्हे अंधश्रद्धाविरोधी कायद्यअंतर्गत दाखल होतात ते एवढे भयंकर आहेत की आपण खरेच या आधुनिक जगात वावरतो का असा प्रश्न पडतो. कारण बळी जाणारे हे सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू वर्गातील, सुशिक्षित घरांतील आहेत.

विरारमध्ये नुकतेच घडलेले एक उदाहरण लोकांच्या मानसिक गुलामगिरीचे दर्शन घडवते. मॅथ्यू पंडियन नावाचा दक्षिणेतील भोंदू बाबा लोकांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवायचा. असे करून तो केवळ आर्थिक फसवणूकच करत नव्हता तर महिलांचे लैंगिक शोषण करायचा. पाच महिलांनी त्याच्याविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. हा बलात्कार एकदाच नाही तर अनेकदा करत होता. मुळात पैशांचा पाऊस पडणारच कसा? असा प्रश्न या घटनेत बळी पडलेल्यांना विचारावासा का वाटला नाही?  भोंदूबाबाने यातील एका पीडित इमसाला थुकरट हातचलाखी करून पैशांचा पाऊस पाडल्याचे दाखवले. त्याचा विश्वास संपादन केला. नंतर त्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केले. त्या इसमाच्या परिचयाच्या अनेक महिला या बाबाकडे येऊ  लागल्या. यातील एक महिला तर २६ वर्षांची तरुणी होती. पूजेच्या नावाखाली हातचलाखी करायची, बोलण्यात गुंगवून ठेवायचे आणि मग महिलांचे लैंगिक शोषण करायचे अशी या बाबाची कार्यपद्धती होती. या बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा पोलिसांचा कयास आहे.

उपचाराच्या नावाखाली थुकरट वैदूंकडून होणारे लैंगिक शोषण, अंगात भूत काढण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक हे प्रकार नवीन नाहीत. पण ते आजच्या आधुनिक युगातदेखील वसई विरार शहरात वारंवार होत असतात ही चिंतेची बाब आहे. वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना एकापाठोपाठ एक उघडकीस येत आहेत. डिसेंबर २०२० मध्ये नालासोपारा पूर्वेला एका भोंदूबाबा महिलेच्या अंगातून भूत काढण्यासाठी तिच्यावर अघोरी उपचार करत होता. त्यासाठी त्याने तिच्याकडून ८८ हजार रुपये उकळले होते. मात्र अघोरी उपचार पद्धतीत या महिलेच्या पाठीवर ब्लेडने वार करून तिचे रक्त काढत असल्याने ती महिला जबर जखमी झाली आणि हा प्रकार उघडकीस आला. नालासोपारा येथील निळेमोरे गावातही दोन महिन्यांपूर्वी असाच एक अघोरी प्रकार समोर आला.

अंगातून भूत उतरिवण्याच्या नावाखाली एक भोंदूबाबा २० वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करत होता. उपचाराच्या नावाखाली होणारे लैंगिक शोषण, भूत उतरविण्याच्या नावाखाली अघोरी प्रकार याला केवळ मध्यमवर्गीय लोक बळी पडत नाहीत तर उच्चमध्यमवर्गीय, उच्चभ्रू लोकदेखील बळी पडतात. विरारमध्ये एका ‘यूटय़ूब बाबा’च्या अटकेनंतर उच्चभ्रू लोकदेखील कसे अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत ते उघड झाले आहे. एका सुटाबुटातील इंग्रजी बोलणाऱ्या भोंदू बाबाने विविध उपचार बरे केल्याचा दावा केला होता. त्याचे जगभरात लाखो अनुसारक (फॉलोअर्स) होते. त्याला एक उच्चशिक्षित कुटुंब बळी पडले. मुलीच्या उपचारासाठी हे कुटुंब हैद्राबादमधून विरारला आले होते. मुलीच्या मानसिक उपचारासाठी त्याने मुलीला ‘सेक्सचा’ सल्ला दिल्यानंतर त्या कुटुंबाचे डोळे उघडले. तोपर्यंत या बाबाने लाखो रुपये उकळले होते. या बाबाला वेळीच अटक झाली नसती तर वसईच्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याचे कुटुंब बळी पडणार होते.

सध्या सर्वच क्षेत्रांत प्रगती झालेली आहे. आंतरजालात एका क्लिकवर माहितीचा खजिना उपलब्ध असतो. दाव्यांची सत्यता काही क्षणात तपासता येते तरी लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. लोकांच्या या अज्ञानी, भोळसट आणि धार्मिक कट्टरतने आंधळे झालेल्या वृत्तीचा गैरफायदा हे गल्लीबोळातील भोंदू बुवा-बाबा घेत असतात. हे बाबा आर्थिक फसवणूक तर करतातच शिवाय महिलांचे लैंगिक शौषणही करत असतात. रेल्वेच्या डब्यात लागणाऱ्या लंगोटी बुवा-बाबांच्या जाहिराती नेहमी दिसत असतात. लोक मानसिकदृष्टय़ा कमकुवत झालेले असतात. धर्माच्या चुकीचा पगडा त्यांच्या मनावर एवढा घट्ट झालेला असतो की ते या बुवा-बाबांच्या दाव्यांना सहज बळी पडतात. हे ढोंगी सर्वच धर्मातील असतात.

हे थांबणार कसे हा मोठा प्रश्न आहे. दोन वर्षांपूर्वी अंनिसने स्मशानभूमीतील भीती, चुकीच्या समजूती काढण्यासाठी वसईच्या उमेळमान गावातील स्मशानभूमीत रात्रीची सहल हा उपक्रम आयोजित केला होता. स्मशानात रात्रभर जनजागृती आणि प्रबोधन करून लोकांच्या मनातील स्मशानातील अंधश्रद्धा दूर करणे हा यामागील हेतू होता. मात्र आमच्या धर्मात ढवळाढवळ, आमच्या भावना दुखवल्या जातील अशी कारणं देत संपूर्ण गावाने विरोध केला आणि हा उपक्रम रद्द करावा लागला होता.  त्यामुळे अंधश्रद्धा दूर करण्याचे आव्हान किती खडतर आहे याची प्रचीती येते. लोकांना फसवणारे भोंदूबाबा दोषी आहेतच पण चूक अशा बाबांच्या दारात जाणाऱ्यांची देखील आहे. केवळ एखाद दुसऱ्या भोंदूबाबाला अटक करून हा प्रश्न सुटणार नाही. जेव्हा तक्रार येईल तेव्हा पोलीस गुन्हे दाखल करतील. पण लोकांनी डोळसपण विचार करायला हवा, प्रश्न विचारायला हवे. जोपर्यंत लोक प्रश्न विचारणार नाहीत, डोळसपणे विचार करणार नाही तोपर्यंत अंधश्रध्दा प्रश्न सुटणार नाही. डोळ्यांवरील धर्माच्या चुकीच्या समजुतीची झापडं काढून, बुद्धिवादी बनण्याची वेळ आली आहे. अंधश्रद्धेचे मानगुटीवर बसलेले भूत उतरवले नाही तर अंधश्रद्धेच्या आगीत भस्म झाल्याशिवाय राहणार नाही.