विरार : वसई-विरार महापालिकेच्या वतीने नुकतीच राष्ट्रीय जलमिशन अंतर्गत जलशक्ती अभियानात पालिकेने जलसंधारण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली, परंतु मागील १४ वर्षांपासून पालिकेने त्यासाठी आजतागायत कोणतेही उपक्रम राबविले नाही. पाण्याचा जमिनीत निचरा होण्यासाठी पालिकेने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने आज शहरातील भूजलपातळी सातत्याने खालावली जात असून शहरात पाणीटंचाई प्रमाण वाढत आहे.
सन १९८८ मध्ये जलतज्ज्ञ अमेरिकन शास्त्रज्ञ विल्यम बार्बर यांनी गुजरात ते कारवार कर्नाटकपर्यंत सागरी किनाऱ्याचा अभ्यास केला यात पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणत होत असल्याने येणाऱ्या काळात सदरच्या भागाचा वाळवंट होण्याची शक्यता वर्तवली होती. याच काळात वसईचे नागरीकरण मोठय़ा प्रमाणात होऊ लागले. यामुळे वसईतील जलस्तर खाली जाऊ लागला. अतिरिक्त पाणी उपशाने वसईतील पाण्याच्या क्षाराचे प्रमाण वाढू लागल्याने पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल हरित वसईच्या माध्यमातून १९९१ साली गुजरातच्या ‘अॅनक्शन फोर फूड प्रोडक्शन’ या भू वैज्ञानिक गटाने ने दिला होता. असे असतानाही मागील अनेक वर्षांत जलसंवर्धनासाठी प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. आज वसईत ११० तलाव आहेत, त्यातील २४ तलाव बुजवण्यात आली आहेत, १००० च्यावर बावखले होती, त्यातील आता केवळ ६००च्या जवळपास शिल्लक आहेत. विहिरीसुद्धा अति उपशाने कोरडय़ा पडत आहेत.
वसईत सध्या विकासाच्या नावाखाली पाणी साठण्याच्या जागा बुजवल्या जात आहेत, वाढती वृक्षतोड, बोडके होणारे डोंगर यामुळे जमिनीची धूप मोठय़ा प्रमाणात होऊन जमिनीची आद्र्रता तसेच पाण्याचे बाष्पीभवन होऊन जमिनीचा जलस्तर कमी होत आहे. वसईत साधारणत: दररोज टँकरद्वारे दीड कोटी लिटर पाण्याचा उपसा करत असल्याची माहिती पर्यावरण समितीचे समीर वर्तक यांनी दिली आहे. महापालिका तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावाला सिमेंटच्या भिंती बांधत असल्याने तलावाचे झरे नष्ट होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी घरात लावलेले वाटर प्युरीफायरमुळे दोन तृतीयांश पाणी वाया जाते, यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. जमिनीतील पाणी वाढविण्यासाठी अजूनही उपाययोजना नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तीस वर्षांत जलसंवर्धनासाठी वसई विरार परिसरात प्रयत्न झाले नाहीत, यामुळे वसईत दरवर्षी जाणवणारी पाणीटंचाई अधिक भीषण होणार आहे, आम्ही हरित वसईच्या माध्यमातून लढा देत आहोत, पण प्रशासन कधी जागे होणार?-समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती, वसई-विरार
वसई-विरार शहर हे समुद्रापासून खूप जवळ आहे. अशात वाढती बांधकामे व अनियंत्रित केला जाणारा पाणी उपसा यामुळे भूजल पातळी खालावत आहे. याशिवाय जे गोडय़ा पाण्याचे झरे आहेत ते बंद होऊन खाऱ्या पाण्यात रूपांतर होऊ शकते. यासाठी पाण्याचे स्रोत टिकविण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना व जनजागृती होणे आवश्यक आहे.-डॉ. साधना महाशब्दे, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण सदस्य विधि विभाग