विरार : वसई-विरार महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त वापरत असलेल्या खासगी वाहनावर परवानगी नसताना लावलेला बहुरंगी अंबर दिवा अखेर काढून ठेवला आहे. हा दिवा केवळ अग्निशमन दल, पोलीस दल, निमलष्करी दल, आपत्कालीन व्यवस्था या शाखांनाच वापरण्याची परवानगी असतानाही आयुक्तांनी हा दिवा लावला होता.

वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. हे वापरत असलेले वाहन क्रमांक एम एच ४८ ए डब्ल्यू ६६३५ हे खासगी ठेक्यातील वाहन असून आयुक्त स्वत:साठी वापरत आहेत. महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्तालयांनी माहिती दिली होती की, सदरचे वाहन खासगी वाहन असून केंद्र शासन अधिसूचना क्रमांक १२१४ दिनांक ०१/०५ /२०१७ नुसार सदर वाहनास बहुरंगी अंबर दिवा लावण्याची परवानगी दिली जावू शकत नाही. तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई यांनी या संदर्भात पालिका आयुक्तांना पत्र देवून या दिवाच्या परवानगीचे कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. पण आजतागायत या संदर्भात पालिकेने कोणतेही कागदपत्रे सादर न करता आयुक्त आपल्या वाहनावर हा दिवा लाऊन फिरत होते.

यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने भाडोत्री वाहनावर बहुरंगी अंबर दिवा बेकायदा लावल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर अखेर आयुक्तांनी या वाहनावरील दिवा  काढला आहे.