तोतया डॉक्टर सुनील वाडकर प्रकरण
सुहास बिऱ्हाडे
वसई : तोतया डॉक्टर सुनील वाडकर याचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. वाडकर याच्या विरार येथील ‘हायवे’ या खासगी रुग्णालयात चक्क रुग्णवाहिकाचालक म्हणून काम करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा चालक रुग्णालयातील रुग्णांना डॉक्टर बनून तपासत असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात आढळले आहे.
सुनील वाडकर हा कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना वसई विरार शहरात १४ वर्षे डॉक्टर म्हणून वावरत होता. त्यापैकी ५ वर्षे तो वसई विरार महापालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याने वसई विरार शहरात दोन खासगी रुग्णालये सुरू केली होती. शासनाची आणि रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी वाडकर याला अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. तपासामध्ये त्याचे अनेक नवनवीन प्रताप समोर येऊ लागले आहेत. हायवे रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा चालक नीलेश भोईर हा रुग्णांना तपासायचे काम करत असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तसेच तो डॉक्टर म्हणून कागदपत्रांवर सही करत होता. त्याचे छायाचित्र आणि डॉक्टर म्हणून सही केलेला कागद ‘लोकसत्ता’च्या हाती लागला आहे.
अशा प्रकारे रुग्णालयातील बोगस डॉक्टर रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वसईतील आपचे नेते जॉन परेरा यांनी केली आहे. आतापर्यंत या रुग्णालयात किती जणांचे उपचारांदरम्यान मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांनी पुढे येऊन तक्रार द्यायला हवी असे त्यांनी सांगितले. आम्ही तपास करत आहोत. रुग्णालयात कुणी चालक डॉक्टर बनून तपास करत असेल तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सदानंद देवकर यांनी दिली.