अनेक विभागांची निर्मितीच नाही; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची वर्षपूर्ती

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला शुक्रवार १ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही पोलीस आयुक्तालय स्थिर होण्यासाठी धडपडत आहे. प्रस्तावित ३ पोलीस ठाणी मंजूर झालीच. पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक असलेल्या अनेक विभागांची निर्मितीच झालेली नाही. अनेक पोलीस ठाणे भाडय़ाच्या जागेत असून, वाहनांची कमतरता आणि सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे.

पालघर आणि ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाचे विभाजन करून मीरा भाईंदर वसई विरार हे नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात आले. १ ऑक्टोबर २०२० रोजी या पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र वर्ष उलटूनही अनेक घोषणा या कागदावरच राहिल्या आहेत.  नव्या पोलीस आयुक्तालयात वसई विरार शहरात सात आणि मीरा भाईंदर शहरात सहा पोलीस ठाण्यांचा समावेश होता. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी वसई-विरार शहरात मांडवी, आचोळे, पेल्हार आणि बोळिंज या चार नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली होती. मात्र वर्ष उलटून गेले तरी अद्याप एकही पोलीस ठाणे तयार झालेले नाही.

विरारमधील बोळिंज आणि आचोळे ही पोलीस ठाणे प्राधान्याने तयार केली जाणार होती. बोळिंज विभागासाठी साहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली मात्र बोळिंज पोलीस ठाण्यासाठी अद्यापही जागेचा शोध सुरू आहे. नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाणे तयार झाले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार होते. त्यानंतर १ ऑक्टोबरला होईल असे सांगण्यात आले. परंतु शुक्रवारी वर्षपूर्तीच्या दिवशीदेखील या पोलीस ठाण्याचे उद्घाटन होणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्र्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याचे उद्घाटन करायचे असून मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले

पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असली तरी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक पोलीस निरीक्षकांना बीट चौकीत बसावे लागत आहे. तुळिंज पोलीस ठाणे हे गटारावर असून ते स्थलांतरित अद्याप झालेले नाही. जागा नसल्याने पोलिसांनाच अनधिकृत बांधकामे करून बसण्यासाठी जागा तयार करावी लागत आहे. पोलीस मुख्यालयाची इमारत देखील भाडय़ाच्या जागेत आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तालयाने पालिकेचे २ कोटीहून अधिक रुपयांचे भाडे थकवले आहे. याशिवाय २ उपायुक्त, ४ साहाय्यक आयुक्त आणि ३ पोलीस ठाणेदेखील भाडय़ाच्या इमारतीत आहे.

अनेक विभाग अस्तित्वातच नाही

नव्या पोलीस आयुक्तालयात अनेक महत्त्वाचे विभाग सुरू झालेले नाहीत. बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक (बीडीडीएस) पथक, श्वान पथक आयुक्तालयात नाही. कुठलीही घटना घडल्यास श्वान आणि बॉम्बशोधक पथक हे ठाण्याहून मागविण्यात येतात. यामध्ये महत्त्वाचा वेळ निघून जातो. आपतकालीन संकटांना तोंड देण्यासाठी शीघ्र कृती दल (क्वीक रिस्पॉन्स टीम) ची गरज असते. मात्र हे पथक तयार करण्यात आलेले नाही. पोलिसांना गोळीबाराच्या सरावासाठी फायर रेंजची आवश्यकता असते. पोलिसांना नियमित परेड आणि कवायतीसाठी पोलीस मैदानाची गरज असते. मात्र या दोन्ही गोष्टी नव्या आयुक्तालयात नाही.