बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा गैरफायदा; व्यवस्थापकाच्या हत्येचा कट पूर्वनियोजित
सुहास बिऱ्हाडे
वसई: डोक्यावर असलेले एक कोटींचे कर्ज फेडण्यासाठी बँकेच्या माजी व्यवस्थापकानेच आयसीआयसीआय बँक लुटण्याची योजना आखल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, तसेच बँकेची अंतर्गत रचना माहीत असल्याने त्याने ही योजना बनवली होती. पुरावा नको म्हणून बँकेच्या व्यवस्थापक योगिता वर्तक-चोधरी यांना ठार मारण्याचेही त्याने आधीच ठरवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुरुवारी रात्री विरार पूर्वेकडील आयसीआयसीआय या बँकेतील दोन महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला करून बँकेतील सव्वा दोन कोटींचे सोने आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती.
बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे याने एकटय़ाने ही योजना आखली होती. मात्र ऐनवेळी त्याची योजना फसली आणि स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे तो पकडला गेला.
..तीन दिवसांपूर्वीच पोलिसांचा इशारा
आयसीआयसीआय बँकेत विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर यांचे खाते आहे. तीन दिवसांपूर्वी ते बँकेत गेले होते. त्यावेळी सुरक्षा रक्षक काम सोडून बॅंकेतील ग्राहकांना मदत करत होते. त्यामुळे टेलर यांनी सुरक्षा रक्षकांनी जागा सोडू नये, नेमून दिलेले काम करावे असे सांगून सावध केले होते.
पगार एक लाख, कर्ज एक कोटीचे
याबाबत माहिती देताना विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ (गुन्हे) यांनी सांगितले की अनिल दुबे याला १ लाखांचा मासिक पगार होता. टाळेबंदीच्या काळातही त्याला नियमित पगार मिळत होता. मात्र शेअर बाजारात ५० लाखांचे नुकसान झाले होते. त्याच्यावर घराचे ५५ लाखांचे कर्ज होते. याशिवाय १८ लाख, ८ लाख आणि १५ लाखांची तीन वैयक्तिक कर्ज घेतली होती. त्याचा मासिक हप्ता १ लाख ६ हजार एवढा होता. त्याच्या डोक्यावर एकूण कर्ज १ कोटींचे झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याला १ कोटींची गरज होती. ते फेडण्यासाठी त्याने शेवटचा पर्याय म्हणून बँक लुटीची ही योजना आखली.
असा कट आखला
अनिल दुबे याने या बँकेत दोन वर्ष व्यवस्थापक म्हणून काम केले होते. आयसीआयसीआय बॅंकेत दररोज २० लाखांची सरासरी रोकड जमा होत असते. या बँकेत एकूण ८ कर्मचारी आहेत. या बँके च्या सुरक्षा यंत्रणेची त्रुटी त्याला माहिती होती. बँकेचा सुरक्षारक्षक संध्याकाळी ६ वाजता जातो आणि रात्रपाळीचा सुरक्षा रक्षक रात्री १० वाजता येतो. ४ तास बॅंकेला सुरक्षा रक्षक नसतो हे त्याला माहिती होते. संध्याकाळी ७ वाजता कर्मचारी गेल्यावर व्यवस्थापक योगिता वर्तक-चौधरी एकटीच असते आणि ती सोने आणि रोकड लॉकरमध्ये ठेवते. त्यामुळे ही वेळ साधली. ५ दिवसांपूर्वी त्याने चाकू विकत घेतला होता. गुरुवारी दिवसभर आपला मोबाइल बंद ठेवला. संध्याकाळी त्या परिसरात जाऊन रेकी केली. मंकी कॅम्प आणि मुखपट्टी लावल्याने कुणी ओळखणार नाही, असे त्याला वाटले होते. बँकेत जाऊन एकटय़ा असलेल्या योगिताला ठार मारायचे आणि पैसे लुटायचे अशी त्याची योजना होती. त्यानुसार त्याने योगिता यांना व्हॉट्सअॅप कॉल करून बँकेत भेटायला येत असल्याचे सांगितले.
.ऐनवेळी कारस्थान फसले
बॅंकेत ८ वाजता गेल्यावर तो योगिताला भेटला आणि पाणी मागितले. योगिता या पॅण्ट्रीकडे वळताच त्याने मागून गळा चिरला आणि वार केले आणि लॉकरकडे गेला. लॉकर उघडे असल्याने सोने आणि रोख रक्कम बॅंगेत भरली. पण नेमकी श्रद्धा देवरूखकर ही कर्मचारी बॅंकेत होती. अचानक तिला पाहून तिच्यावरही वार केले. पण धाडसी श्रद्धाने व्यवस्थापकाच्या कक्षात धाव धेऊन सुरक्षा अलार्म वाजवला. यामुळे दुबे गोंधळला आणि तिच्यावर पुन्हा वार केले. पण श्रद्धा जखमी अवस्थेत धावत बाहेर आली आणि मदतीसाठी धावा केला. त्यामुळे स्थानिकांनी दुबेला रंगेहाथ पकडले आणि त्याची बॅंक लुटीची योजना फसली. अनिल दुबे हा नालासोपारा येथे राहणारा असून त्याला ११ आणि ८ वर्षांंची दोन मुले आहेत. या हल्लय़ात ठार झालेल्या योगिता वर्तक चौधरी या मूळच्या पालघरच्या राहणाऱ्या होत्या. लग्नानंतर त्या विरारला राहायला आल्या. त्यांना तीन वर्षांंचा मुलगा आहे. शुक्रवारी आरोपी दुबे याला न्यायालयात हजर केले असता ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.