विरारमधील बँक दरोडय़ादरम्यान हल्ल्यातून बचावलेल्या महिला कर्मचाऱ्याचे मनोगत

सुहास बिऱ्हाडे
वसई : ‘त्या रात्री माझा मृत्यू साक्षात डोळय़ांसमोर उभा होता.. क्षणार्धात सारं काही संपल्याचं वाटत होतं. पण बँकेची चिंताही सतावत होती. त्या जिद्दीनेच उठले आणि सुरक्षा अलार्म वाजवला’.. विरारच्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवरील दरोडय़ादरम्यान झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या बँकेच्या कर्मचारी श्रद्धा देवरुखकर यांनी त्या रात्री घडलेला प्रसंग ‘लोकसत्ता’समोर मांडला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्रद्धा या उपचारांनंतर बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. मात्र, त्या प्रसंगाच्या आठवणींतून त्या अद्याप सावरलेल्या नाहीत.

आयसीआयसीआय बँकेच्या शाखेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे याने २९ जुलै रोजी बँक लुटीची योजना आखली होती. त्यानुसार सायंकाळी बँकेत शिरल्यानंतर त्याने बँकेच्या व्यवस्थापक योगिता वर्तक-चौधरी यांची हत्या केली व श्रद्धा देवरुखकर यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेतही प्रसंगावधान दाखवून श्रद्धा यांनी सुरक्षा अलार्म वाजवला आणि मदतीसाठी धावा केला. त्यामुळे दुबे पकडला गेला. यासंदर्भात श्रद्धा यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला.

बँकेत रोखपाल म्हणून कार्यरत असलेल्या श्रद्धा या नेहमी कामकाज संपताच घरी निघतात. मात्र, त्या दिवशी व्यवस्थापक योगिता वर्तक यांनी श्रद्धा यांना थांबण्यास सांगितले. सर्व कर्मचारी निघून गेल्यानंतर या दोघीच उर्वरित कामकाज पूर्ण करत होत्या. ‘सुरक्षा रक्षक संध्याकाळी ६ वाजताच काम संपवून गेला होता. त्याच वेळी दुबे बँकेत शिरला व योगिता यांच्या केबिनमध्ये शिरला. मला याची कल्पना नव्हती. मात्र, अचानक केबिनमधील खुर्ची पडल्याचा आवाज आला. त्यामुळे मी तेथे धाव घेतली तेव्हा रक्ताच्या थारोळय़ात योगिता या निपचित पडल्या होत्या.

मी दिसताच दुबेने धारदार चाकूने माझ्या अंगावर वार केले व मीही रक्तबंबाळ होऊन कोसळले,’ असे श्रद्धा म्हणाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शुद्ध हरपल्याने श्रद्धा या खाली कोसळल्या. त्या मरण पावल्या असाव्यात असे समजून दुबे बँकेतील रोकड व सोने लुटण्यास गेला.

‘काही क्षणातच मी शुद्धीवर आले आणि सर्व शक्ती एकवटून सुरक्षा अलार्म वाजवला व दाराकडे पळत गेले. दुबेने आत शिरताना बँकेचे दार आतून बंद केले होते. पण ते लगेच उघडले. मी बाहेर जात असल्याचे दिसताच तो पुन्हा माझ्या अंगावर धावून आला. मला धरून हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, माझा गणवेश त्याच्या हातात आला व मला तिथून निसटता आले. बाहेर पडत असतानाच मी मदतीसाठी हाका मारल्या, तेव्हा लगेच काहीजण आले व दुबे पकडला गेला,’ असे श्रद्धा यांनी सांगितले. दुबेने श्रद्धा यांच्या मानेवर, गळ्यावर आणि छातीवर १७ हून अधिक घाव केले होते.

श्रद्धा देवरुखकर या विरारला पती आणि ५ वर्षांच्या मुलासमवेत राहतात. त्यांचे कुटुंबीयही हा त्यांचा पुनर्जन्म असल्याचे मानतात. श्रद्धा यांच्या उपचारांचा चार लाखांचा खर्च बँकेने केला आहे.

शाखा बदलीसाठी अर्ज

‘ज्या दुबेसोबत काम केले, त्यानेच हे कृत्य केले. त्यामुळे आता कुणावरही विश्वास उरलेला नाही’, असे श्रद्धा म्हणाल्या. आपण पुन्हा कामावर जाऊ मात्र, बँकेच्या त्या शाखेत जाण्याची हिंमत करू शकणार नाही, असेही त्या सांगतात. म्हणूनच त्यांनी बँकेकडे दुसऱ्या शाखेत बदलीसाठी अर्ज केला आहे. दुबे हा पैशांसाठी हपापलेला असायचा, असा अनुभव श्रद्धा यांनी सांगितला. बँकेतील कर्मचाऱ्यांकडूनही तो नेहमी पैसे उधार मागत असे, अशी माहितीही त्यांनी दिली. मृत योगिता वर्तक यांच्यासारखी मनमिळाऊ व शांत स्वभावाची अधिकारी नाहक बळ गेल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.