लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : ठाणे लोकसभेची जागा शिंदे गटाकडे गेल्याने मिरा भाईंदरमधील भाजपात निर्माण झालेला नाराजी अखेर दूर झाली आहे. मंगळवारपासून भाजप पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराला सुरवात केली आहे.

ठाणे लोकसभेची जागा ही शिंदे गटाकडे गेल्याने मिरा भाईंदर शहरात भाजप मध्ये नाराजी पसरली होती. भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी तर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास भाजप कार्यकर्ते तयार नसल्याचे सांगितले होते. संजीव नाईक यांना उमेदवारी डावल्याने त्यांच्या भाजप मधील समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या दोघांच्या प्रयत्नांनामुळे नाराजी नाट्य संपुष्टात आले. त्यामुळे सोमवारपासून मिरा भाईंदर भाजपने महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारास सुरुवात केल्याचे दिसून आले. मंगळवारी म्हस्के यांच्या मिरा भाईंदर मधील प्रचार रॅली मध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता व त्यांच्या समर्थका सहभागी झाले होते.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

संधीचं सोनं करणार- म्हस्के

ठाणे लोकसभा जागेवर महायुतीतर्फे मला उमेदवारी देण्यात आल्यामुळे मी वरिष्ठांचा आभारी आहे.या क्षेत्रात काम करण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे भविष्यात निवडून आल्यास स्थानिक महायुतीमधील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने अजून विकास करण्यात येईल आणि मला दिलेल्या संधीचं सोनं करीन असा विश्वास नरेश मस्के यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या प्रचार रॅलीमध्ये व्यक्त केला.

भाजपची उत्तर भारतीय मतदारांना हाक

नाराजी नाट्य संपुष्टात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच प्रचार सभेत भाजपने उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याला प्राधान्य दिले. यासाठी मिरा रोड येथे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी उत्तर प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी केवळ निवडणुकीपुरते महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना निवडून आणावे असे आव्हान त्यांनी मतदारांना केले.

आणखी वाचा- ठाणे जिल्ह्यात ८४ उमेदवारांमध्ये रंगणार निवडणूक, अर्ज माघारीच्या दिवशी १२ जणांनी घेतली माघार

शिवसेनेची तुलना ‘उंदराशी’

महाराष्ट्र राज्यात उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचा विरुद्ध करण्यासाठी दिनेश शर्मा यांनी उपस्थितीत नागरिकांना उंदीर आणि साधूच्या गोष्टीचे एक उदाहरण दिले. यात नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला उंदराची उपमा दिली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोष निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्वतःच कोणालाही उंदीर म्हणून संबोधले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.