लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघासाठी नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर होताच, भाजपमध्ये उघड आणि दबक्या सुरात व्यक्त होत असलेल्या नाराजीचा अंदाज आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महायुतीच्या मेळाव्यात भाजप नेत्यांसमोरच कडक भूमिका घेऊन म्हस्के यांना कानपिचक्या दिल्या.

ठाणे महापालिकेतील राजकारण आणि अर्थकारणावर म्हस्के यांचा अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. यामुळे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये त्यांच्या या ‘कारभारी’ वृत्तीविषयी नाराजी व्यक्त झाली आहे. नेमका हाच धागा पकडून राजन विचारे यांनी म्हस्के यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मेळव्यात बोलताना, तुम्हाला आता पालिकेत नव्हे तर संसद भवनात पाठिवले जाणार आहे. नगरसेवक, आमदार आणि पालिकेच्या कामात आडकाठी आणू नका, अशा शब्दात सुनावले. इथे भविष्यात बघण्यासाठी मी आहेच, त्याची काळजी करू नका, अशा शब्दात त्यांनी मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांना आश्वस्त केले.

आणखी वाचा-ठाणे : शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या

ठाणे महापालिकेत नरेश म्हस्के यांचा वर्षोनुवर्षे प्रभाव राहिला आहे. ठाण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमधील प्रभावी नेत्यांची मोट बांधून महापालिकेचा कारभार हाकण्यात म्हस्के तरबेज मानले जातात. परंतु म्हस्के यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या स्वपक्षीयांची संख्याही काही कमी नाही. तसेच भाजपमध्येही त्यांची ही कार्यपद्धती अनेकांना मान्य नाही. भाजपचे ठाणे शहर विधान सभेचे आमदार संजय केळकर यांनी अनेकदा म्हस्के यांच्या कार्यपद्धती विषयी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेतील त्यांचा वावर हा भाजपला रोखण्यासाठी असतो, अशा तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. स्वपक्षातील काही नेतेही म्हस्के हे गटातटाचे राजकारण करतात, अशा काही नेत्यांच्या तक्रारी आहेत. म्हस्के हे शिवसेनेतील नगरसेवकांची कामे मार्गी लावत असताना अनेकदा भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकांना आडवे येतात अशा तक्रारी यापूर्वी झाल्या आहेत. महायुतीच्या बैठकीपूर्वी आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे याविषयी नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांचे आनंद दिघेंबाबत मोठे वक्तव्य, “रुग्णालयात असताना पद सोडायला सांगितल्याने दिघे बैचेन होते…”

मुख्यमंत्र्यांकडून तक्रारीची दखल

म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये आलेल्या नाराजीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. सोमवारी टिपटॉप प्लाझा येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी म्हस्के यांनाच कानपिचक्या देत भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. मी आहे तसाच राहणार, असे नरेश म्हस्के या मेळाव्यात म्हणाले. नेमका हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ’‘मी आहे तसाच राहाणार. पण, तसे राहून आता चालणार नाही. तुम्हाला स्वत:मध्ये बदल करावा लागणार आहे. हे माझे म्हणणे नाही तर ही भाजप आमदार संजय केळकर यांची मागणी आहे. माणसाकडून काहीवेळेस काही गोष्टी घडतात. त्यामुळे तुमच्याकडून काही घडले असेल. आता तुम्ही खासदार होणार आहात. आता तुम्हाला बदलावे लागेल हे लक्षात ठेवा. पालिका, नगरसेवक, आमदार यांच्या कामात आडकाठी आणू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी म्हस्के यांना सल्ला दिला. इथे काय होते आहे ते पाहण्यासाठी मी आहेच, त्यामुळे त्याची काळजी करू नका, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्यांना दिलासा दिला.