महापालिकेची ‘स्वच्छतेची दिवाळी’; ७५ ठिकाणी दिव्यांची आरास, आकर्षक रांगोळ्या

वसई: दिवाळी हा आनंदाचा आणि रोषणाईचा सण. या दिव्यांच्या सणाबरोबर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने ‘स्वच्छतेची दिवाळी’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील अनेक ठिकाणी हजारो दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.   

दिवाळी सण साजरा करताना नागरिकांना स्वच्छतेचे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘स्वच्छतेची दिवाळी’ हा उपक्रम राबविण्याची संकल्पना आयुक्त दिलीप ढोले यांनी मांडली होती. उपायुक्त अजित मुठे यांनी पालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकामार्फत त्यांच्या प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सर्व प्रभागात  हा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत शहरातील प्रमुख चौक, उद्याने, शाळा आदी ७५ ठिकाणे निवडण्यात आली. या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून ते चौक दिव्यांची आरास व रांगोळ्या काढून सुशोभित करण्यात आले. मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील शहीद मेजर कौस्तुभ राणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, फाटक रोड येथून करण्यात आली.  सर्व चौक व स्मारक  स्वच्छ धुवून काढण्यात आले. दिव्यांची आरास, आकर्षक रोषणाई यामुळे शहराच्या सुंदरतेत भर पडल्याचे दिसून आले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना  ‘माझी वसुंधरा’ व ‘स्वच्छतेची शपथ’ देण्यात आली.   लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या उपक्रमाचे जल्लोषात स्वागत करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे पालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागला नाही.

देशाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमी वर ‘स्वच्छतेची दिवाळी’ हा उपक्रम सुरू  केला आहे. त्याला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या निमित्ताने शहरातील चौक, रस्ते, प्रमुख ठिकाणाची नियमित स्वच्छता केली जाणार आहे.

-दिलीप ढोले, आयुक्त,

मीरा-भाईंदर महापालिका.