वसई- १९८८ साली वसईत भर रस्त्यात झालेल्या सलीम कमाल उर्फ सलीम कॅसेटवाला याच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी क्लेमेन लोबो उर्फ मुन्ना याला माणिकपूर पोलिसांनी तब्बल ३६ वर्षांनी अटक केली आहे. हत्येनंतर तो परदेशात फरार झाला होता. ९० च्या दशकातील वसईतील विविध हत्यांमधील सलीम कॅसेटवाल्याची हत्या महत्वाची मानली जाते.

९० च्या दशकात वसई विरार शहरात दहशतीचे वातावरण होते. दिवसाढवळ्या रस्त्यावर हत्या केल्या जात होत्या. सलीम अकबर अली कमाल उर्फ सलीम कॅसेटवाला याची हत्या देखील याच काळात झाली होती. त्याचे कॅसेटचे दुकान होते आणि परिसरात त्याचा मोठा दबदबा होता. मयत सलीम कमाल हा बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि केबल व्यावसायिक सिराज कमाल यांचा भाऊ होता.

हेही वाचा >>> विजय वल्लभ रुग्णालय आग; दुर्घटनेचा अहवाल ३ वर्षांनी उघडकीस, पालिकेचे अनेक अधिकारी दोषी

१९८८ साली सलीम वसई पश्चिमेकडील माणिकपूर रस्त्यावरील (आताच्या दत्तात्रय शॉपिंग सेंटरसमोर) पाणीपुरी खाण्यासाठी आला होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तो आपल्या मुलासह पाणीपुरी खात असताना ७ जणांच्या टोळीने भर रस्त्यात त्याची हत्या केली होती. पूर्ववैमन्यसातून ही हत्या करण्यात आली होती. तेव्हा वसईत फक्त वसई हेच पोलीस ठाणे होते. तत्कालीन वसई पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती. मात्र सातवा मुख्य आरोपी  क्लेमन लोबो उर्फ मुन्ना (आता वय ५५) हा फरार झाला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. कालांतराने हे प्रकरण थंड झाले होते. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला होता. फरार आरोपी क्लेमेन लोबो हा परदेशातून वसईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला पुढील तपासासाठी वसई पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.