वसई: वसई विरार शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून पालिकेने नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. हे काम नियोजित वेळेत व योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी पालिका आयुक्त जातीने लक्ष घालत आहेत. या कामासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून याकडे विशेष लक्ष दिले आहे.
मागील काही वर्षांपासून वसईत पावसाळय़ात पाणी साचणे, पूर येणे या समस्या येत आहेत. ही स्थिती येऊ नये, यासाठी खडय़ातील आणि गटारातील गाळाचा उपसा करण्यात येतो. मात्र तरीही काही सखल ठिकाणी पाणी साचतेच. त्यामुळेच पालिकेने शहरातील नाल्यांची पाहणी हाती घेतली आहे. वसई विरार शहरात १९३ किलोमीटर लांबीचे २०५ छोटे मोठे नाले आहेत. येथून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी गाळ काढणे, नाल्यातील अडथळे दूर करणे आदी कामे पालिकेने सुरू केली आहेत. शहरात जवळपास १७१ ठिकाणच्या भागात पाणी तुंबून राहते. या नाल्यांची पोकलेनच्या सहाय्याने सफाई सुरू करण्यात आली आहे.
नालेसफाई काम पूर्ण व्हावे, यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार विशेष लक्ष देत आहेत. नेमलेले ठेकेदार योग्य काम करत आहेत की नाही, यावर देखरेख करण्याकरता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच नालेसफाईच्या कामाच्या संदर्भात वेळोवेळी अहवालही सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
आतापर्यंत शहरातील २२ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचे, तसेच सर्व प्रभागांत हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे उपायुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी सांगितले आहे.
गाळाची विल्हेवाट लावण्याविषयी नोंदींचे आदेश
नालेसफाई करताना अनेकदा ठेकेदार उपसलेला गाळ नाल्याजवळच टाकतात. त्यामुळे पावसात तो पुन्हा वाहून नाल्यात येतो. हे होऊ नये, यासाठी काढण्यात आलेला गाळ हा नाल्यापासून ५० मीटर लांब नेऊन त्याची विल्हेवाट लावून त्यांचे योग्य ते मोजमाप करण्याचे आणि नोंद ठेवण्याचे आदेशही आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.