scorecardresearch

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या संख्येने चिंता

मीरा भाईंदर वसई विरार शहरातील महिलांवरील विविध अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे.

वसई : मीरा भाईंदर वसई विरार शहरातील महिलांवरील विविध अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. महिलांच्या हत्या, बलात्कार, विनयभंग, लहान मुलींवर लैंगिक अत्याचार तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत २०२१ मध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील विविध अत्याचारांत वाढ होत आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे . २०२० मध्ये महिला अत्याचाराच्या एकूण १ हजार ५४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन २०२१ मध्ये त्यात ४४९ ने वाढ झाली आहे. २०२१ मध्ये १ हजार ५३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या वर्षांत शहरात १९ महिलांच्या हत्या झाल्या. बलात्कार २९२, अपहरण ५०२, विनयंभग ४१४, कौटुंबिक हिंसाचार २७० आदी प्रमुख गुन्ह्यांचा समावेश आहे.

लहान मुलींवरील अत्याचारातदेखील वाढ झाली आहे. २०२१ मध्ये बाललैंगिक शोषणविरोधी कायद्याअंतर्गत १४८ गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०२१ मध्ये त्यात वाढ १२४ ने वाढ झाली आहे. २०२१ मघ्ये पोक्सोअंतर्गत २७२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

महिलांवरील बलात्कार परिचित व्यक्तींकडून 

  •   बहुतांश बलात्कार हे पीडित महिलेच्या परिचितांकडून झाले आहेत.  बलात्काराच्या गुन्ह्यातील ३६४ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील १०० आरोपी हे पीडीताच्या ओळखीचे असून, १२३ हे मित्र असल्याचे समोर आले आहे. तर २३ प्रकरणांत शेजाऱ्यांनीच बलात्कार केले आहेत. ८२ प्रकरणांत कुटुंबातील सदस्यांनी महिलांवर बलात्कार केले आहेत. केवळ ३ प्रकरणांत अनोळखी आरोपींनी बलात्कार केले आहेत.
  • आयुक्तालयात निर्भया पथक नसले तरी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांवरील प्रकरणांसाठी विशेष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.  अनेक प्रकरणे ही ऑनलाइन छेडछाडीतून होत आहेत.  अश्लील संदेश पाठवणे, आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर पाठवले तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Concerns increasing atrocities against women ysh

ताज्या बातम्या