विरार : नालासोपारा येथे रविवारी दुपारी एका इमारतीचा सज्जा कोसळय़ाची घटना घडली होती. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी या घटनेच्या निमित्ताने शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. शहरात १२४ इमारती अतिधोकादायक असून ५४५ इमारती धोकादायक आहेत. यातील बहुतांश इमारती या रिकाम्या करून दुरुस्ती करण्याच्या आहेत. यामुळे हजारो कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार कायम आहे. 

नालासोपारा पूर्वेच्या तुळींज परिसरातील असलेल्या साई निवास या इमारतीचा सज्जा रविवारी सकाळी कोसळला. यावेळी या वरांडय़ात कुणी नसल्याने जिवीतहानी टळली.  या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २१ सदनिका तर तळमजल्यावर १० सदनिका आहेत. शहरात अनधिकृत इमारती आणि चाळींची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.  शहराचे नियोजन कोलमडत असून नागरी सोयीसुविधांवर ताण पडत असतो. बांधकामांचा दर्जा निकृष्ट असल्याने या इमारती आणि चाळी अवघ्या काही वर्षांत धोकादायक बनू लागल्या आहेत.  इमारतींच्या भींतींना तडे गेलेले असतात, भींती भुसभुशीत होऊन माती पडत असते, बांधकामावरील प्लास्टर निघत असते. रहिवाशांना सतत डागडुजी आणि दुरुस्ती करावी लागत असते. मात्र इमारतीच्या बांधकामाचा मूळ साचाच खिळखिळा असल्याने डागडुजी आणि दुरुस्ती मलमपट्टी ठरत असते. त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. त्यांच्या जीवाचा प्रश्न असताना पालिका केवळ बध्याची भुमिका घेत आहे. यामुळे दरवर्षी धोकादायक इमारतीचा आकडा वाढत असून शेकडो कुटुंब मृत्यूच्या छायेखाली वावरत आहेत.

यंदा १८५ ने वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षांत पालिका क्षेत्रात ७४३ धोकादायक  इमारती  होत्या. त्यात अतिधोकादायक १७८ आणि यातील धोकादायक ४५७  होत्या. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत या धोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ झाली. २०२१-२२ या  वर्षांत शहरात ९६३ धोकादायक इमारतींची नोंद झाली. त्यापैकी १६६ अतिधोकादायक इमारती तर ७७० धोकादायक इमारती आहेत. या १६६ पैकी पालिकेने केवळ १२ अतिधोकादायक इमारतीवर पालिकेने कारवाई केली आहे. यावर्षी धोकादायक इमारतीचा आकडा १८५ ने वाढला आहे. २०२१-२२ या वर्षांत ५४५ धोकादायक इमारती घोषित करण्यात आल्या. त्यापैकी १२४ अतिधोकादायक इमारती आहेत. त्यातील ३२७ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली.  पालिकेने दिलेल्या माहितीनुसार करोना काळापासून २५६ इमारती सन २०२०- २१ मध्ये निष्काशित केल्या आहेत. अजूनही शहरात शेकडो अतिधोकादायक, धोकादायक इमारती असून त्यात हजारो कुटुंब वास्तव्याला आहेत.