वसई : विरार शहरात पावसाळ्याच्या दिवसात होणाऱ्या पूरपस्थितीवर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही प्रत्यक्षात मात्र साऱ्या योजना फोल ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरात शुक्रवारपासून पडणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी मध्यरात्रीनंतर वाढला आणि शहरातील सखल भाग पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्ते, चौक, रेल्वे स्थानक परिसर, गृहसंकुले आणि शहराच्या पश्चिम पट्ट्यातील गावांतील रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यामुळे सलग दोन तीन दिवस पडणाऱ्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शहरात बाकीच्या विकासकामांसाठी हजारो कोटी खर्च करणारी पालिका पावसाळ्यातील उपाययोजना करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

वसईत गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्याच्या दिवसात सलग पडणाऱ्या पावसामुळे शहर ठप्प होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१८ साली शहरात झालेली पूरपरिस्थती नागरिक अजूनही विसरलेले नाहीत. त्यांनतर पालिकेने राष्ट्रीय बपर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी ) या सत्यशोधन समितीची नियुक्ती केली होती मात्र समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी अजूनही पूर्णतः होऊ शकलेली नाही त्यामुळे पावसाळ्याआधी नियोजन केल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरीही प्रत्यक्षात मात्र उपाययोजनांची पाटी कोरीच असल्याचे चित्र आहे. दोन-तीन दिवस सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन काही तासातच विस्कळीत झाले. अशावेळी शहरातील आपत्कालीन यंत्रणाचा बोजवारा उडून शहरातील नियोजनशून्याता पुन्हा एकदा समोर आली आहे.

पावसाळ्यात होणारी जलकोंडी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस शहरात नवीन परिसर पाण्याखाली जात आहेत. यामुळे भविष्यात शहरात मोठे पूरसंकट ओढवले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेकदा पावसाने उघडीप दिल्यांनतरही शहरातील पाणी ओसरण्यास वेळ लागतो. अशा परिस्थितीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असतो. नोकरदार वर्ग विशेषतः मुंबईला नोकरीनिमित्त जाणाऱ्या नागरिकांना घरातच अडकून पडावे लागते. पाणी जाण्याच्या नैसर्गिक मार्गांमधील अडथळे, खाडी किनारी होणारी अतिक्रमणे, नालेसफाईचा अभाव, नैसर्गिक नाल्यांवर करण्यात आलेले बेकायदा भराव आदी कारणे प्राथमिकपणे पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरत आहेत.

शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे विरार येथील विवा महाविद्यालय परिसर, साईनाथ नगर, बोळींज, ग्लोबल सिटी, गोकुळ टाऊनशिप, नंदाखाल, दोन तलाव -वटार रस्ता, यासह नालासोपारा येथील अलकापुरी, गाला नगर, गास रस्ता, संकेश्वर नगर आणि रेल्वे स्थानक परिसरांत पाणी साचले. तसेच, वसईतील सागर शेत, गिरीज रस्ता माणिकपूर, वसई गाव, बंगली नाका, गणनाका-गिरीज रस्ता, देवतलाव आणि नायगाव पूर्वेकडील स्टार सिटी, रिलायबल, सनटेक यांसारख्या विविध ठिकाणी पाणी साचले. यातील काही ठिकाणी चार फुटांहून अधिक पाणी साचल्याने या रस्त्यांवरून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

पालिकेकडून ठोस उपायोजना कधी ?

ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही त्या परिसरात पालिकेकडून संक्शन पंप लावण्यात आलेले असले तरीही अशा तात्पुरत्या उपाययोजना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात अपुऱ्या ठरतात. याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज प्रत्येक पावसाळ्यात अधोरेखित होत असताना पालिका प्रशासन मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. साचलेल्या पाण्यामुळे ठप्प होणारी वाहतूक आणि विस्कळीत होणारे जनजीवन सुरळीत व्हायला अनेक तासांचा कालावधी लागतो. २०१८ च्या पूरपरीस्थितीनंतर पालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे अपेक्षित होते मात्र गेल्या सात वर्षात याबाबत तात्पुरत्या उपाययोजना करण्यापलीकडे पालिकेने कोणतीही पावले उचलेली नाहीत.

धारण तलाव निर्मितीबाबत उदासीनता

निरी समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी व पावसाचे पडणारे पाणी शहरात साठून राहू नये तसेच पाणी जाण्यासाठी जागा मिळावी यासाठी धारण तलाव (होल्डिंग पॉन्ड) विकसित करणे आवश्यक आहे, असे नमुद केलेले होते. यासाठी नालासोपारा पश्चिमेच्या निळेमोरे, गोगटे सॉल्ट्स आणि नायगाव येथील सरकारी जागेत धारण तलाव निर्मिती करण्याच्या सूचनाही नीरीच्या अहवालात करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेने जागा आरक्षित केल्या मात्र यांनतर पालिकेकडून धारण तलाव निर्मितीबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे कोट्यवधी खर्चून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा पालिकेने नेमका काय उपयोग केला असा प्रश्न आता जनतेकडून विचारला जात आहे.

गावांमध्ये जलकोंडी वाढली

वसईच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये पूर्वीपेक्षा जलकोंडी वाढत असून पाणी पातळीतही वाढ होतना दिसत आहेत. या पट्ट्यात असणाऱ्या बावखलांमुळे पावसाच्या सुरुवातीच्या दिवसात रस्त्यांवर तुलनेने कमी पाणी साचते मात्र सलग पडणाऱ्या पावसात बावखले भरून वाहू लागली की गावागावात पाणी साचण्यास सुरुवात होते. काही मोकळ्या जागेत टाकण्यात आलेले भराव, नैसर्गिक ओहोळाच्या मार्गात केलेले बदल, बेकायदा भराव, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारती, वाड्यांचे आणि शेतजमिनींचे क्षेत्र घटणे यामुळे अनेकदा गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. गावागावांमध्ये पूर्वीपासून पाण्याचा निचरा होण्यासाठी खाडीच्या दिशेने जाणारे अनेक नैसर्गिक मार्ग अस्तित्वात होते. घरांच्या वाढत्या संख्या, इमारती आणि बेकायदा भराव यामुळे या मार्गांवर अडथळे निर्माण होऊन जलकोंडी होऊ लागली. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी जाण्याच्या घटनाही घडत आहेत. यासाठी पाणी जाण्याच्या जुन्या मार्गांचे सर्वेक्षण होऊन ते सुरक्षित करणे गरजेचे आहे अन्यथा गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू शकते अशी भीती पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

पावसाळामुळे झाडे पडून वीजतारा तुटणे, गटारांची उघडी झाकणे, उघड्यावरील रोहित्र, धरण-तलावांच्या जवळ सुरक्षा रक्षक नसणे यामुळे अनेक अपघात यापूर्वीही घडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शहर जलमय होण्यासोबतच अशा अनेक समस्यांमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे पावसाळ्यात शहरातील आपत्कालीन व्यवस्था अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.