वसई : वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यावर मंगळवारी पहाटे सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापेमारी केली. जवळपास १७ तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी या बंगल्यातून बाहेर पडले.

वसई विरार शहरात मे महिन्यापासून ईडीच्या कारवाईचे सत्र सुरू आहे. सुरवातीला पालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील निवासस्थानी छापे टाकून कोट्यावधी घबाड जप्त करण्यात आले होते. त्या प्रकरणानंतर पालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार उघड झाला होता. यापाठोपाठ बडे व्यावसायिक, सनदी लेखापाल, वास्तुविषारद आदींवर ईडीने छापेमारी केली होती. या झालेल्या कारवाईनंतर पालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार हे सुद्धा ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात होती.

अखेर मंगळवारी सकाळी त्यांच्या वसईच्या दिनदयाळ नगर येथील शासकीय निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापेमारी केली. मात्र आयुक्तांनी ईडीच्या अधिकार्‍यांना पाहून दार उघडलेच नव्हते. जवळपास तासाभराच्या पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश मिळविला. या काळात त्यांनी मोबाईल आणि लॅपटॉप मधून कागदपत्रांची विल्हेवाट लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवसभर आयुक्तांच्या विविध प्रकरणांची चौकशी सुरू होती. या संपूर्ण चौकशीनंतर रात्री दीड वाजता ईडीचे अधिकारी व त्यांचे पथक निवासस्थानातून बाहेर पडले. जवळपास १७ तास ईडीची कारवाई सुरूच होती. या झालेल्या कारवाईत नेमके अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.