वसई: गणपतीच्या आगमनानंतर आता बाजारात गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिक विशेतः महिला गर्दी करू लागल्या आहेत. गौरीचे सुबक मुखवटे, भरजरी साड्या, पारंपरिक दागिने, अशा विविध वस्तूंनी वसईची बाजारपेठ सजली आहे. यावर्षी फ्युजन मराठमोळे दागिने आणि फायबरचे मुखवटे खरेदीदारांच्या पसंतीस उतरत आहेत.

गणपती आगमानंतर अवघ्या काही दिवसात तयारी सुरु होते ती गौरी पूजनाची. या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी गौरी पूजन करण्यात येणार आहे. त्यामुळे गौरीचे घरी आगमन होण्यापूर्वी तिला छान नटवता यावे, सजवता यावे म्हणून खरेदीदारांची लगबग सुरु झाली आहे. यंदाच्या वर्षी फायबरचे, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेले विविध प्रकारचे आणि आकाराचे मुखवटे, कापड, फायबर, आणि प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेले हात जोड तसेच पाय जोड, भरजरी तयार सहावारी आणि नऊवारी साड्या, तर आधुनिकतेची जोड असलेले पारंपरिक दागिने, वेगवेगळ्या आकारचे स्टॅन्ड आणि त्यासोबतच तेरड्याच्या गौरीसाठीचे कागदी मुखवटेही बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

यंदा बाजारात ३५० रुपयांपासून ३,५०० रुपयांपर्यंत गौरीचे मुखवटे उपलब्ध आहेत. तर संपूर्ण गौरीचा साचा ६५० रुपयांपासून ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. संपूर्ण साज लावलेल्या गौरींच्या मूर्तींची किंमत १८ हजारांपासून ते २३ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यामुळे विविध किमतींमध्ये गौरीच्या मुखवट्यांची खरेदी नागरिकांकडून केली जात आहे. यावर्षी खळी असणाऱ्या मुखवट्यांना मागणी आहे. असे मुखवटे पंधराशे ते अठराशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा मुखवट्यांच्या किमतीत वाढ झालेली नाही त्यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे असे वसई येथील विक्रेते हर्षद पाटील यांनी सांगितले.

गौरीसाठी मराठमोळे दागिने

दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळ्या प्रकारचे, घडवणीचे दागिने बाजारात दिसून येत आहेत. यात ठुशी, बोरमाळ, बाजूबंद, तोडे, कंबरपट्टा, चपलाहार, लक्ष्मीहार, झुमके, नथ, मंगळसूत्र अशा विविध पारंपरिक दागिन्यांचा समावेश आहे. पण,या दागिन्यांच्या जोडीला यंदा ‘फ्युजन’ दागिन्यांना मोठी मागणी असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. बाजारात आलेले नथीचे मंगळसूत्र, नथीचे कानातले, तसेच नाजूक ब्रेसलेट, स्प्रिंगवाल्या हिरव्या बांगड्या, ऑक्सिडाइझ दागिने महिलांच्या पसंतीस उतरले आहेत. वीस रुपयांपासून ते सहाशे रुपयांपर्यंत अशा किमतीत हे दागिने उपलब्ध आहेत.