वसई विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील वाडकर यांना मंगळवारी पहाटे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी अधिकृत पदवी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अधिनियम १९६१ चे कलम ३३ तसेच भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४१९, ४२० अन्वये विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ सुनील वाडकर हे वसई विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी होते. सध्या ते विरार महामार्गावर ‘हायवे’ आणि नालासोपारा येथे ‘नोबेल’ अशी दोन खासगी रुग्णालये चालवतात. त्यांची वैद्यकीय पदवी बोगस असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली होती. त्यानुसार सोमवारी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने कारवाई केली.

आमच्याकडे डॉ. वाडकर यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर आम्ही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन तपासणी केली. त्यावेळी डॉ. वाडकर यांच्याकडे एमबीबीएसची पदवी नसल्याचे समोर आले आहे, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. वाडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पदवी खरी आहे की खोटी याचा तपास करत असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.