भाईंदर : वाढत्या इंधन दरवाढीमुळे मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या प्रवासी भाडय़ात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला होता.मात्र या प्रवासी भाडेवाढीच्या प्रस्तावाला लोकप्रतिनिधींनी विरोध करून फेटाळून लावला आहे. यामुळे प्रवासी दरात कोणतीही वाढ होणार नसल्याने भाडे जैसे थे राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्वतंत्र २००५ पासून स्वतंत्र परिवहन सेवा कार्यरत आहे.यात साधारण बस आणि वातानुकूलित अशा दोन्ही बसचा समावेश आहे.या परिवहन सेवेचे सर्वसाधारण बसचे भाडे हे २०१३ मध्ये लागू करण्यात आले होते. तर वातानुकूलित बस प्रवासाकरता २०१६ मध्ये भाडे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाने बस भाडय़ात कोणत्याही प्रकारची वाढ मागच्या १३ वर्षांत केलेली नाही.त्यामुळे मीरा-भाईंदर पालिकेच्या परिवहन सेवेचे बस भाडे हे कमी आहे.
मात्र मागच्या काही वर्षांत इंधनाच्या दरात मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे.बसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी लागणाऱ्या खुल्या साहित्याचे भाव देखील वाढले आहेत . पालिकेची परिवहन सेवा सध्या एनसीसी विथ व्हिजिएफ तत्त्वावर चालवली.परंतु आगामी काळात परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बस दाखल होणार असल्याने जीसीसी तत्त्वावर चालवण्याचा विचार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वाढलेले खर्च व आगामी काळात इंधन व इतर गोष्टीचे वाढणारे दर लक्षात घेऊन प्रवासी तिकिटाच्या दरामध्ये फेरफार करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता.
त्यानुसार सर्वसाधारण बस प्रवासी तिकिटाच्या दरात वाढ ५ रुपयांची वाढ करण्याचे ठरवण्यात आले होते. याकरिता तसा प्रस्ताव देखील बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण महासभेत सादर करण्यात आला होता.मात्र आगामी काही महिन्यातच मिरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत परिवहन सेवेत दर वाढ केल्यास सामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांचा कोणत्याही रोष आपल्यावर येऊ नये म्हणून पालिकेतील सर्व लोकप्रतिनिधीनी या ठरावाचा विरोध करून तो फेटाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या परिवहन सेवेत कोणतीही दरवाढ झाली नसली तरी याचा आर्थिक फटका हा पालिकेलाच बसणार आहे तर दुसरीकडे भाडय़ात दर वाढ होणार नसल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी झालेल्या महासभेत प्रकरण क्रमांक १४ हा परिवहन उपक्रमात तिकीट दरात फेररचना करण्याचा ठराव फेटाळण्यात आला आहे. – वासुदेव शिरवळकर, सचिव, महानगरपालिका