मीरा-भाईंदर पालिकेतील ३२ कनिष्ठ अभियंत्यांच्या नोकऱ्या धोक्यात

भाईदर : मीरा-भाईंदर महापालिकेतील ठेकेदार बदलल्याने त्याच्याकडे काम करत असलेल्या ३२ कनिष्ठ अभियंत्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. नवीन ठेकेदारांकडे आम्हाला सामावून घेण्याची मागणी या अभियंत्यांनी केली आहे. मात्र कंत्राटी कर्मचारी हा ठेकेदाराचा विषय असल्याने यात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत पालिकेने विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने कनिष्ठ अभियंत्यांच्या नियुक्तीचा ठेका २०१८ मध्ये मेसर्स सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिला होता. या ठेक्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपली होती. त्यानंतर पालिकेने ३५ कनिष्ठ अभियंता पुरविण्याचा नवीन ठेका ‘देवमामलेदार स्वयम रोजगार सेवा सहकारी’ संस्थेला दिला. मात्र नवीन ठेकेदाराने जुन्या ठेकेदारांकडील कनिष्ठ अभियंत्यांना पुन्हा सेवेची संधी दिली नाही. त्यामुळे या ३२ कनिष्ठ अभियंत्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. आम्ही करोनाच्या काळातही उत्तमरीत्या पालिकेत सेवा दिली आहे. त्यामुळे आम्हाला नव्याने सेवेत समावून घ्यावे, अशी मागणी या अभियंत्यांनी केली आहे.

याबाबत पालिकेच्या आस्थापना विभागाचे प्रमुख उपायुक्त मारुती गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरविण्याचे काम पालिका ठेकेदारामार्फत करते. नवीन ठेकेदाराने कुणाची नियुक्ती करावी हा त्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी अभियंत्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत पालिकेला हस्तक्षेप करता येणार नसल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.