विरार : वसई विरार शहारत मागील पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा फटका इथल्या फुलशेतीला बसताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात फुल शेतीला बसलेल्या बसलेल्या या फटक्यामुळे वसई विरार परिसरातील फुल शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वसई विरार परिसरात प्रामुख्याने फुल शेती केली जाते. यात मोगरा, जाई, जुई, सोनचाफा, सायली, कागडा, नेवाळी, जास्वंदी, गुलाब, सोनटक्का, लिली, झेंडू यासह विविध फुलझाडांची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकांची उपजीविका फुलशेतीवर अवलंबुन आहे. मात्र शहरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका इथल्या फुलशेतीला बसला असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक सखल भागातील फुलबागांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे फुलझाडांवरील रोगराई वाढणार असून याचा परिणाम थेट फुलांच्या उत्पादनावर होणार असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
वसई विरारच्या पश्चिम भागातील अर्नाळा, मुक्काम, ज्योती,आगाशी, नवापूर, राजोडी, कळंब, भुईगाव, मर्सिस, सोपारे गाव, गास, वाघोली आदी परिसरासह इतर भागात मोठ्या प्रमाणावर फुल शेती केली जाते. आधीच वसईतील फुल शेतकऱ्यांना फुलांवर येणारी रोगराई, वातावरणीय बदल, मजुरांचा अभाव यासांरख्या समस्यांचा सामना करावा लागत असतानाच आता नैसर्गिक आपत्तींमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. असे येथील या शेतकऱ्याने सांगितले.
सणासुदिच्या दिवसात नुकसान
गणपती उत्सवाच्या दिवसांमध्ये वसईतील फुलांना दादरच्या फुल बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. वसईतील सोनचाफा, जास्वंदी, गुलाब, मोगरा अशा सुवासिक फुलांसह दुर्वा, शमीपत्री,बेल, केळीची आणि हळदीची पाने यासह इतर पूजेच्या साहित्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच यादिवसात शेतकऱ्यांना चांगला नफा होऊन फायदा होत असतो. पावसाचा फटका या सर्व उत्पादनाला बसणार असून यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत फुलांचे उत्पादन चांगले आहे. मात्र पावसाचा जोर अशाच प्रकारे राहिल्यास फुलांचे उत्पादन कमी प्रमाणात निघण्याची शक्यता आहे. सुभाष भट्टे, फुलउत्पादक शेतकरी
सणासुदीच्या काळात वसईतील फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र वातावरणातील बदलामुळे फुलांचे उत्पादन कमी प्रमाणात निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.किरण पाटील , शेतकरी वसई.