प्रत्येक तक्रारीत तत्परता; सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत

सुहास बिऱ्हाडे
वसई : बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी खास ‘मास्टर प्लॅन’ तयार केला असून शीघ्र कृती, संवेदनशीलता आणि सबळ पुरावे अशा त्रिसूत्रीचा वापर केला जाणार आहे. शहरातील निर्जनस्थळे शोधून, सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणली जाणार आहेत.

मुंबईच्या साकीनाका येथे एका महिलेवर अमानुष बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. अशा घटना भविष्यात होऊ नयेत, त्याला आळा बसावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तांनी महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी हा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याबद्दल माहिती दिली. तात्काळ अमलात आणायच्या तसेच दिर्घकालीन उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले की, शहरातील सर्व परिसर, निर्जन भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आणला जाणार आहे. जेणेकरून सुरक्षा कवच तयार होईल. शहरातील निर्जन स्थळे शोधून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. त्या ठिकाणी नियमित गस्त घातली जाईल. अंधार असलेल्या भागात दिवे लावले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे. रात्री रेल्वे स्थानक परिसराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल. रात्री स्थानकातून उतरून या रिक्षात बसणाऱ्या महिलांची नोंद आणि रिक्षाचालकाचा क्रमांक डायरीत नोंदवला जाणार आहे. जेणेकरून रिक्षाचालकांवर अप्रत्यक्ष अकुंश बसेल. शहरातील पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवले जाणार आहे.

संवेदनशीलता आणि तत्परता

महिलांच्या प्रत्येक गुन्ह्यात संवेदनशीलता आणि तत्परता आणण्याच्या खास सूचना आयुक्त दाते यांनी दिल्या आहेत. महिलांशी सौजन्याने वागणे, त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेणे, जलद तपास करणे, दोषसिद्धी प्रभावीपणे होण्यासाठी सबळ पुरावे गोळा करणे, त्रुटी न ठेवता दोषारोपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रारींची वेळीच दखल घेतली तर पुढचे गंभीर गुन्हे रोखता येतील. सराईत गुन्हेगारांवर देखील प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली.

रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी शहरात आकाशमार्गिका (स्कायवॉक) बांधण्यात आले आहेत. मात्र या स्कायवॉकचा नागरिकांकडून फारसा वापर होत नसल्याने ते निर्जन असतात. या ठिकाणी प्रेमीयुगुले येतात तसेच अंधार असल्याने गैरप्रकार चाललात. संभाव्य गुन्ह्यांची शक्यता लक्षात घेऊन या आकाशमार्गिका रात्रीच्या वेळी बंद करण्याचा विचार पोलीस करत असून तसा प्रस्ताव रेल्वे आणि पालिका प्रशासनाकडे देण्यात येणार आहे.

अन्य दीर्घकालीन उपाययोजना

  • शहरातील सराईत गुन्हेगारांची यादी तयार करणे
  • रिक्षामालकांकडून सर्व रिक्षाचालकांची यादी मागवून तपासणे
  • पदपथावर राहणाऱ्या महिलांची चौकशी करून त्यांच्या नोंदी ठेवणे
  • गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणातील दोषारोपत्र त्वरित न्यायालयात सादर करणे
  • प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाका सभा (कॉर्नर मीटिंग) घेऊन जनजागृती करणे
  • महिला दक्षता समित्या कार्यान्वित करणे
  • गस्त वाढवणे, एकटय़ा असणाऱ्या महिलांची विचारपूस करणे

शहरातील नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. महिलांना सुरक्षित वाटेल अशा विविध उपाययोजना आम्ही करत आहोत. महिलांशी संबंधित तक्रारी तत्परतेने आणि संवेदशीलतेने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सदानंद दाते- पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई विरार