वसई : पापडी येथील पालिकेच्या तलावाचे प्रवेशद्वार कोसळून पाच वर्षीय चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर उद्यानांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने सुशोभित केलेल्या तलाव व उद्यानातील साहित्य अनेक ठिकाणी तुटलेली असून ही उद्याने लहान मुलांसाठी धोकादायक बनू लागली आहेत. त्यामुळे उद्यानाच्या व तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसई-विरार शहरात असलेली अनेक जुनी व ऐतिहासिक तसेच निसर्गसौंदर्य अशी तलाव आहेत. या तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिका तलावांचे पुनर्जीवित करून त्याचे चांगल्याप्रकारे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये तलावातील गाळ काढणे, तलावाच्या सभोवताली संरक्षण भिंत बांधणे काही तलावाच्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, बसण्यासाठी बाकडे, तलावामध्ये कारंजे, विद्युत रोषणाई, सुशोभित झाडे अशा विविधप्रकारे या तलावाचे सुशोभीकरण करून तलाव निसर्ग संपन्न करण्यात आली आहेत. यासाठी पालिकेने कोटय़वधी रुपयांचा खर्च केला आहे. परंतु काही ठिकाणी लावण्यात आलेल्या साहित्य व करण्यात आलेले बांधकाम यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी उद्यानांची व त्या ठिकाणच्या साहित्याची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणी संरक्षण भिंती निखळल्या आहेत तर दुसरीकडे खेळणी, लोखंडी गेट तुटलेले व जीर्ण झाले असल्याचे चित्र आहे. यामुळे या उद्यानात व तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी येत असलेल्या लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे.
शहरातील उद्यानातील साहित्य व इतर सामग्री याचे वेळीच दुरुस्ती व देखभाल केली तर अशा घटना रोखल्या जाऊ शकतात. परंतु पालिका व त्याठिकाणी नेमलेले ठेकेदार यांचे दुर्लक्ष होत असल्याने
अशा घटना समोर येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालिकेने शहरातील उद्याने व तलाव यांची पाहणी करून जे साहित्य मोडकळीस आले आहे त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अजून किती बळी हवेत?
पालिका विविध विकासकामे ठेकेदारांच्या माध्यमातून करत असते. दुर्घटना घडल्यावर ठेकेदारावर बोट ठेवून आपली जबाबदारी झटकत असते. मात्र अशा दुर्घटना रोखण्यासाठी खबरदारी न घेणाऱ्या ठेकेदारांवर वेळीच कारवाई करत नाही. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असतात. काही वर्षांपूर्वी वसई पश्चिमेच्या अंबाडी रोडी येथील सुर्या उद्यानात विजेचा धक्का लागून चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. दिवाणमान येथील तरणतलावात दोन वर्षांपूर्वी एका चिमुकल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता, तर नायगाव पश्चिमेच्या उमेळा येथील ठेकेदाराने खोदलेल्या नाल्यात पडून चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला होता. पालिकेला आणखी किती बळी हवेत, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.