भाईंदर येथील जंजिरे धारावी किल्लय़ातील स्मारकाचे काम सुरू

वसई:  महाराष्ट्राच्या इतिहासातील गौरवाचे प्रतीक असलेल्या भाईंदरच्या ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्लय़ाच्या सुशोभीकरणाच्या मार्गातील अडथळे १६ वर्षांनी दूर झाले आहेत. या किल्लय़ात चिमाजी अप्पांचे स्मारक आणि सुभोभीकरणाचे काम सुरू आहे.  सुमारे एक कोटींहून अधिक रकमेच्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हा किल्ला एक पर्वणी ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात भाईंदरच्या उत्तन येथील ‘जंजिरे धारावी’ या किल्लय़ाचे महत्त्वाचे स्थान आहे. चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकल्यानंतर जंजिरे धारावी किल्ला ताब्यात घेतला होता. या शौर्याचे प्रतीक म्हणून या किल्लय़ाकडे पाहिले जाते. मात्र हा किल्ला अनेक वर्ष दुर्लक्षित होता. या किल्ल्याचा विकास करून तेथे चिमाजी अप्पांचे स्मारक बनविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. १६ वर्षांपूर्वी स्मारकाला मंजुरी मिळाली होती. पुरातत्त्व खात्याकडून हा किल्ला महापालिकेला हस्तांतरितही करण्यात आला होता. मात्र त्याच्या विकासाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. अखेर मीरा भाईंदर महापालिकेने या स्मारकाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले आहेत. स्मारक परिसराच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यात चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक असे स्वरूप आहे.

आयुक्त दिलीप ढोले यांनी या किल्लय़ाची पाहणी करून स्मारकाच्या सुभोभीकरणाच्या अंतिम तयारीचा आढावा घेतला. या संपूर्ण प्रकल्पासाठी १ कोटींहून अधिक खर्च येणार आहे. आमदार गीता जैन यांनी या कामासाठी १ कोटींचा महापौर निधी दिला आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाच्या कामातील सर्व अडथळे दूर करण्यात आम्हाला यश आले आहे आणि लवकरच हा जंजिरे धारावी किल्ला राज्यातील र्पयटनात एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, अशी माहिती आयुक्त ढोले यांनी दिली.

गौरवशाली इतिहास

भाईदर पष्टिद्ध(१५५)मेला उत्तन येथील धारावी डोंगरावर पोर्तुगीजकालीन जंजिरे धारावी किल्ला आहे. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी धारावी डोंगर ताब्यात घेतला.  १६०० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. या किल्लय़ातून वसईच्या किल्लय़ावर तसेच सागरी मार्गांनी येणाऱ्या शत्रूंवर ३६० अंश कोनातून नजर ठेवता येत होती. १७३७ मध्ये चिमाजी अप्पानी वसई किल्ला जिंकल्यानंतर जंजिरे धारावी किल्ला ताब्यात घेतला. त्यांनी  किल्लय़ावर बुरुज व तटबंदी उभारली होती.   डोंगरावर असलेल्या धारावी देवीचे पेशव्यांनी पुर्नस्थापना करून मंदिराचे निर्माण केले होते.  किल्लय़ात ४०० वर्षे जुने चर्च आहे,  किल्लय़ाची माहिती देणारे शिलालेख  तसेच सोयीसुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त संजय शिंदे  यांनी दिली.